विमानप्रवास न करता जगातल्या प्रत्येक देशाला भेट देणारा एक अजब प्रवासी !
मनसोक्त भटकंती करणं हा जवळपास प्रत्येकाच्या बकेट लिस्टमधला महत्त्वाचा आयटम असतो. मग कुणाला डोंगररांगा खुणावतात तर कुणाला जंगलं, कुणी ऐतिहासिक स्थळी रमतं तर कुणाला समुद्रकिनारा साद घालतो.क्वचित कुणी हटके पर्यायांच्या शोधात असतात.मग कधी हजारो किलोमीटर पायी परिक्रमेचे बेत ठरतात, तर कधी हिमालयाची शिखरं सर करण्याचे मनसुबे रचले जातात.
असाच एक अवलिया आहे, ज्याने तब्बल दशकभर भटकंती करून जगातल्या प्रत्येक देशात पाऊल ठेवण्याचा विक्रम केला आहे.विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान त्याने एकदाही विमानप्रवासाचा आधार घेतलेला नाही.त्याचं नाव आहे थोर पेडरसन.२०१३ मध्ये आपल्या या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या ४४ वर्षांच्या या डॅनिश प्रवाशाला आपलं मिशन पूर्ण करण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लागला.
जगावेगळं काही करण्याच्या नादात पेडरसनला कुठेही विमानप्रवास न करता जगभर प्रत्येक देशात भ्रमंती करण्याची कल्पना सुचली, आणि या इच्छेने त्याला इतकं झपाटलं की त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. या दहा वर्षात त्याने २०३ देशांना भेट दिली आहे. यात काही वादग्रस्त प्रदेशदेखील आहेत. या यादीत भारताचा नंबर १६८ वा होता. २०१८ च्या शेवटी आणि २०१९ च्या सुरुवातीस तो भारतात येऊन गेला.
या मोहिमेदरम्यान त्याने वापरलेल्या वाहनांचा तपशील असा होता.
बस- ३५१, ट्रेन्स -१५८,-टुकटुक(रिक्शा) ४३, कंटेनर शिप्स -३७ , बोटी ३३, ट्रक्स ०९,सेलबोट्स ०३,,क्रुझ शिप्स ०२,पोलीस कार ०१याॅट ०१आणि एकदा चक्क घोडागाडी...
सगळ्यात दीर्घकाळचा रेल्वे प्रवास पाच दिवस रशियामध्ये. सगळ्यात जास्त काळ चाललेला बस प्रवास 54 तास ब्राझीलमध्ये,
मात्र हा बसचा प्रवास अजिबात आरामदायी नव्हता.
शिवाय हॉंगकॉंगमध्ये कोव्हिड साथीमुळे त्याला दोन वर्षं अडकून पडावं लागलं.
या संपूर्ण दहा वर्षांच्या काळात त्याला त्याच्या बायकोला केवळ 27 वेळा भेटता आलं. अर्थातच हा काळ सदासर्वदा सुखाचा, आरामाचा नव्हता.या काळात त्याने अनेक आव्हानांचा सामना केला. कधी राजकीय संघर्ष, कधी साथीचे रोग, कधी त्या त्या देशातल्या नोकरशाहीकडून मिळणारी विविध प्रकारची वागणूक, तर कधी लॉजिस्टिकसंबंधी अचानक उद्भवणाऱ्या समस्या... एक मात्र खरं : दुनियेमधल्या प्रत्येक देशात त्याला जसा संकटांचा सामना करावा लागला, तसेच त्या देशातल्या माणसांमधल्या माणुसकीचं, सद्हृयतेचंही दर्शन झालं. त्यामुळेच त्याचा प्रवास पूर्ण होऊ शकला.
एवढ्या मोठ्या मोहिमेची आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी त्याने स्वतः कठोर आर्थिक शिस्त लावून घेतली होती. दिवसाकाठी २० डॉलर पेक्षा जास्त खर्च करायचा नाही, असा नियम घालून घेतला होता. स्वतःची बचत, काही प्रमाणात क्राउड फंडिंग, आणि कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप यांच्या आधारावर हा प्रवास पूर्ण होऊ शकला. तसेच कोणत्याही देशात गेल्यानंतर तिथे कमीत कमी २४ तास घालवायचे, हाही नियम त्याने शेवटपर्यंत पाळला.त्याच्या यादीतला शेवटचा देश म्हणजे मालदीव. तिथे त्याने मे महिन्यात भेट दिली. आता लवकरच आपली मोहीम संपवून तो मायदेशी डेन्मार्कला जुलैमध्ये परत जात आहे. Once upon a saga या ब्लॉगवर त्याने या सगळ्या प्रवासाचं चित्रण केलेलं आहे.
आपल्यासमोर पृथ्वीचा गोल फिरत असताना कोणत्याही ठिकाणी हात लागला तरी त्या ठिकाणाला आपला पदस्पर्श झाला असेल आणि तिथे आपल्याला खरीखुरी 'माणसं' भेटलेली असतील ही त्याची मनीषा अखेरीस पूर्ण झाली आहे, यातच सर्व काही आलं.
-स्मिता जोगळेकर