computer

आरोग्यदायक तुळशीचे सात आयुर्वेदिक फायदे: कधी तिचा रस/लेप लावावा आणि कधी रस/चूर्ण पोटात घ्यावं?

तुलसी (तुळस) किंवा Ocinum sanctum या लॅटिन नावाने ओळखली जाणारी वनस्पती भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून आरोग्य आणि आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस तशी अनेक नावांनी ओळखली जाते. तिची काही नावं तिचं आध्यात्मिक महत्त्व दर्शवतात, तर काही नावं तिचं आरोग्यदायिनी होण्यामागचं कारण सांगतात.

तुळशीचं आध्यात्मिक महत्त्व

तुलसी (तुळस) – भगवान श्रीकृष्णाची तुला पूर्ण होण्यासाठी उपयोगी पडल्यामुळे या वनस्पतीला तुलसी (तुळस) हे नाव पडलं. असं म्हणतात की श्रीकृष्णाची तुला म्हणजे त्याच्या वजनाएवढ्या संपत्तीच्या दानाचा संकल्प केला गेला असताना उपलब्ध संपत्ती दुसऱ्या पारडयात टाकूनही श्रीकृष्णाचंच पारडं जड राहिलं. तेव्हा तुळशीचं एक पान त्यात टाकताच दोन्ही पारडी समान होऊन ही तुला (तुलना) पूर्ण झाली. त्यामुळे श्रीकृष्णाला दाखवलेला नैवेद्यही त्यावर तुळशीचं पान ठेवल्यावरच श्रीकृष्णापर्यंत पोहोचतो ही समजूत दृढ झाली आणि श्रीकृष्णाच्या अर्चनेमध्ये तुळशीला खूप महत्त्व प्राप्त झालं. ती पापांचा नाश करते असंही मानलं जातं.

तुळस दिसते कशी?

तुळशीचं झुडूप लहानसं असतं. हिची पानं २ ते ३ सेमी लांब, गोलसर आकाराची आणि तीक्ष्ण सुगंध असलेली असतात. हिला फुलं मंजिऱ्यांच्या स्वरूपात येतात आणि पुष्प-मंजिरी एका वेळी सुमारे १२ ते १५ सेमी लांब असू शकतात. तुळशीचं बी काळसर, आकाराने लहान असतं. तुळस साधारण शीत कालामध्ये फळते.

तुळशीचे सामान्यपणे २ प्रकार दिसतात. १. पांढरी तुळस आणि २. काळी तुळस. याखेरिज रानतुळस आणि कापूर-तुळस असेही प्रकार सांगितले जातात. काळी तुळस तुलनेने अधिक उत्तम मानतात. कापूर-तुळशीपासून कापूर काढतात.

तुळशीची विविध नावं -

तुळशीची लोकप्रियता तिला मिळालेल्या अनेक नावांमधून आपल्याला सहज लक्षात येते. या नावांमध्ये तिचे गुणही खुबीने गुंफलेले दिसतात. तुळशीची अशी काही नावं बघणं ही एक माहितीची पर्वणीच ठरेल –

वृन्दा, सुलभा, गौरी – ही सामान्यपणे पांढऱ्या तुळशीची नावं आहेत.
श्यामा, ग्राम्या, श्रेष्ठा – ही सामान्यपणे कृष्ण-तुळशीची नावं आहेत.
विष्णुवल्लभा, हरिप्रिया, विष्णुपत्नी, सुरवल्लरी, वैष्णवी, कृष्णवल्लभा, देवदुंदुभी, पावनी - श्रीकृष्णाला अतिप्रिय असल्यामुळे तुलसी अशा निरनिराळ्या नावांनी प्रसिद्ध आहे.
मंजरी, बहुमंजरी, त्रिदशमंजरी - तुळशीला भरपूर मंजिऱ्या येत असल्यामुळे ती या नावांनी ओळखली जाते.
अपेतराक्षसी, भूतघ्नी, प्रेतराक्षसी – बारीक-सारीक जन्तु हिच्यापासून दूर राहतात. म्हणून तुळशीला या नावांनी ओळखतात.
सुरसा, पर्णांसि, सुवहा – तुळशीच्या पानांचा भरपूर रस निघतो म्हणून तिची ही काही नावं आहेत.
तीव्रा, सुगंधा, गंधहारिणी, सुरभिमंजरी, सुरभी – तुळशीच्या तीक्ष्ण सुगंधामुळे ती या नावांनी ओळखली जाते.

यांबरोबरच तुळस तेलुगुमध्ये गाप्पराचेट्ट, हिन्दी-बंगाली-कन्नड-तामिळमध्ये तुलसी आणि इंग्लिशमध्ये Holy Basil या नावाने ओळखली जाते.

तुळशीचे औषधी उपयोग

तुळस ही कफ आणि वात यांचा नाश करणारी आणि काही प्रमाणात पित्त वाढवणारी आहे. ती प्रामुख्याने कफ-वाताच्या रोगांमध्ये औषध म्हणून वापरली जाते. तुळशीची पानं आणि बी यांचा उपयोग प्रामुख्याने औषधांमध्ये होताना दिसतो. तुळशीचा रस घ्यायचा असेल तर एका वेळी सुमारे २० ते ३० मिली रस किंवा मग चूर्ण घ्यायचे असेल तर सुमारे १ ते ३ ग्राम इतकं तुळशीचूर्ण खावं असं आयुर्वेद सांगतो.

औषधी उपयोगाचा विचार करताना तुळशीच्या बाहेरचे म्हणजे लेप किंवा रस वगैरे लावून आणि रस किंवा चूर्ण रूपात पोटात घेऊन अशा दोन्ही वापरांचा विचार करावा लागतो.

बाह्योपचार –

तुळस ही जन्तुनाशक, दुर्गन्धीनाशक, उत्तेजक, सूज कमी करणारी, वेदना शमन करणारी आणि वात कमी करणारी असल्यामुळे जुनाट जखमा, सूज, वेदना यांवर तुळशीच्या पानांचा लेप घालतात. त्वचेला बधीरपणा आला असता तिथे तुळशीच्या पानांचा रस चोळतात. कान दुखत असल्यास कानात तुळशीचा रस भरतात. कान, डोके अशा अवयवांतील बाह्य कृमींमध्ये तुळशीच्या रसाने तो भाग धुण्याची परंपरा आहे.

पोटात घेऊन उपचार –

पचनसंस्थेचे रोग:

तुळस ही गुणाने भूक वाढवणारी, अन्नपचनाला साहाय्य करणारी, वाताचे अनुलोमन करणारी म्हणजे वात खालच्या दिशेने नेणारी आणि जन्तांना मारून बाहेर काढणारी असल्यामुळे अग्निमांद्य, अपचन, उलटी होणे, पोटदुखी, जन्ताचे विकार यांमध्ये तुळशीचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. अतिसारामध्ये तुळशीच्या बियांची खीर करून दिली जाते. यामुळे पोटाला आधार मिळून शक्ती प्राप्त होते आणि तिच्या बुळबुळीतपणामुळे जुलाब बरे होतात.

श्वसनसंस्थेचे रोग:

वात आणि कफ कमी करणारी असल्यामुळे तुळस श्वसनासंस्थेच्या रोगांवर खूपच उपयुक्त आहे. सर्दी-पडसे, दम लागणे, खोकला, कूस दुखणे, ताप येणे अशा रोगांमध्ये तुळशीचा रस किंवा चूर्ण मध घालून खाण्याने कफ कमी होऊन आणि वाढलेल्या वायूचे अनुलोमन होऊन आराम मिळतो. घसा दुखून खोकल्याची ढास लागत असेल तर तुळशीची पानं खडीसाखरेबरोबर चघळून खाण्याने ढास कमी होते.

रक्तवहनसंस्थेचे रोग:

तुळस हृदयाला उत्तेजक, रक्त शुद्ध करणारी, सूज कमी करणारी असल्यामुळे हृदय-दौर्बल्य, रक्तामधील कफ-वाताचे विकार आणि सूज यामध्ये तुळस खूप प्रभावी ठरते.

मूत्रवहनसंस्थेचे रोग:

तुळशीची बी मूत्रल म्हणजे लघवी करवणारी आहे. मूत्रदाह, मूत्राशयाची सूज, मूत्र अडकल्यासारखं वाटणं यांमध्ये ती शामक म्हणजे जळजळ कमी करते. लघवीची जळजळ होत असताना तुळशीची बी पाण्यातून दिल्याने मूत्रमार्गाची आग कमी होऊन आराम पडतो.

त्वचेचे रोग:

तुळस घाम आणणारी आहे. त्वचा रोगांवरही कार्यकारी आहे. विशेषतः पामा, दद्रु, त्वचेवरील खाजणारे-पाणी स्रवणारे चट्टे यांमध्ये तुळस उपयोगी पडते. गजकर्णावर तुळशीची पानं आणि मिरे एकत्र कुटून लावल्यास चांगला उपयोग होतो.

ज्वर रोग:

तुळस तापावरील चांगलं औषध आहे. थंडी वाजून ताप येत असल्यास, विषमज्वरावस्थेमध्ये आणि जुनाट तापाच्या विकारामध्ये तुळशीच्या पानांचा रस किंवा काढा (गरजेनुसार लवंग, मिरे, दालचिनी, सुण्ठ इ. घालून) उपयुक्त आहे. तुळशीच्या झाडाजवळ डास येत नाहीत असं मानलं जातं यामुळे घराच्या आसपास तुळशीची झाडं लावण्याची आपल्याकडे परंपरा दिसते.

बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या अनेक औषधांच्या निर्मितीमध्ये तुळशीच्या रसाचा वापर केलेला असतो. पण सामान्यपणे तुळशीच्या पानांचं चूर्णच बहुतांशी मिळतं. आपल्या घरात तुळशीची लागवड करून आपल्याला ताजी तुळस उपलब्ध होऊ शकते. तिचाच वापार केव्हाही उत्तम होय! तुळशीच्या पानांतील उडनशील तेलाचा वापर करून हल्ली तुलसी ड्रॉप्सही बाजारात मिळतात. त्यांचाही वापर गरजेनुसार करायला काहीच हरकत नाही.

अशाप्रकारे आध्यात्मिक आणि आयुर्वैद्यक दृष्टीने अत्यंत उपयोगी अशा तुळशीचा वापर सध्याच्या परिस्थितीमध्ये फार आवश्यक ठरेल यात काहीच शंका नाही.

 

लेखक : डॉ. प्रसाद अकोलकर
[email protected]

 

आणखी वाचा :

आपल्या आसपास आढळणाऱ्या अमृतवल्ली गुळवेलीचे आयुर्वेदप्रमाणित ७ अत्यंत महत्त्वाचे औषधी उपयोग!!

सबस्क्राईब करा

* indicates required