रणरागिणींच्या कथा: देशभक्ती आणि पराक्रमांमुळे अवघ्या १९व्या वर्षी जिवंत जाळली गेलेली आणि मरणोत्तर संतपद बहाल झालेली- जोन ऑफ आर्क!!
देशाभिमानी असणं हा तसा कौतुकाचा गुण. पण तोच गुण जर एखाद्या स्त्रीने दाखवला तो धर्मद्रोह ठरेल का? आताच्या काळात या प्रश्नाचं उत्तर नाही असंच येईल, पण १५ व्या शतकात फ्रान्सला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्याचा चंग बांधलेल्या जोन ऑफ आर्कला मात्र आपल्या देशप्रेमाच्या गुणासाठी शिक्षा भोगावी लागली होती. ज्या फ्रान्सच्या जनतेत तिने स्वातंत्र्याची आणि देशासाठी प्राण त्याग करण्याची ऊर्मी चेतवली, त्याच जनतेच्या साक्षीने जोनला जिवंत जाळण्यात आले.
देशासाठी मरण पत्करण्यास सज्ज असलेल्या जोन ला याबद्दल अजिबात खेद नव्हता. पण ज्यांनी तिला धर्मद्रोही आणि राजद्रोही ठरवले त्यांनीच तिच्या मृत्युनंतर काही वर्षांनी संतपद बहाल केले. फ्रान्सच्या या लढवय्या, तरीही दुर्दैवी ठरलेल्या स्त्री योद्ध्याची कथा आजच्या लेखातून देत आहोत.
जोन ऑफ आर्क ही एक सध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेली एक सर्वसाधारण मुलगी होती. तीचा जन्म १४१२ सालचा. एका सध्या कुटुंबात जन्मलेली आर्क फ्रान्सच्या स्वातंत्र्याची प्रेरणा कशी बनली? या प्रश्नाचे उत्तर खूपच रोचक आणि काहीसे गूढ आहे. आर्कचे बालपण युद्धाच्या धामधुमीतच गेले. त्यामुळे कदाचित स्वातंत्र्याच्या विचारांनी तिच्या बालमनाचा ताबा घेतला असावा, याचमुळे ती स्वतःला मला फ्रान्सला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठीच इथे पाठवलं असल्याचं सांगायची. वयाच्या तेराव्या चोदाव्या वर्षी तिला संतांचे आणि देवदूतांचे संदेश ऐकू येत असल्याचा तिने दावा केला होता. या देवदूतांच्या संदेशानुसार तिचा जन्म फ्रान्सच्या मुक्तीसाठी झाला आहे असे तिचे म्हणणे होते. आपल्याला सेंट कॅथरीन, सेंट मार्गारेट, आणि अर्चेंजल मिशेल आणि गॅब्रिएलचा आवाज ऐकू येतो. ते माझ्याशी बोलतात आणि फ्रान्सचा राजा चार्ल्स दुसरा याला मी इंग्रजांविरुद्धात लढण्यासाठी मदत केली पाहिजे असे ती म्हणत असे.
पण एका सध्या शेतकरी कन्येच्या अशा चमत्कारिक दाव्यावर विश्वास कोण ठेवणार? तिने राजा चार्ल्सला भेटण्याचे खूप प्रयत्न केले. पण कोणीही तिची दाद घेत नव्हते. एके दिवशी आपल्या गावातील काही सरदारांसोब्त ती राजा चार्ल्सच्या महालात पोहोचली आणि फ्रान्सला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठीच माझा जन्म झाला असल्याचे तिने सांगितले. खुद्द देवदूतांनी आणि संतांनीच तिला या कामासाठी निवडले असल्याचेही तिने सांगितले. दरबारातील धर्मगुरूंनी ती खरं बोलतेय का याची पडताळणी केली आणि तिचा दावा खरा असल्याचे सांगितले.
इंग्लंडचा राजा एडवर्डने फ्रान्सवर हल्ला पुकारला. हे युद्ध १३३७ साली सुरू झाले आणि १४५३ साली याला पूर्णविराम मिळाला. शंभरहून जास्त वर्षे चाललेले हे युद्ध इतिहासात हंड्रेड इयर्स वॉर म्हणून प्रसिद्ध आहे. इंग्लडचा राजा एडवर्डच्या आक्रमक पवित्र्यापुढे फ्रान्सची दाणादाण उडाली होती. जोनने या युद्धात सहभाग घेण्यापूर्वी फ्रान्स सगळीकडेच पिछाडीवर पडत होता. १४२९ साली कॅथोलिक धर्मगुरूंनी जोनच्या दाव्याची तपासणी केली आणि तिला राजाला भेटण्याची परवानगी दिली. जोन राजा चार्ल्सला भेटायला गेली तेव्हा तिने पुरुषी पेहराव केला होता. तिने राजाला आपल्याला सैन्यात भरती करून घेण्याची परवानगी मागितली. तिच्या या विनंतीला राजाने मान्यता दिली आणि तिच्याकडे सैन्यातील एका तुकडीचे नेतृत्वही दिले. आपल्या सैन्य तुकडीसाठी तिने काही नियम बनवले, नागरिकांची लूट करण्यास आणि त्यांचा छळ करण्यास तिने मज्जाव केला.
ती आणि तिच्या सैन्याने मिळून इंग्रजांच्या ताब्यात गेलेले फ्रान्सचे किल्ले परत मिळवले. जोनच्या नेतृत्वाखालील सैन्याने एकेक करत इंग्लंडच्या ताब्यातील आपला प्रदेश पुन्हा मिळवला. जोन आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी स्वतः मैदानात उतरत असे.
तिच्या नेतृत्वाखाली फ्रान्सच्या सैनिकांनी पटायचे युद्धही जिंकले. या युद्धात इंग्रजांचा दारूण पराभव झाला. आपल्याला धूळ चरणारी ही जोन आहे तरी कोण? या उत्सुकतेने इंग्लंडने जोनची चौकशी सुरू केली तेव्हा त्याला कळाले की पुरुषी वेशात रणांगणात उतरणारी जोन ही खरे तर एक स्त्री आहे. एका स्त्रीने अशाप्रकारे शस्त्र उचलणे आणि त्यातही सर्वाना पुरुषी पेहराव घालून त्याचे समर्थन करणे हाच तिचाही गुन्हा ठरला. जोनमुळे इंग्रजांना जिथे तिथे हार पत्करावी लागत होती. यासाठी जोनचा काही ना काही बंदोबस्त करणे भाग होते.
राजा चार्ल्सचे नेतृत्व मान्य नसणारे काही फ्रान्सचे सरदार इंग्लंडला जाऊन मिळाले. त्यांनी इंग्लंडच्या राजाला जोन ऑफ आर्कला पकडून देण्याचे वचन दिले. या गद्दार साथीदारांपुढे जोनचा काहीही इलाज चालला नाही. २३ मे १४३० रोजी या गद्दार सरदारांनी तिला पकडून इंग्रजांच्या हवाली केले. जोनवर पाखंडीपणाचे आरोप लावण्यात आले. एका सामान्य शेतकऱ्याची मुलगी असूनही तिने सैन्याचे नेतृत्व केले हा तिचा गुन्हा होता. तिला देवदूतांची वाणी ऐकू येत असल्याचा तिचा दावाही इंग्लंडच्या धर्मगुरूंनी फोल सिद्ध केला. ती संतांची दूत नसून राक्षसांची दूत असल्याचेही बोलण्यात आले. ती नेहमीच पुरुषी पेहराव करत असे. समाजमान्य रिवाजानुसार एका स्त्रीने अशाप्रकारे पेहराव करणे गुन्हाच होता आणि जोनने तो केला होता. अशा खोट्यानाट्या आरोपांखाली तिच्यावर चर्चमध्ये खटले चालवण्यात आले आणि तिला गुन्हेगार सिद्ध करण्यात आले. या गुन्ह्यांसाठी शिक्षा म्हणून तिला ३० मे १४३१ रोजी जिवंत जाळण्यात आले. ज्या फ्रान्सच्या जनतेसाठी ती लढली त्याच फ्रान्सच्या जनतेने भर चौकात तिला जळताना पहिले. धर्म आणि राजसत्तेपुढे दुर्बल असणाऱ्या जनतेने तिचा हा क्रूर मृत्यू असहाय्यपणे पहिला. तेव्हा तिचं वय अवघं १९ वर्षांचं होतं.
पुढे हे युद्ध संपल्यानंतर राजा चार्ल्सने १४५६ मध्ये पुन्हा एकदा तिच्या वरील खटल्याची चौकशी सुरु केली. या चौकशीनंतर तिला निर्दोष घोषित करून ती फ्रान्सची शहीद वीरांगना असल्याचे जाहीर करण्यात आले. पुढे तर तिला संतपदही बहाल करण्यात आले.
फ्रान्सच्या सर्वसामान्य जनतेसाठी आजही जोन ऑफ आर्कविषयी प्रचंड आस्था आणि तळमळ आहे. तिच्या सहसामुळेच फ्रान्सला इंग्लंडच्या जाचातून मुक्त होण्याचा मार्ग सापडला.
मेघश्री श्रेष्ठी