इतिहासाला कलाटणी देणाऱ्या हत्या - जगाच्या इतिहासाची सारी समीकरणेच बदलणारा राजपुत्राचा खून!!
\"इतिहासाच्या पानांवर आपली भलीबुरी मोहोर उमटवणाऱ्या अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या हत्यांच्या कथा आम्ही घेऊन येत आहोत. त्यांनी घेतलेल्या विशिष्ट पावित्र्यामुळे त्यांना अनेक विरोधक निर्माण झाले आणि त्यातूनच त्यांची हत्या करण्यात आली. प्रवृत्तीला विरोध करा; व्यक्तीला नको असं कितीही सांगितलं तरी ते प्रत्यक्षात येत नाही हेच वेळोवेळी अधोरेखित होत राहिलं. या हत्यांनी कायकाय घडून आलं, जगाचा इतिहास कसा बदलवला आणि मुळात या हत्या घडल्याच का, या सगळ्यांचा ऊहापोह करणारी ही लेखमालिका!!\"\"सोफी, सोफी डार्लिंग, मरू नकोस. निदान आपल्या मुलांसाठी तरी तुला जिवंत राहायला हवे.\'\' स्वतःच्या मानेत गोळ्या घुसलेल्या असताना राजपुत्र फर्डिनांड सोफीला - आपल्या बायकोला कळवळून म्हणत होता. पण सोफीकडून काहीही प्रतिसाद नव्हता. तो मिळणारही नव्हता. गॅव्ह्रिलो प्रिन्सिप नावाच्या तरुणाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर काही वेळातच सोफी आणि फर्डिनांड या दोघांचाही मृत्यू झाला. पण मुळात हे का आणि कसे घडले?पहिले महायुद्ध सुरू झाले त्याचे निमित्त किंवा तात्कालिक कारण हे या ऑस्ट्रियन राजपुत्राचा - आर्चड्यूक फ्रान्झ फर्डिनांड याचा - खून असे सांगितले जाते. पण ही हत्या घडली त्याची पाळेमुळे बरीच खोल रुजलेली होती.