घरचा आयुर्वेद: स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असणार्या कंकोळाचे औषधी गुणधर्म जाणून घ्या !!
मसाल्याच्या ज्या पदार्थांसाठी संपूर्ण युरोप भारतीय उपखंडामध्ये आपल्या वसाहती स्थापन करण्यासाठी जीवाचा आटापीटा करत होता, त्यातलाच एक पदार्थ म्हणजे कंकोळ. मसाल्यांमध्ये मिरी, लवंग आणि दालचिनीइतकं कंकोळ प्रसिद्ध नाही, पण सामिष पदार्थांसाठी बनवल्या जाणाऱ्या मसाल्यामध्ये कंकोळ हा अविभाज्य घटक असतो. प्रामुख्याने जावा, सुमात्रा आणि मलायामध्ये आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोकण आणि कर्नाटकमधील किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये कंकोळाची लागवड होते. महाबळेश्वर आणि पाचगणीचा प्रदेशही कंकोळासाठी प्रसिद्ध आहे. आता या कंकोळाच्या औषधी गुणधर्मांसंबंधी माहिती घेऊ.
नामावली -
कंकोळ दिसण्यात बरंचसं मिरीसारखं असल्यामुळे त्याची आयुर्वेदिक ग्रंथांमधील काही संस्कृत नावं मिरीच्या नावांप्रमाणे आहेत. कंकोळाच्या नावांचा आपण परिचय करून घेऊ.
• कंकोळ चवीला कटु म्हणजे तिखट असल्यामुळे कटुकफल, कटुफल, कृतफल, कोलक, कोल, कंकोल्लकम् आणि तक्कोल ही नावे आहेत.
• गंधमरिच (मिरीप्रमाणे गंध असलेला), मारीच (मिरीसारखा असा) या मिरीसदृश्य अशा दोन नावांनी कंकोळ ओळखलं जातं.
• कंकोळाची फळे गुच्छांनी येत असल्यामुळे त्यांना कोषफल, चक्रबीज, बहुबीजक अशी नावं आहेत.
• कंकोळाच्या उत्पत्तीस्थानानुसार त्यास द्विप, नीप, त्रिपुट अशी नावं आढळतात.
कंकोळ दिसतं कसं?
कंकोळाची वेल असते. ती बहुतांशी मोठ्या वृक्षांवर चढवली जाते. कंकोळाच्या वेलीची पानं लांबीला सुमारे १० ते १५ सेंमी असतात. ती आकाराने अंडाकृती आणि टोकाशी निमुळती असतात. पानाच्या पृष्ठभागावर अनेक शिरा स्पष्टपणे दिसतात. कंकोळाची फुले आकाराने छोटीछोटी आणि गुच्छाने येणारी असतात. ही साधारणतः शरद ऋतूमध्ये फुलतात. कंकोळाची पुंकेसरयुक्त आणि स्त्रीकेसरयुक्त फुले निरनिराळी येतात. कंकोळाची फळेही शरद ऋतूतच येतात. ती छोटी, गोलाकार आणि गुच्छाने येणारी असतात. ती काळ्या मिरीसारखी दिसतात. त्यांचा वास अगदी उग्र असतो. फळे चवीला कडसर तिखट असतात. असं असलं तरी फळे तोंडात ठेवता जिभेला आणि घशाला थंडावा जाणवतो.
गुणधर्म –
कंकोळाची फळे उपयोगात येतात. ती गुणाने रुक्ष म्हणजे कोरडी आणि लघु म्हणजे पचायला हलकी असतात. ती परिणामाने तीक्ष्ण आणि उष्ण असतात. चवीला तिखट असणारे कंकोळ सामान्यपणे कफ आणि वाताचे शमन करते, त्यांचे वाढलेले प्रमाण कमी करते.
बाह्य उपयोग –
• कंकोळाचे चूर्ण वेदनायुक्त सूज असेल तर त्यावर पाण्यातून लेप करून वापरतात. कंकोळ त्वचेवर लावल्यावर त्या जागेला उत्तेजना देतो आणि तिथला रक्ताचा प्रवाह सुरळीत करतो. परिणामी तिथल्या सूज आणि वेदना कमी होतात.
• पुवाळलेल्या जखमांवर कंकोळाचे तेल लावतात. ते जखम भरून आणणारे आणि दुर्गन्धीनाशक असल्यामुळे पू कमी होतो आणि जखम भरून येते.
• दुर्गंधीनाशक गुणामुळे दन्तरोग, मुखरोग, गलरोगांमध्ये कंकोळ तोंडात धरतात. याच कारणाने कंकोळ दंतमंजनामध्येही वापरतात.
• घामाची दुर्गंधी कमी करण्यासाठी कंकोळ चूर्ण उटण्यामध्ये टाकतात.
• कंकोळाचा लैंगिक दुर्बलतेमध्येही लेप केला जातो.
आभ्यन्तर (पोटात घेऊन) उपयोग –
• पचनसंस्थान –
कंकोळ तोंडाला रुची देणारे, भूक वाढवणारे, पाचक आणि वाढलेल्या वायुला खालच्या मार्गाने बाहेर काढणारे (अनुलोमन) असल्यामुळे भूक न लागणे, तोंडाला चव नसणे, अपचन, पोटफुगी अशा रोगांमध्ये उपयोगी पडते.
• श्वसनसंस्थान –
कंकोळ घट्ट झालेला कफ पातळ करून बाहेर काढतो. यामुळे कफाने बदबदलेल्या खोकल्यात आणि दम्यामध्ये कंकोळाचे चूर्ण वापरतात. यामुळे घट्ट कफ पातळ होऊन बाहेर पडतो आणि खोकला-दम्याच्या त्रासात आराम पडतो. घसादुखीमध्ये कंकोळ तोंडात धरून चघळण्याने घशाला थंडावा मिळून बरं वाटतं. कफाने डोके जड झाले असेल तर कंकोळाचे चूर्ण तपकिरीसारखे नाकाने ओढल्यास कफ बाहेर पडून आराम वाटतो. दमा आणि खोकल्यामध्ये हृदयाची धडधड होत असतानाही कंकोळ चूर्ण उपयोगी पडते.
• प्रजननसंस्थान –
कंकोळ रक्ताच्या प्रवाहातील अडथळा दूर करून तिथे स्थानिक उत्तेजना निर्माण करत असल्यामुळे स्त्रियांमध्ये वेदनायुक्त पाळीच्या त्रासामध्ये कंकोळाचे चूर्ण वापरतात. लैंगिक दुर्बलतेमध्येही या चूर्णाचा उपयोग होतो.
• मूत्रवहनसंस्थान –
वायुला खालच्या दिशेने बाहेर काढण्याचा गुण असल्यामुळे कंकोळ अडलेला मूत्रप्रवाह सुरळीत करण्यासाठी वापरतात. दुर्गंधीनाशक गुणामुळे प्रमेह या रोगात येणारा शरीराचा दुर्गंध घालवण्यासाठी कंकोळ वापरतात.
स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असणार्या छोट्या पण गुणवान कंकोळाच्या गुणांची माहिती घेऊन शक्य तिथे त्याचा योग्य तो उपयोग करून घेणे आपल्यासाठी खूपच उपयुक्त होईल, यात नक्कीच शंका नाही.
लेखक : डॉ. प्रसाद अकोलकर