रणरागिणींच्या कथा: अतुलनीय योद्धा आणि जन्म-मृत्यूच्या पलिकडे गेलेली आयरिश देवता-स्काहा!!
आजच्या काळात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. पण प्राचीन काळी संस्कृतीच्या जोखडात बांधले गेले असतानाही त्यांनी आपलं वेगळेपण जपलं होतं. जगभरातील संस्कृतीत स्त्रियांना “सेकंड सेक्स” म्हणून हिणवण्यात आलं, दुय्यम स्थान देऊन त्यांना नाकारण्यात आलं असलं तरी देशोदेशींच्या पुराणकथांमध्येही लढवय्या आणि जाँबाज स्त्रियांची वर्णनेही आढळतात. या सर्व रणरागिणींनी पुरुषी वर्चस्वाला दुर्लक्षित करून आपली छाप निर्माण केली. आज आम्ही गोष्ट घेऊन आलोय आर्यलँडच्या पुराणकथेतल्या स्काहा नावाच्या जबरदस्त योद्धा महिलेची. या स्काहाने अनेक जिगरबाज लढवय्ये तयार केले. कोण होती ही स्काहा आणि आयरिश पुराणकथा तिला इतके महत्त्व का देतात जाणून घेऊया या लेखातून.
मागच्या पिढीपासून पुढच्या पिढीकडे अव्याहतपणे हस्तांतरित केली जाणारी गोष्ट म्हणजे संस्कृती आणि पुराणकथा. म्हणूनच आयरिश लोकांना स्काहा या नावाचा कधीच विसर पडणार नाही. कारण प्रत्येक पिढी या शूर योद्धा स्त्रीबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असते. स्काहा हे नाव आयरिश हृदयात कायमचंच कोरलं गेलं आहे. स्काहा म्हणजे गूढ वलय असलेली स्त्री. स्काहा आपल्या नावाप्रमाणेच होती. स्काहा हे नाव सुमारे इसवी सन पूर्व १३०० पासून आयरिश पुराणकथांमध्ये व्यापून राहिलं आहे.
स्काहा ही आयरिश लोकांसाठी एक प्रेरणास्थान आणि श्रद्धास्थान असली तरी स्काहा मूळची आयरिश नव्हती. ती स्कॉटलंडवरून आयर्लंडमध्ये आली होती असे म्हटले जाते. अल्पीच भागातून म्हणजेच आताच्या स्कॉटलंडमधून ती आली आणि स्कायच्या छोट्याशा बेटावर राहत होती. या बेटावर स्काहाचा किल्ला होता. स्काहाला एक बहिण होती, तीचं नाव एफे. एफे देखील स्काहाप्रमाणेच लढवय्यी आणि योद्धा होती. आयरिश पुराणकथेत एफेचाही अनेक ठिकाणी उल्लेख केलेला दिसतो. अल्पी भागाच्या पूर्वेला असलेला प्रदेश एफेच्या ताब्यात होता. स्काहा आणि एफे दोघीही बहिणी-बहिणी असल्या तरी त्याच्यातून विस्तवही आड जात नव्हता. दोघीही एकमेकींच्या कट्टर शत्रू होत्या असे म्हटले जाते. एफेशी टक्कर घेण्यासाठी स्काहानी कु कुलेन या आपल्याच विद्यार्थ्याची मदत घेतली होती. कु कुलेनने आपल्या गुरूच्या या शत्रूला नामोहरम करून स्वर्गात स्थान मिळवले होते असंही ही पुराण कथा सांगते.
स्काहाकडून युध्दकलेचे शिक्षण घेणे म्हणजे एक दिव्यच असे. तिचे शिष्यत्व पत्करणाऱ्याला आधी तिचा शोध घ्यावा लागे. स्कायच्या छोट्याशा बेटावर पोहोचून तिच्या किल्ल्यात प्रवेश मिळवण्यासाठीही बऱ्याच अडथळ्यांचा सामना करावा लागत असे. स्काहाच्या या किल्ल्याची रखवालदार होती तिची मुलगी उहा. त्या किल्ल्याशी पोहोचल्यावर मग गाठ होती या उहाशी. हे सगळं पार करणे म्हणजे फक्त प्राथमिक शिक्षण. खरे शिक्षण तर स्काहाच्या राजगृहात पोहोचल्यावरच सुरु होई. पण युद्धकलेत प्राविण्य मिळवण्यासाठी अनेक योद्धे हे अवघड शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करत असत.
कु कुलेन हा त्या काळाचा एक योद्धा इतकी सारी दिव्यं पार करून स्काहाच्या त्या किल्ल्यात पोहोचण्यात यशस्वी ठरला होता. असे म्हटले जाते की कु कुलेन हा स्काहाचा अत्यंत आवडता शिष्य. कु कुलेनचे एका राजकुमारीवर प्रेम होते, तिला मिळवण्यासाठी तिच्या वडिलांनी कु कुलेन समोर स्काहाचे शिष्यत्व पत्करण्याची अट घातली होती. स्काहाचे शिष्यत्व म्हणजे दुर्मिळ बाब असा ठाम विश्वास असल्यानेच त्यांनी कु कुलेन समोर ही कठीण वाटणारी अट ठेवली होती. पण प्रेमासाठी काय पण, म्हणत या प्रेमवीराने ही अट पूर्ण केली होती. कु कुलेन स्काहाच्या संपूर्ण युद्धविद्येत तरबेज झाला होता. स्काहाने स्वतःचे असे एक शस्त्रही बनवले होते, जे की दुरून फेकले तरी दूरवरील शत्रूचे कवच भेदून त्यांचा खातमा करू शकत होते.
कु कुलेनने स्काहाकडून तिच्या सगळ्या युद्धकला आत्मसात केल्या. स्काहा आपल्या विद्यार्थ्यांना पाण्यात उतरून लढाई करण्याचे शिक्षणही देत असे. आपल्या गुरुप्रती असलेली निष्ठा दाखवण्यासाठी कु कुलेनने स्काहाची सर्वात मोठी शत्रू एफेशीही युद्ध केले आणि तिला नामोहरम करून स्काहाला अभय प्राप्त करून दिले.
स्काहाला परलोकात प्रवेश करण्याचा मार्ग माहिती होता आणि ती त्या मार्गाची रक्षणकर्ती होती. ती जन्म आणि मृत्यूच्याही पलीकडे पोहोचली होती. तिच्या शिष्यांनाही हे वरदान प्राप्त करण्याची कला ती शिकवत असे, असे म्हटले जाते. म्हणूनच तिला आयरिश पुराणकथेत मृत्यू लोकाची देवता असेही म्हटले गेले.
कु कुलेनला प्रशिक्षण देणे आणि त्याला आयर्लंडचा एक महान योद्धा बनण्यास मदत करणे एवढ्या कामगिरीसाठीही आर्यलंडने तिचे ऋण कधीही विसरले नसते. एक स्त्री असूनही तिला पुरुष योद्ध्यांनीही भरपूर सन्मान दिला. तिचा आवेश आणि खंबीर वृत्ती पाहून भले भले थक्क होत असत. तिच्या या अतुलनीय गुणांसाठीच तर आजही ती आयरिश लोकांमध्ये एखाद्या देवतेसमान पूजली जाते.
स्काहा या आयरिश देवतेची ही कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा.
मेघश्री श्रेष्ठी