सुकुमार कुरूपचा शोध : केरळातली ३७ वर्षांपूर्वीची मर्डर केस आणि नवा 'कुरूप' सिनेमा!!
कुरूप या मल्याळम चित्रपटाबद्दल सध्या सर्वत्रच जोरदार चर्चा सुरु आहे. एका गुन्हेगाराच्या गुन्हेगारी वृत्तीचे अशाप्रकारे उदात्तीकरण करणे चुकीचेच, पण समाजात घडणाऱ्या अशा घटनातून इतरांनी नेमका काय बोध घ्यावा हाही एक प्रश्न आहेच.
कुरूप या चित्रपटात केरळमध्ये चार दशकापूर्वी घडलेल्या एका गुन्ह्याची घटना दाखवण्यात आली आहे. गुन्हे तर आजही घडतात. पण चार दशकांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्यात असे काय विशेष होते की चार दशकांनंतरही केरळवासियांसाठी ही घटना म्हणजे जणू एक दंतकथा वाटते? ते विशेष म्हणजेच ‘कुरूप!’
कुरूप या नावानेच आलेला हा चित्रपट कुरूप या व्यक्तिरेखेवरच आधारित आहे. हा कुरूप या गुन्ह्याचा मास्टर माइंड होता. त्याचे वैशिष्ट्य हेच की चाळीस वर्षांनंतरही आजही फक्त केरळच नाही, तर संपूर्ण भारतातील आणि आखाती प्रदेशातले पोलीसही त्याच्या मागावर आहेत आणि तरीही कुरूप सगळ्यांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला आहे. हो, गेली चाळीस वर्षे हे सगळे पोलीस त्याचा माग शोधत आहेत, पण कुरूप कुणाच्याच हाती लागलेला नाही. पुढेही लागेल का माहीत नाही. किमान तो जिवंत तरी आहे का? असेल तर कुठे असेल? हेही कुणाला सांगता येणार नाही.
कोण होता हा कुरूप? कुरूप हा केरळमधील अलापुझा या गावाचा एक सामान्य तरुण. बारावीची परीक्षा दिल्यानंतर तो इंडियन एअर फोर्समध्ये रुजू झाला. पण कदाचित हे काम त्याला आवडलं नसल्याने तो सुट्टी घेऊन परत आला, ते पुन्हा नोकरीवर गेलाच नाही. त्याच्या या अशा वागण्याने एअर इंडियामध्ये त्याच्या नावावर फरारी असा शिक्का मारण्यात आला.
काही दिवस गेल्यानंतर कुरूपने आपले मूळ नाव बदलले. त्याचे मुळचे नाव होते गोपालकृष्णा कुरूप. पण आता नोकरीसाठी बाहेर देशात जायचे झाल्यास त्याला या नावाने व्हिसा मिळणार नाही म्हणून त्याने आपले नाव सुकुमार पिल्लाई असे केले आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गोपालकृष्णा कुरूपचा मृत्यू झाल्याची नोंद केली. एका कॉन्स्टेबलला थोडे पैसे चारून त्याने हे काम करवून घेतले. वरती एअर इंडियातही पोलीसांकरवी ही माहिती पोहोचवली आणि आपल्या नावावर बसलेला फरारी हा शिक्का पुसून टाकला.
त्याने सुकुमार पिल्लाई या नावाने आपला पासपोर्ट आणि व्हिजा बनवून तो अबुधाबीमध्ये एका मर्चंट ऑपरेटिंग कंपनीत रुजू झाला. इथे त्याला चांगले वेतन मिळत होते. याच काळात त्याची सरसाम्मा नावाच्या एका मुलीशी ओळख झाली. घरच्यांच्या विरोधात जाऊन त्याने तिच्याशी लग्नही केले. सरसम्माचेही नर्सिंग झाले होते. ती ही काही दिवसांनी त्याच्या सोबत अबूधाबीला गेली आणि तिनेही नोकरी पकडली. दोघांच्याही पगारातून त्यांना चांगला पैसा मिळत होता.
कुरीलचा स्वभाव बोलका आणि लोकांना आकर्षून घेणारा असल्याने तिथेही त्याने बराच मित्रवर्ग जमवला होता. या मित्रांना महागड्या भेटवस्तू देणे, अलिशान पार्ट्या देणे, अशा सवयीमुळे पैसा येत असला तरी तो अजिबात टिकत नव्हता. त्यातच त्याने आपल्या गावाकडे एक जमीन घेतली आणि तिथे अलिशान घराचे बांधकाम सुरु केले. पण खर्चाचा ताळमेळ नव्हता. साहजिकच त्याला पैशाची चणचण जाणवू लागली.
वारेमाप उधळपट्टीची सवय झालेल्या कुरूपला ही चणचण अजिबात मान्य नव्हती. कुठून तरी झटपट पैसा कमवावा आणि ऐषोआरामात जीवन जगावे हे त्याचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. याच अस्वस्थतेतून एका अभद्र कल्पनेने त्याच्या डोक्यात जन्म घेतला.
त्याने अबूधाबीत एका विमा कंपनीत स्वतःच्या नावावर आठ लाखाचा विमा उतरवला होता. त्याला वाटले आपल्या मृत्यूचा बनाव करून आपण ती रक्कम मिळवू शकतो. याच कल्पनेतून तो कामाला लागला. यात त्याने आपल्या काही मित्रांनाही सामील करून घेतले. त्याचा मित्र शाहू, हा नंतर पोलिसांच्या हाती लागला, त्याचा ड्रायव्हर पोन्नापन, त्याचा मेव्हणा भास्कर पिल्ला यानाही नंतर पोलिसांनी त्याब्यात घेतले. पण कुरूप मात्र शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती लागला नाही.
या चौघांनी मिळून एका रात्री हा प्लॅन यशस्वी करण्यासाठी सावज हेरायचे ठरवले आणि नेमके त्याच दिवशी त्यांना त्यांचा सावज सापडलेदेखील. रात्रीच्या पिक्चरचा शो संपवून घरी जायला काही मिळते का याची वाट पाहणाऱ्या एका वाटसरूने नेमकी त्या रात्री कुरूपकडे लिफ्ट मागतली आणि बिचारा बळीचा बकरा बनला. त्या व्यक्तीचे नाव होते, चाको.
कुरूप, पोन्नापन, शाहू यांनी त्याला जबरदस्तीने मद्यातून औषध देऊन त्याचा खून केला आणि त्याचा चेहरा जाळून टाकला, जेणेकरून त्याची ओळख पटणार नाही. चाकोची शरीरयष्टी कुरूपच्या शरीरयष्टीशी मिळतीजुळती होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच कुरुपच्या अम्बॅसिडर गाडीत त्याचा मृतदेह ठेवून गाडीला अपघात झाल्याचा आणि आग लागल्याचा बनाव करण्यात आला.
पोलिसांनी जेव्हा अपघातग्रस्त गाडीची चौकशी सुरु केली तेव्हा ती गाडी कुरूपची असल्याने आणि मृतदेहावरील कपडेही त्याचेच असल्याने अनेकांनी तो कुरूपच असल्याचा निर्वाळा दिला. पोलिसांनी जेव्हा मृतदेहाचे शवविच्छेदन केले तेव्हा मृतदेहाच्या शरीरात दारू आणि विषारी पदार्थाचा अंश आढळून आला. तेव्हा हा कुरूपच असावा यावर पोलिसांचा विश्वास बसत नव्हता.
आसपासच्या पोलीस ठाण्यात कुणी बेपत्ता झाल्याची नोंद आहे का याचा जेव्हा पोलिसांनी शोध घेतला. तेव्हा चाकोच्या भावाने त्याची मिसिंग कम्प्लेंट दिल्याचे पोलिसांना आढळले. मृतदेह आणि चाकोचे वर्णन जुळणारे होते तेव्हा तो चाकोच असावा याची खात्री पोलिसांना पटली. त्यातच कुरूपचा मित्र शाहू पोलिसांच्या हाती लागला. मग तर त्यांनी केलेला सगळा बनाव उघड झाला.पोलिसांनी कुरूपच्या पत्नीलाही या कटात सामील असल्याच्या आरोपावरून अटक केली होती.पण पुरेशा पुराव्याअभावी तिची सुटका करण्यात आली.शाहू आणि पोन्नापनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पण कुरूप मात्र शेवटपर्यंत गुंगारा देत राहिला.
पोलिसांनी कुरूपचा ठावठिकाणा सांगणाऱ्यांना इनामही जाहीर केले. पण तरीही त्याचा थांगपत्ता कुणालाच लागला नाही. तर कधीकधी कुणीही उठून आपण कुरूपला पहिले असल्याचा दावा करत असे.
आजही पोलिसांना कुरूप कुठे आहे? जिवंत आहे की नाही? हेही माहीत नाही.
पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या कुरूपचीच कथा कुरूप चित्रपटातून पडद्यावर मांडण्यात आली आहे. यात त्याचे कोणत्याही प्रकारे उदात्तीकरण करण्यात आले नाही, मात्र हा घटनाक्रम आणि त्यातील थरार दाखवण्यात आला आहे. अर्थात आपल्याकडे अशा मालिका आणि सिनेमे पाहून गुन्हे करणाऱ्यांची काही उणीव नाही. नागाचा वापर करुन पत्नीला जिवे मारणाऱ्या एका आणि नागाचाच वापर करुन स्वत:च्या मृत्यूचा बनाव करणाऱ्या लोकांबद्दल तुम्ही नुकतंच वाचलंही असेल.
कुरूपच्या या कथेतून आपण काय बोध घेऊ हे अजून माहित नाही, पण कदाचित अशा आणखी घटना घडू शकतील हे मात्र निश्चित आहे!!
मेघश्री श्रेष्ठी