या स्टार्सनी बालकलाकार म्हणून काम केलेलं तुम्ही पाह्यलंय? ५व्या कलाकाराला तुम्ही तेव्हा नक्कीच पाहिलं नसणार..
आपले आताचे काही यशस्वी कलाकार लहानपणापासून सिनेमात काम करत आलेयत. काहीजण मोठेपणीही यशस्वी झाले, तर काहींना ही मायानगरी आवडली नाही आणि त्यांनी आपले वेगळे मार्ग चोखाळले. आज पाहूयात तुम्हांला तुमच्या लाडक्या कलाकारांचे लहानपणीचे कोणते रोल्स लक्षात आहेत ते..
१. सचिन पिळगांवकर
महागुरूंचा कितीही रागराग केला तरी त्यांचे लहानपणीचे आणि तरूण असतानाचेही काही रोल्स अतिशय सुंदर होते. पाच वर्षांचे असतानाच त्यांनी ’हा माझा मार्ग एकला’ या सिनेमात काम केलं होतं. पिक्चर बायकांच्या ऑडियन्सला धो-धो रडवणारा असला तरी यात सचिनचं काम छानच झालं होतं. "उठा राष्ट्रवीर होऊ" हे गाणं छोटा सचिन ज्या आवेशात म्हणतो, ते पाहून क्षणभर त्या चिमुरड्याला उचलूनच घ्यावंसं वाटेल. या सिनेमासाठी सचिनला राष्ट्रपती पारितोषिकही मिळालं होतं. हे पारितोषिकाचं कदाचित लोकांच्या लक्षात राहिलं नसतं , पण सचिन प्रत्येक कार्यक्रमात त्या बद्दलची रेकॉर्ड वाजवून लोकांना पुन्हा-पुन्हा आठवण करून देतो हे एक बरंय..
आज दुर्दैवाने हा सिनेमा आणि ’उठा राष्ट्रवीर हो" हे गाणं दोन्हीही इंटरनेटच्या महाजालात उपलब्ध नाहीय.
२. मास्टर अलंकार आणि पल्लवी जोशी
मास्टर अलंकारने पल्लवी जोशीहून अधिक सिनेमांत बालकलाकार म्हणून काम केलं. १९७० सालचा ’घरकुल’ म्हणजेच ’पप्पा सांगा कुणाचे’ वाला चित्रपट अलंकारचा पहिला सिनेमा असू शकेल. गंमत म्हणजे हा घरकुल आपल्या ’मासूम’चा ओरिजिनल पिक्चर आहे. जुगल हंसराजने केलेली दुसर्या बाईच्या मुलाची भूमिका अलंकारने केली होती. त्यानंतर अंदाज, दीवारमधला छोटा अमिताभ, सीता और गीता असे १००हून अधिक सिनेमे त्याने केले. पण इथं काही खरं नाही हे त्यानं वेळीच ओळखलं आणि योग्य वेळेत काढता पाय घेतला.
पल्लवीनं ’आदमी सडक का’ मधून ऍक्टिंगला सुरूवात केली खरी. पण त्याचे फोटोज किंवा व्हिडिओज आज इंटरनेटवर उपलब्ध नाहीयेत. अलंकारला पाहायचं असेल, तर "हे राष्ट्र देवतांचे" गाणं पाहाच पाहा.
३. पद्मिनी कोल्हापुरे
"यशोमती मैंयासे बोले नंदलाला" म्हणणारी ’सत्यम शिवम सुंदरम" मधली पद्मिनी कुणाच्या लक्षात नसेल?
४. निवेदिता जोशी
जितेंद्र आणि सुलक्षणा पंडित यांच्या एका पकाऊ सिनेमात निवेदिता जोशी लहानपणीच झळकली होती. एका बसमध्ये "आदमी मुसाफिर है" हे गाताना ती अगदी गोड दिसते. अर्थात नंतर धुमधडाकामध्येही ती काही कमी गोड दिसली नाहीय. तेव्हाच्या मुळूमुळू रडणार्या हिरॉइन्सच्या गर्दीत हीच ती काय एक कॉन्फिडन्ट वाटायची.
५. हृषिकेश जोशी
निवेदिता जोशीनंतर आणखी एक जोशांचं नांव घेतलंच पाहिजे. ते म्हणजे आजकाल पोश्टर बॉय आणि गर्ल मधून गाजत असलेले हृषिकेश जोशी. स्मिता पाटीलच्या अखेरच्या काही सिनेमांपैकी असणार्या ’सूत्रधार’ या सिनेमात हृषिकेशने काम केलं होतं. त्या सिनेमात स्मिताशिवाय नाना पाटेकर, आशालता, गिरिश कर्नाड, कमलाकर सारंग, मधु कांबीकर, निळू फुले यांसारख्या मातब्बर लोकांनी काम केलं होतं. पण म्हणून लगेच सिनेमा शोधून पाहायला जाऊ नका. कसलंही लॉजिक नसलेला आणि वाईट दिग्दर्शनाचा नमुना आहे हा सिनेमा.
६. ऋतुजा देशमुख
ऋतुजा देशमुख एक अत्यंत गुणी कलाकार आहे. आजकाल टीव्हीवर जरी ती दिसत नसली तरी तिच्या अभिनयाबद्दल शंका नाही. तर तुम्हाला लक्ष्याचा ’एक गाडी बाकी अनाडी’ आठवत असेलच. तोच तो, त्यावरून पुढे हिंदीत ’टारझन-द वंडर कार’ सिनेमा निघाला तो. तर त्या सिनेमात लहान प्रिया अरूणची भूमिका केलीय आपल्या ऋजुताने. या सिनेमात मोठ्या प्रिया अरूणची आई लता अरूणच असणं हा ही एक योगायोग. ऋतुजाचा लहानपणीही आवाज अगदी आताच्या सारखाच आहे. तिचे ते पाच वर्षांच्या मुलीचे बोल कानाला एकदम गोड वाटतात.
७. स्वप्निल जोशी
बालकलाकार म्हटल्यावर स्वप्निल जोशीला विसरून कसं बरं चालेल? हा लहानपणी गोंडस -गुटगुटीत दिसणारा कृष्ण मोठेपणी मात्र बसून बसून फुगलेला फुटबॉल झालाय. त्यातच त्याला तो स्वत: मराठीतला शारूख असल्यासारखं वाटतं त्यामुळे त्याचे सिनेमे आजकाल खूप पकवतात.
८. आदिनाथ कोठारे
"माझा छकुला"मधला आदिनाथ खरंच छान दिसला होता. पण लहानपणीच्या आणि मोठेपणीच्या त्याच्या दिसण्यात थोडा फरक पडला आहे, नाही का?
९. स्वरांगी मराठे
"माझं नांव चिंगी नाही, अक्षता आहे" असं ठमकावून सांगणारी आभाळमायातले चिंगी आठवतेय? आता ती टीव्ही सिरीयल्समधून काम करू लागलीय पाहा..