आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी सरकारविरोधात लढणाऱ्या या मेक्सिकन क्रांतिकारकाचा त्याच्या गनिमी काव्याच्या तंत्रानेच घात केला!!
एमिलीयानो सापाता (Emiliano Zapata) हे नाव आपल्याकडे फारसं कुणाला माहीत नसेल, पण मेक्सिकोमधील शेतकऱ्यांसाठी हा मनुष्य जणू देवासमान आहे. सापाता हा मेक्सिकन क्रांतीचा खराखुरा नायक. श्रीमंत जमीनदारांच्या विरोधात उठाव करून त्याने गरीब शेतकऱ्यांना त्यांनी गमावलेल्या जमिनी परत मिळवून दिल्या.
सापाताचा जन्म १८७९ मध्ये मेक्सिकोच्या एका खेड्यातला. त्याचे वडील शेतकरी होते. जोडीला ते घोड्यांना प्रशिक्षण देण्याचं आणि त्यांची विक्री करण्याचं काम करत. लहानपणी त्याने आजूबाजूच्या गरीब खेडूत शेतकऱ्यांकडून त्यांच्या जमिनी बळकावणारे श्रीमंत जमीनदार बघितले. त्यात त्याच्या शेजारीपाजारी राहणारी बरीच कुटुंबं होती. त्याने या लोकांना जमीनदारांच्या विरोधात एकत्र केलं आणि त्यांच्याशी लढण्यासाठी उद्युक्त केलं. त्याने स्वतः या उठावाचे नेतृत्व केलं. या कृत्याची शिक्षा म्हणून त्याला जबरदस्ती लष्करात भरती केलं गेलं. सहा महिने तो तिथे होता. लष्करातून बाहेर पडल्यानंतर पडल्यानंतर सापाताने परत एकदा पूर्वीचे उद्योग सुरू केले आणि बंडखोर गावकऱ्यांना एकत्र केलं. आता हे गावकरी सरळसरळ जमीनदारांवर हल्ले करू लागले आणि बळाचा वापर करून आपल्या जमिनी त्यांच्याकडून परत घेऊ लागले.
त्यावेळी डियाझ नावाचा नेता मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष होता. त्याने या गरीब शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याने फारसं काही केलं नाही. त्यांना मदतही केली नाही. त्यामुळे १९१० मध्ये सापाताने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मेक्सिकन राज्यक्रांतीची हाक दिली. त्यांच्या या बंडाला बऱ्यापैकी यश मिळालं. १९११ मध्ये त्यांनी डियाझला सत्तेवरून पायउतार होण्यास भाग पाडलं. त्यानंतर त्याच्या जागी फ्रान्सिस्को मादेरो याची अध्यक्ष म्हणून निवड झाली.
हा मादेरो उत्तरेकडचा जमीनमालक होता. १९१० मध्ये तो डियाझविरुद्ध निवडणूक हरला होता. त्यानंतर तो अमेरिकेत गेला. तिथे त्याने स्वतःला अध्यक्ष म्हणून घोषित केलं आणि तो मेक्सिकोला परतला. त्याला अनेक शेतकरी क्रांतिकारकांनी साथ दिली. सापातानेही त्याला समर्थन द्यायचं ठरवलं. परंतु मधल्या काळात डियाझने राजीनामा दिला आणि एका हंगामी नेत्याची नेमणूक करून तो युरोपात निघून गेला. त्यानंतर सापाताने मादेरोला या हंगामी अध्यक्षावर दबाव आणून त्याला शेतकऱ्यांच्या जमिनी परत देण्यास भाग पाडण्याची विनंती केली. त्यावेळी मादेरोने सर्व बंडखोरांना आपली शस्त्रास्त्रं खाली टाकण्यास सांगितलं आणि त्याचबरोबर सापातापुढे एक प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावानुसार त्याने सापाताला काहीएक रक्कम मिळवून देण्याचं मान्य केलं, जेणेकरून तो जमीन विकत घेऊ शकेल. सापाताने अर्थातच हा प्रस्ताव नाकारला. पुढे मादेरो अध्यक्ष झाल्यानंतरही त्यांच्यातील मतभेद तसेच राहिले. सापाताने प्लॅन ऑफ पायाला ही योजना तयार केली. त्यानुसार मादेरो क्रांतीचे ध्येय पूर्ण करण्यास असमर्थ आहे असं घोषित केलं.
सापाताने शेतकरीहितासाठी एका पक्षाची स्थापना केली. त्याने जमीन आणि मुक्ती (लँड अँड लिबर्टी/ Tierra y Libertad) हे घोषवाक्य स्वीकारलं. परत मिळवलेल्या जमिनी शेतकऱ्यांना देऊन काही सुधारणा घडवून आणण्यासाठीही प्रयत्न केला. त्यासाठी त्याने आपल्या अधिकारात कृषी आयोग नेमले. त्यांच्या कामावर बारीक लक्ष ठेवलं. शिवाय रुरल लोन बँकेचीही स्थापना केली.
डियाझ जाऊन मादेरो आला तरी परिस्थितीत फारसा फरक पडला नव्हता. मेक्सिकोमधील नेते शेतकऱ्यांसाठी काही करत आहेत असं सापाताला बिलकुल वाटत नव्हतं. १९१३ मध्ये हुएर्ता नावाच्या सैन्यात जनरल असलेल्या अधिकाऱ्याने मादेरोला ठार करून सत्ता आपल्याकडे खेचून घेतली. वैयक्तिकरित्या मादेरोविषयी सापाताचं मत फारसं चांगलं नसलं तरी त्याने त्याच्या जागी आलेल्या हुएर्तालाही मदत केली. मदत मिळण्याच्या आशेने आलेला हुएर्ता नाही म्हटलं तरी त्यामुळे नाउमेद झाला. १९१४ मध्ये त्याच्याही ताब्यातून सत्ता गेली. त्यानंतर सत्तेत आला करांझा. सापाताच्या दृष्टीने फक्त पटावरची प्यादी बदलत होती. शेतकऱ्यांसाठी भरीव असं काही होतच नव्हतं. या नव्या राजवटीला प्रतिकार करण्यासाठी त्याने पंचो विया नावाच्या क्रांतिकारी नेत्याशी हातमिळवणी केली. या दोघांनी एकत्र काम करत काही शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून दिल्या.
या संपूर्ण काळात एकीकडे त्यांचं राजवटीविरुद्ध युद्ध सुरूच होतं. पहिल्यापासूनच सापाताने गनिमी काव्याचा वापर केला होता. लपतछपत जात शत्रूची दाणादाण उडवायची आणि परत येऊन लपून बसायचं असं हे तंत्र. पण अशाच एका युद्धात खुद्द सापाताला आपला जीव गमवावा लागला.
आतापर्यंत सापाताने अनेक लहान मोठ्या लढाया जिंकल्या होत्या. आता तर त्याला काही व्यावसायिक सैनिकांचीही मदत मिळत होती. परंतु १९१७ मध्ये करांझाच्या सैन्यातील जनरलने वियाचा पराभव केला आणि सापाताला त्याच्यापासून वेगळं केलं. नंतर करांझाने देशाची घटना तयार करण्यासाठीची बैठक सापाताला आमंत्रित न करता बोलावली. या सभेमध्ये घटनेला संमती मिळाली आणि करांझाला प्रजासत्ताकाचा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं.
त्यानंतर विलियम गेट्स नावाच्या अमेरिकन राजदूताने सापाताची भेट घेतली आणि त्याच्यावरील लेखांची एक मालिकाच प्रसिद्ध केली. या मालिकेत त्याने सापाताच्या ताब्यात असलेला प्रदेश आणि देशाची घटना स्वीकारून त्यानुसार राज्य करणारा प्रदेश यांच्यामधील फरक ठळकपणे दाखवून दिला. त्याच्या म्हणण्यानुसार सापाताच्या ताब्यातील प्रदेशांमध्ये अधिक चांगली व्यवस्था होती आणि खऱ्या अर्थाने ती व्यवस्था सामाजिक क्रांती प्रतिबिंबित करत होती. हे लेख जेव्हा सापाताला वाचून दाखवले गेले त्यावेळी तो खऱ्या अर्थाने समाधानी झाला. "मी आता शांतपणे मरू शकतो. आता आम्हाला न्याय मिळाला आहे.'' असे त्याचे त्यावेळचे शब्द होते. त्याचं हे म्हणणं काही दिवसातच खरं ठरलं. जनरल पाब्लो गोन्झालेझ याने त्याच्याविरोधात परत एकदा युद्ध पुकारलं. त्याच्या हाताखालील कर्नल जीझस ग्वाजारदो याने सापाताच्या शेतकरी पक्षाच्या प्रतिनिधींशी गुप्त बैठक बोलावण्याचं नाटक केलं. या गुप्त बैठकीच्या ठिकाणी सापातावर हल्ला चढवण्यात आला. गंमत म्हणजे बैठकीच्या जागी तो येत असताना सुरुवातीला त्याला तिथल्या सैनिकांनी गोळ्यांच्या फैरी हवेत झाडून सलामी दिली आणि नंतर त्याच गोळ्यांनी त्याला टिपलं. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या एका निडर योद्ध्याचा शेवट झाला.
स्मिता जोगळेकर