रणरागिणींच्या कथा: बलाढ्य रोमन सत्तेची गुलामी झुगारून युरोप ते इजिप्तपर्यंत साम्राज्यविस्तार करणारी राणी झिनोबिया!
युद्ध आणि साम्राज्यविस्तार म्हटले की आपल्याला फक्त बलाढ्य सत्ता आणि त्यांचे राजे आठवतात. पण, इतिहासात अशा काही राण्याही होऊन गेल्या ज्यांनी राज्याची धुरा हातात आल्यानंतर आश्चर्यकारक पद्धतीने साम्राज्य विस्तार केला आणि आपले राज्य बलशाली बनवले. तिसऱ्या शतकातील पाल्मेरियन साम्राज्याची सम्राज्ञी झेनोबियाही अशीच एक शूर राणी होती जिने बलाढ्य रोमन सत्तेची गुलामी झुगारून आपले राज्य अधिक बलशाली बनवले आणि त्याच्या सीमाही विस्तारल्या. आज आपण याच शूर विरांगणेबद्दल जाणून घेणार आहोत. कोण होती ही राणी झेनेबिया आणि रोमन सत्तेला आव्हान देण्याची हिंमत तिच्यात कुठून आली?
तिसऱ्या शतकात म्हणजेच २६७-२७२ साली, पाल्मेरियन साम्राज्याची सूत्रे राणी झिनोबियाकडे आली. तिचा नवरा म्हणजे पाल्मेरियन साम्राज्याचा राजा ओडीनॅथसचा मृत्यू झाला. परंपरेनुसार राजानंतर तिचा मुलगा व्हेबालॅथस हा साम्राज्याचा उत्तराधिकारी ठरला, पण व्हेबालॅथसचे वय लहान असल्याने राणीने राज्याची सगळी सूत्रे स्वतःकडेच घेतली.
सुरुवातीला तिनेही राजा ओडीनॅथसचीच धोरणे अवलंबली. बलाढ्य रोमन साम्राज्याच्या सीमेवर असलेले हे छोटेसे साम्राज्य रोमन सत्तेशी कायम सहकार्याने वागत आले आणि राणी झिनोबियानेही काही वर्षे हेच धोरण अवलंबले. नंतर रोमन साम्राज्यातील आंतरिक बंडाळी आणि अस्थिरतेमुळे तिने रोमन साम्राज्याशी असलेले मैत्रीयुक्त संबंध धुडकावून लावले आणि आजूबाजूचा प्रदेशावर चढाई करून आपला सम्राज्य विस्तार करण्याचे नवे आक्रमक धोरण अंमलात आणले.
२६९ साली तिने आपले लष्कर अधिक प्रबळ करण्याकडे लक्ष दिले. पूर्वेकडे आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याच्या दृष्टीने तिने काही मोहिमा आखल्या. रोमन साम्राज्य अस्थिर झाल्याने सीमेवरील प्रदेशाकडे त्यांचे दुर्लक्षच झाले होते याचाच फायदा घेत राणी झिनोबियाने रोमचा एकेक प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडून घेण्यास सुरुवात केली. सध्याच्या सिरीयापासून ते तुर्की आणि इजिप्तपर्यंत तिने आपला साम्राज्यविस्तार केला होता. म्हणजेच नकाशा पाह्यला तर बाई युरोपातून मध्य आशियामार्गे आफ्रिका खंडापर्यंत पोचल्या होत्या!!
इजिप्तपर्यंत मजल गाठल्यानंतर तिने आशिया मिनार आणि फोएनिशीया(आताच्या लेबाननचा प्राचीन काळातला भूभाग) ही ताब्यात घेतला. शेजारच्या राज्यांशी चर्चा करून आपले व्यापारी आणि राजकीय संबंध आणखी दृढ करण्यातही ती यशस्वी झाली. तिचे चातुर्य आणि सर्वव्यापी विकास साधण्याची विजिगीषू वृत्ती यामुळे पुढील कित्येक वर्षे तिच्या साम्राज्याची भरभराट होत राहिली.
२७१ साली रोमन साम्राज्याची सूत्रे ऑरेलियन राजाच्या हाती आली. आपल्या शेजारच्या एका छोट्याशा राज्याची झालेली प्रगती त्याला बघवली नाही आणि राणी झिनोबियाविरुद्ध त्याने युद्ध पुकारले. २७२ साली रोमन साम्राज्य आणि पाल्मेरीयन साम्राज्य यांच्यात झालेले युद्ध हे इतिहासात बॅटल ऑफ इम्मी नावाने प्रसिद्ध आहे. इम्मीच्या या लढाईत बलाढ्य रोमन साम्राज्याच्या अद्ययावत सैन्यापुढे पाल्मेरियन सैनिकांचा निभाव लागला नाही. हलक्या वजनाच्या आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या रोमन सैनिकांसमोर पाल्मेरियन सैनिकांचा पुरता धुव्वा उडाला. राजा ऑरेलियनने पामेरा शहरावरती कब्जा करण्याचा प्रयत्न करताच राणी झेनोबियाने शहर सोडून जाण्याचा प्रयत्न केला, पण राजाच्या सैनिकांनी तिला कैद केले.
त्यानंतर राजा ऑरेलियनच्या राज्याभिषेक समारोहाच्या वेळी साखळदंडांनी बांधलेल्या राणी झेनोबियाची वरात काढण्यात आली असे म्हटले जाते. राणी झेनोबियाच्या अखेरच्या दिवसाबद्दल फारशी ठोस माहिती उपलब्ध नाही. कुणी म्हणते तिने राजाच्या हाती लागण्याआधीच विषप्राशन करून स्वतःला संपवले, तर कुणी म्हणते तिने इजिप्त व्यापाऱ्याशी लग्न केले. तिच्या अखेरच्या दिवसाबद्दलच्या नोंदी अशा गोंधळात टाकणाऱ्या आहेत.
राणी झेनोबियाचा अंत कसा झाला? याची ठोस माहिती नसली म्हणून काही तिच्या पराक्रमाचे तेज कमी होत नाही. इतिहासातील एक शक्तिशाली राणी म्हणून असलेली तिची ओळख पुसता येणार नाही हे मात्र नक्की.
मेघश्री श्रेष्ठी.