राईट बंधूंना स्वतःच्याच विमानात एकत्र उड्डाण घेण्यापासून कोण थांबवत होतं? त्यांच्याबद्दलच्या या ९ गोष्टी जाणून घ्या !!
कल्पनेच्या सहाय्याने मानवाने अनेक अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखवल्या. आजही आकाशातून विमान जात असते तेव्हा छोट्यासह घरातील मोठी माणसे देखील अंगणात येऊन हे आश्चर्य आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करतातच. विमानाचा शोध लागल्यापासून आजतागायत विमानाच्या रुपात आणि अंतर्गत रचनेत वारंवार बदल होत आले आहेत. शंभर वर्षापूर्वीचे विमान आणि आजचे विमान यात बराच मोठा फरक आहे हे खरे असले तरी, विमान संशोधनासाठी संपूर्ण जग आजही राईट बंधूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.
या दोघांनी ज्या जिद्दीने आणि तळमळीने विमान बनवण्याचा ध्यास घेतला ते पाहिल्यास त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाल्याशिवाय राहत नाही. राईट बंधूंच्याही आधी अनेक लोकांनी विमान बनवण्याचा ध्यास घेतला होता. तसे प्रयोगही केले होते. पण, जे यश राइट बंधूंना मिळाले ते अनेकांना का मिळू शकले नाही? राइट बंधूंच्या संशोधनातील या काही महत्वाच्या गोष्टीवर नजर टाकल्यास त्याचे उत्तर तुम्हाला नक्की मिळेल.
१) त्यांची प्रेरणा –
विल्बर आणि ऑर्व्हिल यांच्या लहानपणी त्यांच्या वडिलांनी एक खेळण्यातील विमान आणून दिले होते. हे विमान बांबू, कागद यांच्यापासून बनवले होते आणि त्याला एक रबर बँडही जोडला होता. ते दोघेही जेंव्हा या विमानाने खेळू लागले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले कारण, इतर खेळण्याप्रमाणे हे खेळणे हवेत उडवल्यावर खाली कोसळले नाही. उलट ते हवेतच तरंगत राहिले आणि शेवटी छताला थडकून खाली कोसळले. या खेळण्याने त्यांच्यातील कुतूहल जागवले. त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी हे खेळणे देखील खोलून पाहिले आणि पुन्हा जोडले. अशा प्रकारे हवेत तरंगणारे मशीन आपण बनवू शकू का अशा प्रश्न त्यांना तेव्हाच पडला. अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळावूनच ते स्वस्थ बसले.
२) अपूर्ण शिक्षण –
विमानाचा शोध लावणाऱ्या राइट बंधूंचे शिक्षण मात्र अत्यल्प होते, हे कदाचित आज कुणाला पटणार नाही. परंतु हे खरे आहे. राइट बंधूंनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि त्यांनी पुढे हायस्कूलला प्रवेश घेतला. पण, त्यांनी हायस्कूल डिप्लोमा पूर्ण केलाच नाही. विल्बरने हायस्कूलची चार वर्षे पूर्ण केली होती. त्यानंतर वडिलांच्या कामानिमित्ताने त्यांचे कुटुंब सतत स्थित्यंतर करत राहिले. त्यामुळे ऑर्व्हिलचा हायस्कूल डिप्लोमा काही पूर्ण होऊ शकला नाही. मग, त्यांनी दोघांनीही पुढील शिक्षणाला रामराम ठोकून एक प्रिंटींग व्यवसाय सुरु केला.
३) वर्तमानपत्राचा व्यवसाय –
ऑर्व्हिल आणि विल्बर यांनी १८८९ मध्ये स्वतःचा छापखाना सुरु केला. दोघे मिळून एक साप्ताहिक चालवू लागले ज्याचे नाव होते, ‘वेस्ट साईड न्यूज’. त्यानंतर त्यांनी ‘द इव्हनिंग न्यूज’ नावाचे एक सायंदैनिकही प्रकाशित केले. पण, त्यांना यात पुरेसा नफा मिळत नव्हता म्हणून अगदी दीड-दोन वर्षातच त्यांनी या व्यवसायालाही रामराम ठोकला.
४) राइट सायकल कंपनी –
वर्तमानपत्राचा व्यवसाय बंद पडल्यानंतर दोघांनीही सायकल कंपनी सुरू केली. १८९२ मध्ये त्यांनी हा नवा व्यवसाय सुरु केला आणि लवकरच ते एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आले. या व्यवसायात असतानाच त्यांना वेगवेगळ्या मशिनरीजची माहिती घेता आली. शिवाय, या व्यवसायाने त्यांना आर्थिक नफाही खूप झाला. ज्यामुळे त्यांच्या पुढील संशोधनात कुठेही आर्थिक कारणाने अडथळा आला नाही.
५) लग्नापासून दूर राहिले –
विमान निर्मितीचा ध्यास घेतल्या नंतर या दोघांच्याही मनाला दुसरे विषय शिवलेच नाहीत. या ध्यासाने त्यांना इतके पछाडले होते की दोघेही अविवाहित राहिले. दोघेही फक्त विमानासंबधित वेगवेगळे प्रयोग करण्यातच व्यस्त असत. या प्रयोगातच त्यांनी चार वर्षे घालवली. १८९९ मध्ये त्यांनी या प्रयोगाला सुरुवात केली आणि १९०३ मध्ये त्यांना यात संपूर्ण यश मिळाले.
६) फक्त एक फ्लाईट –
राइट बंधूंच्या वडिलांनी त्यांना एक अट घातली होती की, ते दोघे मिळून कधीच विमानउड्डाण करणार नाहीत. विमानाच्या उड्डाणाचे प्रयोग करताना दोघांनीही आळीपाळीने उड्डाण करायचे. कारण, न जाणो दुर्दैवाने जर विमान अपघातग्रस्त झालेच त्यांच्या दोन्ही मुलांना ते एकाच वेळी गमावून बसतील अशी त्यांना भीती होती. परंतु २५ मे १९१० रोजी मात्र त्यांनी वडिलांना दिलेले हे वाचन मोडले आणि विल्बर व ऑर्व्हिल यांनी एकाच विमानातून उड्डाण केले. फक्त सहा मिनिटाच्या या विमान उड्डाणात ऑर्व्हिल विमानचालक होते तर विल्बर प्रवासी. यानंतर दोघांनी कधीच एकत्र उड्डाण केले नाही.
७) पहिले उड्डाण कोण करणार हे टॉस करून ठरवले –
डिसेंबर १९०३ साली विल्बर आणि ऑर्व्हिल दोघांनाही विमान उड्डाण करण्यात यश आले. पण, जेंव्हा त्यांचे विमानाचे मॉडेल तयार झाले तेव्हा त्याच्यातून पहिले उड्डाण कोण करणार हे ठरवण्यासाठी त्या दोघांनी कॉइन टॉस केले. पहिला टॉस विल्बरने जिंकला होता म्हणून त्याने १४ डिसेंबर १९०३ रोजी उड्डाण केले. मात्र त्याचा हा प्रयोग अयशस्वी ठरला शिवाय त्यामुळे विमानाची थोडीशी मोडतोडही झाली. मग तीन दिवसांनी म्हणजेच १७ डिसेंबर १९०३ रोजी ऑर्व्हिलने विमान उड्डाण केले. १२० फुट उंचीवर विमान नेऊन त्याने विमानाचे यशस्वी उड्डाण करून दाखवले.
८) राइट फ्लायरचे यशस्वी उड्डाण –
१७ डिसेंबर १९०३ रोजी ऑर्व्हिल आणि विल्बरने राइट फ्लायर मधून चार वेळा उड्डाण केले. त्यानंतर ऑर्व्हिल आणि विल्बर विमान थांबवून काही तरी चर्चा करत उभे होते इतक्यात जोराचा वारा आणि विमान हवेतच तरंगू लागले. हवेतच विमानाने गिरक्या घेतल्या आणि शेवटी जमिनीवर आदळले. त्यामुळे विमानाची खूपच मोडतोड झाली. त्याची मोटार, चेन गाईड यांचे अतोनात नुकसान झाले. त्याची दुरुस्ती होण्यापलीकडे दुरवस्था झाली होती. त्यामुळे १७ डिसेंबर नंतर राइट फ्लायरने पुन्हा हवेत झेप घेतली नाही. पण त्याचा सांगाडा आजही डेटन मध्ये जतन करून ठेवण्यात आला आहे.
९) पहिले विमान उड्डाण आणि पहिले चांद्रयान –
नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस. विमानाच्या शोधानंतर मानवी प्रगतीची झेप उंचावतच गेली. माणूस थेट चंद्रावर पोहोचला. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर जाताना पहिल्या राइट फ्लायरच्या जतन करून ठेवलेल्या सांगाड्यातील एक छोटा लाकडाचा तुकडा सोबत चंद्रावर नेला होता. त्यांनी घातलेल्या स्पेससूटच्या एका खिशात त्यांनी हा तुकडा ठेवला होता. राइट बंधूंच्या विमान संशोधनाप्रती व्यक्त केलेली ती कृतज्ञता होती. त्यांच्या मुलभूत संशोधनामुळेच माणूस चंद्रापर्यंतची झेप पूर्ण करू शकला.
त्यांच्या या महत्वपूर्ण संशोधनाने संपूर्ण जगाचा कायापालट झाला. कशी वाटली ही माहिती? आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.
लेखिका : मेघश्री श्रेष्ठी