आपल्या स्वयंपाकघरातल्या काळ्या मिरीचा लेप आणि चूर्ण कोणकोणत्या आजारांवर प्रभावी औषध आहे? आयुर्वेद काय म्हणतो?
भारतातल्या स्वयंपाकघरात सहजपणे सापडणाऱ्या मिरीने एकेकाळी तेव्हा माहिती असलेल्या जगभरातल्या तमाम लोकांना आपल्या नादाला लावलं होतं. संपूर्ण युरोपातल्या घराघरातल्या बल्लव आणि सुगरिणींसाठी मिरी हा स्वयंपाकातला अत्यंत आवश्यक घटक आहे. रोमन लोकांनी भारतासोबत सोने आणि मिरी यांचा समसमा व्यापार केल्याचं सांगतात, म्हणजे एक किलो मिरीसाठी रोमनांनी एक किलो सोनं दिलेलं आहे म्हणे! यातली अतिशयोक्ती सोडली तरी स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गुणवत्तेबरोबरच मिरीमध्ये औषधी गुणवत्ताही ठासून भरलेली आहे. म्हणूनच आज आपण या मूळतः आपल्या भारतीय उपखंडामध्ये म्हणजे प्रामुख्याने कोकण प्रांत, केरळ्, मलेशिया, इन्डोनेशिया, सिंगापूर, जावा, बाली अशा स्थानी उत्पन्न होणाऱ्या मिरीच्या औषधी गुणधर्मांची माहिती करून घेऊ.लॅटिन भाषेत मिरीला पायपर नायग्रम (Piper nigrum) असं नाव आहे. या नावामधला नायग्रम किंवा नायग्रा (निग्रा) म्हणजे काळा रंग आणि पायपर हा मिरीच्या संस्कृतमधल्या पिप्पली या नावाचा अपभ्रंश आहे. या अनुषंगाने मिरीची इतर संस्कृत भाषेतील तसेच भारतीय भाषांतली नावं समजून घेणं योग्य होईल.