शेतकऱ्याचा मुलगा ऑलम्पिकला गवसणी घालणार....महाराष्ट्राच्या प्रवीण जाधवबद्दल संपूर्ण माहिती घ्या!!
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/1223561201151.jpeg?itok=3tBSMiYm)
ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळणाऱ्या पदकांची संख्या यंदा वाढावी अशी आशा देशभरात व्यक्त केली जात आहे. यात महाराष्ट्राचा वाटा असला तर सर्वांना आनंदच होईल. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या मराठी खेळाडूंच्या यादीत एक नाव मात्र महाराष्ट्रासहीत देशाच्या आशा पल्लवित करत आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सरडे गावचा प्रवीण जाधव या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाची निवड थेट ऑलिम्पिकमध्ये झाली आहे. एका सामान्य घरातून थेट ऑलीम्पिकसाठीचा त्याचा प्रवास हा प्रचंड प्रेरणादायी आहे. तिरंदाजीत तो देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
प्रवीणचे वडील रमेश जाधव यांची परिस्थिती प्रवीणला चांगले प्रशिक्षण मिळवून देण्याइतकी नव्हती. पण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असताना त्याचा खेळांमधील रस पाहून या मुलातली चुणूक त्याचे शिक्षक विकास भुजबळ यांनी पाहिली. विकास भुजबळ त्याला स्वतःच्या मोटरसायकलवर बसवून विविध स्पर्धांना घेऊन जात असत, तसेच त्याला स्वतःच्या घरी ठेऊन घेत असत. अशा पद्धतीने त्याच्या क्षमतेला हळूहळू वाव मिळत गेला.
पुढे त्याची निवड प्रवरानगर येथील क्रीडा प्रबोधिनी येथे झाली. सुरुवातीला तो लांब उडी आणि धावण्यात पटाईत होता. पण पुढे त्याने तिरंदाजीत जम बसवला. प्रवीणसोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला तेव्हा तो म्हणाला की घरी जाऊन मजुरी करण्यापेक्षा क्रीडा क्षेत्रात मेहनत करणे जास्त संयुक्तीक वाटल्याने आपण इथेच मेहनत केली.
प्रवीणने २०१६ साली पहिल्यांदा बँकॉक येथे आशिया कपमध्ये कांस्यपदक जिंकले. पुढे त्याची निवड थेट भारतीय तिरंदाजी संघात झाली. २०१९ साली झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत तो भारतीय संघाचा हिस्सा होता. हा संघ २००५ नंतर या स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारणारा पहिला संघ ठरला होता.
प्रवीणची निवड २०१७ साली स्पोर्ट्स कोटामधून भारतीय लष्करात झाली आहे. प्रवीणची आतापर्यंतची कामगिरी पाहता त्याच्याकडून आशा ठेवणे काहीही गैर नाही. प्रवीणच्या रूपाने देशात आणि महाराष्ट्रातसुद्धा एका ऑलिम्पिक पदकाची संख्या निश्चितपणे वाढू शकते.
प्रवीणच्या रूपाने मात्र क्रीडा क्षेत्रात करियर करण्याची इच्छा जोपासणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक तरुणांसाठी मोठे उदाहरण उभे राहिले आहे. महागडे प्रशिक्षण, प्रशिक्षक यांच्याशिवाय सुद्धा आणि कोणतीही क्रीडा क्षेत्राची पार्श्वभूमी नसताना ऑलिम्पिकपर्यंत धडक मारता येते, हेच या निमित्ताने सिद्ध होत आहे.
आणखी वाचा:
टोकियो ऑलम्पिक २०२१: जुन्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा आणि यंदाच्या ऑलम्पिक मेडल्सचा काय संबंध आहे?