रणरागिणींच्या कथा: एका दमात सात शीर छाटणारी, २००० सैनिकांविरुद्ध ३०० सामुराईंसोबत युद्ध जिंकणारी तोमयो गोझेन!!
सामुराई म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते जापनीज योद्धे, बरोबर ना? पण तुम्हाला काय वाटतं, त्या काळात कुणी महिला सामुराई होऊन गेल्या असतील का? युद्धभूमी हे पुरुषांचे क्षेत्र असे समजले जाते. पण तसे अजिबात नाही. भारतात आणि जगात सगळीकडे स्त्रियांनी युद्धभूमीवर आपले शौर्य गाजवले आहे. जपानही याला अपवाद नाही. आपल्याला पुरुष योद्ध्याला जपानमध्ये सामुराई म्हणतात हे माहित आहे. आणि हो, स्त्री सामुराईही असतात. त्यांना जपानमध्ये ओना-बुगेशा म्हटले जायचे. या ओना-बुगेशा म्हणजे महिला सामुराईंना देखील पुरुषांइतकेच कठोर प्रशिक्षण पूर्ण करावे लागे. सुमारे १००० वर्षापूर्वी होऊन गेलेल्या अनेक अशा महिला सामुराईंच्या कथा जपानी इतिहासाच्या पानापानावर आढळतात. आज आपण अशाच एका ओना-बुगेशा म्हणजेच महिला सामुराईची कथा पाहणार आहोत, तिचे नाव आहे तोमयो गोझेन.
तोमयो गोझेन १२ व्या शतकात होऊन गेली. त्याकाळात तोमयो गोझेनशी टक्कर घेऊ शकेल असा एकही योद्धा नव्हता असे म्हटले जाते. तिची बुद्धी आणि शौर्य अतुलनीय होते. याच काळात म्हणजे ११८० ते ११८५ च्या दरम्यान जपानमध्ये प्रसिद्ध गेनेपी युद्ध लढले गेले होते. हे युद्ध जपानमधील मिनामोटो आणि तायरा या दोन राजघराण्यांमध्ये लढले गेले. तोमयो ही मिनामोटो वंशाचा राजा योशिनाका याची प्रेयसी होती. नुसत्याच प्रेमाच्या आणाभाका घेऊन नाही, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून तिने राजाला साथ दिली. तिच्या योगदानामुळेच मिनामोटो राजघराणे विजयी ठरले आणि अखंड जपानवर आपली हुकूमत प्रस्थापित करण्यात या राजघराण्याला यश आले.
युद्धभूमीवर शत्रूचे शीर छाटणे म्हणजे त्याकाळी केवढा तरी मोठा पराक्रम समजला जायचा. असे शीर छाटणाऱ्या योद्ध्याला महापराक्रमी संबोधले जायचे. १८११ साली योकोतागावराच्या युद्धात तोमयोने सात योद्ध्यांचे शीर एका दमात छाटले होते. यावरून तुम्ही तिच्या पराक्रमाचा आणि साहसाचा अंदाज बांधू शकता. एखादा जंगली घोडा काबूत करणे म्हणजे तिच्यासाठी एखाद्या लहान मुलाला खेळवण्यासारखे होते असे म्हटले जाई. घोडेस्वारी आणि धनुर्विद्या म्हणजे तिच्यासाठी डाव्या हातचा मळ. महिला सामुराईंसाठी जपानमध्ये थोड्या कमी लांबीच्या तलवारी बनवल्या. या तलवारींना ते नॅगीनाटा म्हणत. पण तोमयोने हे खास महिलांसाठीचे शस्त्र कधीच वापरले नाही. पुरुष सामुराई ज्या प्रकारच्या लांब आणि सरळ आकाराच्या तलवारी वापरत, त्याच प्रकारची शस्त्रे चालवण्यात तिचा हातखंडा होता.
तिच्या नेतृत्वाखाली राजा योशिनाकाच्या सैन्याने अनेक युद्धात विजय मिळवला होता. राजाच्या सैन्याला तिच्या पराक्रमावर आणि तिच्या व्यूहरचनेवर दांडगा विश्वास होता. मिनामोटो सैन्यातून जर तोमयो नसती तर त्यांना जपानमधील एक बलाढ्य राजघराण्याचा सन्मान मिळालाच नसता असे म्हटले जाते.
ती स्वतःही या गोष्टी अभिमानाने अधोरेखित करते. तिच्याच शब्दात सांगायचे तर, “फक्त राजाच्या हृदयावरच नाही, तर त्याच्या सैन्यावरही माझीच हुकुमत चालते.”
तायरा आणि मिनामोटो या दोन राजघराण्यांत युद्ध जुंपले तेव्हा २००० तायरा सैन्यांविरुद्ध तोमयो फक्त आपले ३०० सामुराई घेऊन उतरली होती. एवढ्या कमी सैन्यानिशी लढूनही तिने शत्रूला धूळ चारली हे वेगळे सांगायला नको. या युद्धावर आधारित एक ग्रंथ जापनीज भाषेत लिहिला गेला आहे, ज्याचे नाव आहे, ‘द टेल ऑफ हा हायके.’
या ग्रंथात तोमयोचे वर्णन करण्यात आले आहे:
"तोमयोचे केस लांबसडक आणि काळेभोर असून ती गौर वर्णाची होती. तिचा चेहरा इतका सुंदर होता की कुणीही पाहता क्षणी प्रेमात पडेल. याहूनही ती एक निडर योद्धा होती. कितीही अवखळ घोडा असो, की खडतर युद्धभूमी तिला हरवण्याचा प्रयत्न कुणीही करू शकले नाही. तितक्याच लीलया ती तलवार खेळवत असे. तिच्या प्रत्यंचेतून सुटणाऱ्या बाणांमुळे एकाच वेळी हजारो सैनिक गतप्राण होत असत. ती एकटीच हजार सैनिकांच्या समान होती. तिला देवता म्हटले तरी ते योग्य ठरेल किंवा राक्षसिणी म्हटले तरी योग्य ठरेल. अनेकदा तिने युद्धभूमी हादरून सोडली होती. समोर कितीही बलाढ्य सेनापती असला तरी ती कधी नमत नसे, संपूर्ण युद्धभूमी बेचिराख करूनच तिला शांती मिळत असे. अगदी शेवटच्या लढाईत (११८४ सालची अवाझूची लढाई) तिने हेच केले. रणांगणात तिच्यासमोर शत्रूचा एकही सैनिक उरला नव्हता. एक तर बहुतांश सैनिक तिने मारले होते आणि उरलेले तिच्या भीतीने रणांगण सोडून पळून गेले होते. तिच्यासह त्या युद्धभूमीवर फक्त सात लोक शिल्लक होते."
या वर्णनावरून तोमयोचे खरे रूप तुमच्या डोळ्यापुढे उभे राहिले असलेच. १२ व्या शतकात होऊन गेलेल्या या महान योद्ध्याच्या जीवनाविषयी खूप कमी माहिती आज उपलब्ध आहे. तोमयोचा जन्म कधी झाला आणि तिचा मृत्यू कधी झाला याविषयीही खूप कमी माहिती मिळते. तिच्या मृत्यूविषयी तीन शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. शेवटच्या म्हणजेच अवाझूच्या लढाईनंतर तिच्याविषयी जी माहिती मिळते ती संदिग्ध आणि गोंधळात टाकणारी आहे. ही माहिती तथ्यांवर आधारित आहे की नुसत्याच दंतकथा आहेत हेही सांगणे अवघड आहे.
एका कथेनुसार तीने अवाझूच्या लढाईनंतर शस्त्रे खाली ठेवली आणि तिने बुद्ध धम्म स्वीकारला. वयाच्या ९० पर्यंत ती बौद्ध भिखुणी म्हणूनच राहिली.
हायके मोनोगतारीमधील वर्णनानुसार, तिला वाडा योशिमोरीने (तायरा राजघराण्याच्या वंशज) कैद केले आणि आपली रखेल बनण्यास भाग पाडले.
तर आणखी एका कथेनुसार तिने राजा योशिनाकाच्या सर्व शत्रूंचा खात्मा केला. अवाझूच्या लढाईत जेव्हा शेवटी फक्त सात लोक उरले होते, तेव्हा राजा योशिनाकाने तिला युद्धभूमी सोडून जाण्याची विनंती केली. तोही प्रचंड जखमी झालेला असल्याने त्याचीही जगण्याची शाश्वती नव्हती. पण त्याने विनंती करूनही तिने युद्धभूमी सोडली नाही. शेवटच्या शत्रूचाही तिने निःपात केला आणि राजा योशिनाकाचे शीर आपल्या हातात घेऊन तिने जलसमाधी घेतली.
या तिन्हींपैकी तिच्या बाबतीत नक्की काय घडले हे सांगता येणार नाही. पण अवाझूच्या लढाईनंतर तिचा कुठेच उल्लेख आढळत नाही, याअर्थी तिसरी शक्यता खरी असावी.
आज तोमयो अनेक कादंबऱ्यांची, चित्रपटांची, साहसी कथांची नायिका बनून आपल्या समोर येते. जपानी लोकांना आजही या ओना-बेगुशा बद्दल प्रचंड अभिमान वाटतो. तिचा पराक्रम आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे, यात वादच नाही.
मेघश्री श्रेष्ठी