यादवकाळ ते निजामशाहीच्या खुणा, परळी वैजनाथ आणि धारुरचा भुईकोट किल्ला!! आणखी काय आहे बीड जिल्ह्यात?
बीड हा जिल्हा राज्यात अनेक गोष्टींसाठी ओळखला जातो. राजकारण असो की समाजकारण, बीडचे महत्व राज्यात कमी झालेले नाही. बीडच्या इतिहासाबद्दल काही गोष्टी सांगितल्या जातात. त्यातले एक म्हणजे हे शहर यादवकाळात वसवले गेले होते. अलीकडचा इतिहास बघितला तर स्वातंत्र्यपूर्व काळात बीड निजामाच्या राज्यात येत होते. पूर्वी बीडचे नाव चंपावती नगरी होते. काळाच्या ओघात आणि अनेक राज्यकर्त्यांच्या शासनात हे नाव बदललेले दिसते.
बीड हा महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला जिल्हा आहे. येथील काही भाग हा बालाघाट डोंगररांगेत मोडतो. जिल्ह्याचा बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. इथला मध्य ते दक्षिण भाग बालाघाट डोंगररांगेने व्यापला आहे, तर उत्तर भागात सपाट मैदाने आढळतात.
गोदावरी ही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांप्रमाणे बीडची पण प्रमुख नदी आहे. ही नदी परळी, गेवराई, माजलगाव या तालुक्यांतून वाहत जाते. तर मांजरा ही सुध्दा एक महत्वाची नदी आहे. पाटोदा तालुक्यात हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेत उगम पाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेश करते. तर सिंदफना, वाण, सरस्वती या गोदावरीच्या प्रमुख उपनद्या आहेत.
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण बरेच कमी आहे. येथील प्रमुख तालुके माजलगाव, केज, आष्टी, गेवराई, पाटोदा हे अवर्षणप्रवण क्षेत्रात येतात. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमाणात पीक आहे. केज, शिरूर, आष्टी, पाटोदा, बीड या तालुक्यात ज्वारी हे प्रमुख पीक आहे. हे पीक दोन्ही हंगामात घेतले जाते.
कापूस हे नगदी पीक बीड जिल्ह्यात पण मोठ्या प्रमाणावर घेतले जात असते. आष्टी, बीड, माजलगाव सारख्या तालुक्यांमध्ये उसाचे पण उत्पादन घेतले जाते. तर बीड आणि अंबेजोगाई तालुक्यात द्राक्ष पिकवले जाते. गोदावरी आणि मांजरा नदीकाठावर कलिंगडाचे उत्पादन घेतले जाते.
बीड जिल्हा आजूबाजूच्या जिल्ह्यांशी राज्यमार्गाने जोडलेला आहे. राज्य परिवहन मंडळाचे बसेस हेच वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. जिल्ह्यात रेल्वेमार्ग १९२९ साली खुला करण्यात आला होता.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले ज्योतिर्लिंग परळी येथे आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी केला होता. त्यांनीच बांधलेले अंबादेवीचे मंदिर, हेमाद्रीपंतांनी बांधलेले मंदिर, धारेश्वर मंदिर हे प्रसिद्ध आहेत. हजरत शहेनशाहवली दर्गा आणि अंबाजोगाईची योगेश्वरी देवीच्या दर्शनालाही बरेच लोक येत असतात. सातवाहन काळातील धारूर येथील भुईकोट किल्ल्यात नेताजी पालकर यांना कैद करून ठेवण्यात आले होते.
पाटोदा तालुक्यात विंचरणा नदीवर असलेला सौताडा धबधबा आकर्षणाचे केंद्र आहे. गेवराई तालुक्यात असलेले गोदावरी नदीकाठचे राक्षसभुवन येथील शनी मंदिर प्रसिद्ध आहे. याच बरोबर इतरही अनेक महत्वाचे ठिकाणे या जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत.
ही होती बीडबद्दलची सर्वांना माहित असायला हवी अशी ठकळ माहिती. यात काही राहून गेले असेल, तर ती माहिती आमच्यासोबत नक्की शेअर करा, लेखात भर घालताना आम्हांला आनंदच होईल!!
उदय पाटील