रणरागिणींच्या कथा: एका दमात सात शीर छाटणारी, २००० सैनिकांविरुद्ध ३०० सामुराईंसोबत युद्ध जिंकणारी तोमयो गोझेन!!
सामुराई म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते जापनीज योद्धे, बरोबर ना? पण तुम्हाला काय वाटतं, त्या काळात कुणी महिला सामुराई होऊन गेल्या असतील का? युद्धभूमी हे पुरुषांचे क्षेत्र असे समजले जाते. पण तसे अजिबात नाही. भारतात आणि जगात सगळीकडे स्त्रियांनी युद्धभूमीवर आपले शौर्य गाजवले आहे. जपानही याला अपवाद नाही. आपल्याला पुरुष योद्ध्याला जपानमध्ये सामुराई म्हणतात हे माहित आहे. आणि हो, स्त्री सामुराईही असतात. त्यांना जपानमध्ये ओना-बुगेशा म्हटले जायचे. या ओना-बुगेशा म्हणजे महिला सामुराईंना देखील पुरुषांइतकेच कठोर प्रशिक्षण पूर्ण करावे लागे. सुमारे १००० वर्षापूर्वी होऊन गेलेल्या अनेक अशा महिला सामुराईंच्या कथा जपानी इतिहासाच्या पानापानावर आढळतात. आज आपण अशाच एका ओना-बुगेशा म्हणजेच महिला सामुराईची कथा पाहणार आहोत, तिचे नाव आहे तोमयो गोझेन.तोमयो गोझेन १२ व्या शतकात होऊन गेली. त्याकाळात तोमयो गोझेनशी टक्कर घेऊ शकेल असा एकही योद्धा नव्हता असे म्हटले जाते. तिची बुद्धी आणि शौर्य अतुलनीय होते. याच काळात म्हणजे ११८० ते ११८५ च्या दरम्यान जपानमध्ये प्रसिद्ध गेनेपी युद्ध लढले गेले होते. हे युद्ध जपानमधील मिनामोटो आणि तायरा या दोन राजघराण्यांमध्ये लढले गेले. तोमयो ही मिनामोटो वंशाचा राजा योशिनाका याची प्रेयसी होती. नुसत्याच प्रेमाच्या आणाभाका घेऊन नाही, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून तिने राजाला साथ दिली. तिच्या योगदानामुळेच मिनामोटो राजघराणे विजयी ठरले आणि अखंड जपानवर आपली हुकूमत प्रस्थापित करण्यात या राजघराण्याला यश आले.युद्धभूमीवर शत्रूचे शीर छाटणे म्हणजे त्याकाळी केवढा तरी मोठा पराक्रम समजला जायचा. असे शीर छाटणाऱ्या योद्ध्याला महापराक्रमी संबोधले जायचे. १८११ साली योकोतागावराच्या युद्धात तोमयोने सात योद्ध्यांचे शीर एका दमात छाटले होते. यावरून तुम्ही तिच्या पराक्रमाचा आणि साहसाचा अंदाज बांधू शकता. एखादा जंगली घोडा काबूत करणे म्हणजे तिच्यासाठी एखाद्या लहान मुलाला खेळवण्यासारखे होते असे म्हटले जाई. घोडेस्वारी आणि धनुर्विद्या म्हणजे तिच्यासाठी डाव्या हातचा मळ. महिला सामुराईंसाठी जपानमध्ये थोड्या कमी लांबीच्या तलवारी बनवल्या. या तलवारींना ते नॅगीनाटा म्हणत. पण तोमयोने हे खास महिलांसाठीचे शस्त्र कधीच वापरले नाही. पुरुष सामुराई ज्या प्रकारच्या लांब आणि सरळ आकाराच्या तलवारी वापरत, त्याच प्रकारची शस्त्रे चालवण्यात तिचा हातखंडा होता.