बोभाटाची बाग - भाग ११ : कडू मूळांची गोड फुलं - कुडा
कुटजारिष्ट या औषधाचे कडू घोट लहानपणापासून आतापर्यंत सगळ्यांनी एकदा ना एकदा तरी घेतलेच असतील. हे कुटजारीष्ट ज्या वनस्पतीपासून तयार होतं त्याला आपण कुड्याचं झाड म्हणून ओळखतो. संस्कृत भाषेत कुटज, गुजराथीत इंद्रजव, इंग्रजीत बीटर ओरीएंडर, तर हिंदीत कुडैया या नावानं ओळखलं जातं. बहुतेक सर्व राज्यांत ही झाडं उगवतात. त्यामुळे चौदा भाषांमध्ये त्याला वेगवेगळी नावं आहेत.
महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या जंगलात हे झाड बघायला मिळतं. काही ठिकाणी याची मुद्दाम लागवडही केली जाते. पिण्याच्या अशुध्द पाण्यामुळे आमांश (आव), रक्ती आमांश हा रोग एकेकाळी घरोघरी असायचाच. त्यावेळी कुड्याचे पाळ उगाळून त्याचे चाटण दिले जायचे. इतकंच काय, तर कुड्याचे गुण अन्नात आपोआप उतरावेत म्हणून त्याच्या पानांची पत्रावळ वापरली जात असे.
आज या लेखाच्या निमित्ताने आम्ही औषध घेण्याची पारंपारिक पध्दत सांगणार आहोत.
औषध म्हणून घेताना कुड्याचे मूळ सहाणेवर उगाळून ते चार चमचे ताकात मिसळले जाते आणि पिण्यापूर्वी लोखंडी पळी लाल गरम करून त्यात बुडवली जाते. आता हे सगळं का असा प्रश्न विचारल्यावर त्याचे समर्पक उत्तर असं मिळतं की आमांश कमी होण्यास कुड्याचे पाळ म्हणजे मूळ पुरेसे आहे. सोबत आतड्यामध्ये लॅक्टो बॅसीलसची पुन्हा नवी निर्मिती व्हावी म्हणून ताकात मिसळून द्यायचे. आमांशामुळे, विशेषतः रक्ती आमांशामुळे रक्तातील हिमोग्लोबीन आणि पर्यायाने लोह कमी होते ते शरीराला मिळावे म्हणून लोखंडी पळी तापवून त्या मिश्रणाला चटका द्यायचा. आता ही पध्दत किती योग्य-अयोग्य आहे ते तुम्ही तुमच्या डॉक्टरलाच विचारलेले बरे!
आता ही वनस्पती औषधी आहे म्हटल्यावर फुलांकडे फारसं कोणाचं लक्ष जात नाही. पण कडू मूळ असलेल्या या झाडाच्या फुलांना मंद सुवासिक गंध असतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून पांढर्या सुगंधी फुलांचे गुच्छ फुलायला सुरुवात होते. पोळ्याच्या दरम्यान लांबट शेंगा झाडावर झुलायला लागतात. या बिया पण कडू असतात. फुलांची भाजी मात्र छानच होते. इतर भाज्यांसारखी ही फुलं बाजारात विक्रीस आलेली दिसत नाहीत.
या वनस्पतीच्या एकाच औषधी गुणधर्माचा आम्ही वर उल्लेख केला आहे. पण आयुर्वेदाप्रमाणे इतर आजारांसाठी पण ही वनस्पती बरीच उपयुक्त आहे. भावप्रकाश निघंटू, कालिदासाचे मेघदूत आणि इतर अनेक संस्कृत ग्रंथात कुड्याचे उल्लेख आढळतात.
बोभाटाची भाग -९ मध्ये अनेक वाचकांनी वनस्पतींच्या औषधी गुणधर्माची विचारणा केलेली होती. त्याची अंशतः पूर्तता या भागापासून करत आहोत. पण प्रत्यक्ष वापर योग्य सल्ला घेऊनच करावा ही विनंती.
लेखिका : अंजना देवस्थळे