अश्वगंधा :जाणून घ्या आयुर्वेदातील सर्वात प्रसिद्ध वनौषधीचे ५ उपयोग!!
सध्याच्या परिस्थितीत उपाय म्हणून आयुर्वेदिक वनौषधींकडे समाजाचे पुन्हा एकदा लक्ष गेले आहे आणि त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. या दृष्टीनेच आज आपण प्रसिद्ध अशा अश्वगंधा या वनौषधीची अधिक माहिती करून घेऊ.
अश्वगंधा ही आयुर्वेदातल्या सर्वात प्रसिद्ध वनौषधींपैकी एक आहे. मराठीमध्ये ढोरगुंज या नावाने ओळखल्या जाणा-या अश्वगंधेला आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये ४७ वेगवेगळी नावे आहेत. अश्वगंधेच्या उपयोगांची माहिती करून घेण्यापूर्वी आपण यापैकी काही नावांमागचे शास्त्र समजून घेऊ.
अश्वगंधेची नावे -
• अश्वगंधेच्या ओल्या मुळांना घोड्यासारखा वास येतो. म्हणून तिची अश्वगंधा, वाजिगंधा, तुरगी, वाजिनी, हया, हयी, वाजिनामा, हयगंधा, हयाह्वा, हयप्रिया इ. घोड्यांशी संबंधीत नावं आहेत. अश्व, वाजि, हय, तुरग ही सर्व नावे किंवा शब्द घोड्यासाठी वापरले जातात.
• अश्वगंधेच्या या ओल्या मुळांचा वास चांगलाच उग्र असल्यामुळे ती कुष्ठगंधिनी, कुष्ठगंधा, गन्धान्ता, गंधपत्री इ. नावांनी ओळखली जाते.
• उग्र गंध आणि पानांचा विशिष्ट आकार यामुळे अश्वगंधेला वराहकर्णी, वाराहपुत्रि, वराहिका, वराहपुत्रि, गोकर्णी इ. नावे दिलेली आहेत. तुम्हांला माहित आहेच, संस्कृतमध्ये वराह म्हणजे डुक्कर आणि गो म्हणजे गाय.
• अश्वगंधेला तिच्या उपयोगानुसार पुष्टिदा, बलदा, बल्या, वृषा इ. नावे दिलेली दिसतात.
• अश्वगंधेला मराठीत ढोरगुंज म्हणतात हे वर सांगितलेलं आहेच, पण सोबतच तिला आस्कंध असंही एक नाव आहे. तिला हिन्दीमध्ये असगंध, बंगालीमध्ये अश्वगंधा, गुजरातीमध्ये आसंघ, घोडाआहन आणि घोडाआकुन, तमिळमध्ये आमकुलांग, तेलुगूमध्ये पिनिरु म्हणतात. इंग्लिशमध्ये अश्वगंधा विण्टर चेरी या नावानं ओळखली जाते.
अश्वगंधेचे स्वरूप –
अश्वगंधेचे झाड सुमारे १ ते २ मीटर उंच असते. फांद्या गोलाकार आणि चारही बाजूला असणाऱ्या असतात. अश्वगंधेची पानं ५ ते १० सेंमी लांब, गोल, पांढरी लव असणारी असतात. फळे लहान, गोल, रसरशीत, कोशाच्या आत असणारी आणि पिकल्यावर लाल गुंजेसारखी दिसतात. म्हणूनच तिला ढोरगुंज म्हणत असावेत. अश्वगंधेच्या बिया लहान, गुळगुळीत आणि चपट्या असतात. मुळे मातकट रंगाची आणि उग्र वासाची असतात. म्हणून तिची अश्वगंधा किंवा कुष्ठगंधिनी इत्यादी नावे आहेत.
अश्वगंधेचे उपयोग –
अश्वगंधेची मुळे सामान्यपणे औषधी म्हणून वापरतात. ती चवीला कडू-तुरट असतात. काही वेळेला बाह्य उपचारांमध्ये अश्वगंधेची पानंही वापरली जातात.
बाह्य उपयोग –
गालगुण्ड, गाठीची सूज यावर अश्वगंधेच्या पानांचा किंवा मुळांचा पाण्यातून लेप घालतात. अश्वगंधेच्या मुळांनी सिद्ध केलेल्या तेलाने वातव्याधींमध्ये आणि अंगदुखीमध्ये अंगाला मसाज (अभ्यङ्ग) केला जातो.
पोटात घेऊन (आभ्यन्तर) उपयोग –
1. नाडी संस्थान – वातवाहिन्यांची म्हणजेच मज्जातन्तूंची क्षीणता, शरीर दौर्बल्य, मूर्च्छा (बेशुद्ध पडणे), थोड्या हालचालींनी दमणे - श्रम होणे, झोप न येणे, आणि वाताच्या विकारांमध्ये अश्वगंधा वापरतात. अश्वगंधेच्या मुळ्या वापरल्यामुळे वातनाडयांना म्हणजे मज्जातन्तूंना आणि मस्तिष्काला शक्ती मिळते.
2. श्वसन संस्थान – अश्वगंधा गुणाने कफाचा नाश करणारी आणि दमा दूर करणारी औषधी आहे. दम्याच्या आणि श्वास घेण्यात कष्ट होण्याच्या लक्षणांमध्ये अश्वगंधेच्या मुळांची राख ही मध आणि तुपातून चाटवतात. फक्त याचा वापर करताना मध आणि तूप यांचं प्रमाण एकसमान नसावं. कफ पातळ असताना अश्वगंधाच्या मुळांपासून बनवलेल्या कोळश्याचा चांगला उपयोग होतो. इथे हे ध्यानात ठेवणे आवश्यक असते की अश्वगंधेची मुळी जाळून तिची राख केली जाते आणि याच क्रियेदरम्यान हवाबंद ज्वलन केल्यास तिचा कोळसा बनतो. कफ, दमा, सर्दी, खोकला अशा लक्षणांमध्ये मधाबरोबर हा उपचार करण्यासाठी वापरला जातो.
3. पाचन संस्थान – अश्वगंधा भूक वाढवणारी, वाताला गुदमार्गाने बाहेर काढणारी आणि कृमींना दूर करणारी असल्यामुळे पोटदुखी, पोटाला तडस लागणे, जन्त होणे या रोगांमध्ये वापरतात. जेवणानंतर लगेच होणा-या पोटदुखीसाठी (परिणाम शूल) अश्वगंधाच्या सालीचे चूर्ण चांगले उपयोगी पडते.
4. रक्तवह संस्थान – अश्वगंधा हृदयाला बळ देणारी, रक्त शुद्ध करणारी, सूज दूर करणारी असल्यामुळे तिचा वापर हृदयाच्या दुर्बलतेमध्ये, रक्त विकारांमध्ये, आणि सूज असताना केला जातो. आमवात, संधिवात अशा सान्ध्यांच्या रोगांमध्ये अश्वगंधेचा काढा खूप चांगले परिणाम दाखवतो.
5. प्रजनन संस्थान – अश्वगंधेचा सर्वाधिक उपयोग लैंगिक दुर्बलतेमध्ये केला जातो. शुक्र दौर्बल्यामध्ये अश्वगंधेचा मोठ्याप्रमाणावर उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे महिलांमध्ये गर्भाशयाच्या दुर्बलतेमुळे निर्माण होणा-या श्वेतप्रदर व्याधीमध्ये अश्वगंधा उपयुक्त आहे. गर्भाशयाच्या दुर्बलतेमुळे महिलांमध्ये निर्माण होणा-या अनियमित ऋतुस्रावामध्ये आणि लांबलेल्या ऋतुस्रावामध्ये अश्वगंधेचा वापर केला जातो. बाळंतपणानंतर उत्पन्न होणा-या कंबरदुखीमध्ये अश्वगंधा चूर्ण, तूप आणि साखरेबरोबर दुधाबरोबर दिल्यास उत्तम फायदा होताना दिसतो. प्रजनन संस्थानाशी संबंधीत मांसपेशींना बल देत असल्यामुळे अश्वगंधा लघवी व्यवस्थित होण्यासाठी मूत्रल म्हणून वापरली जाते.
अश्वगंधा बाजारामध्ये अख्ख्या तसेच चूर्ण रूपामध्ये मिळते. यांपासून काढा बनवून तिचा प्रयोग करता येतो. त्याशिवाय अश्वगंधा घृत, अश्वगंधा रसायन, अश्वगंधारिष्ट इ. औषधांच्या स्वरूपात अश्वगंधा उपलब्ध असते.
शरीराची दुर्बलता दूर करणारी, सर्दी, कफ, खोकला, दमा इ. लक्षणांमध्ये लाभकारक, हृदयाला बल देणारी आणि मांसपेशी आणि मज्जातन्तूंना शक्ती देणारी अश्वगंधा सध्याच्या काळामध्ये स्वास्थ्य-प्राप्तीसाठी निश्चितच लाभकारक आहे.
लेखक : डॉ. प्रसाद अकोलकर