एलॉन मस्क ते जेफ बेझोस... जगप्रसिद्ध मंडळी काय खातात?
जगात दोन प्रकारची माणसं आहेत, खाण्यासाठी जगणारी आणि जगण्यासाठी खाणारी. पहिल्या प्रकारातली माणसं खऱ्या अर्थाने खाण्याची शौकीन म्हणता येतील अशी. एकंदरीत आयुष्य भरभरून उपभोगणारी आणि त्यातही विशेषतः खवय्येगिरीत आनंद मानणारी. दुसऱ्या प्रकारची माणसं मात्र जरा वेगळी. काहीशी छंदिष्ट, घेतलेल्या कामात स्वतःला बुडवून घेणारी, किंवा वर्कोहोलिक अशी. आपल्या आवडत्या कामापुढे यांना खाण्यापिण्याची शुद्ध नसते. एकदा कामात बुडाले की बुडाले. जगण्यासाठी पोटात वेळच्यावेळी आवश्यक तेवढं अन्न ढकलणं गरजेचं आहे हेही कित्येकदा इतरांना त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागतं. जगातले आघाडीचे उद्योगपती, कलाकार अशी यशस्वी मंडळी यातल्या नक्की कोणत्या गटात मोडतात, हे जाणून घेण्याची उत्सुकता बऱ्याच जणांना असते. बघूयात अशाच काही जागतिक कीर्तीच्या यशस्वी लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी...
१. एलॉन मस्क
यशस्वी लोकांच्या यादीत एलॉन मस्कचं नाव सध्या वरच्या क्रमांकावर आहे. त्याच्या लेखी कामाला जास्त महत्त्व आहे. त्याच्याच शब्दात सांगायचं झालं, तर जिवंत राहण्यासाठी खाण्याच्या ऐवजी दुसरा एखादा पर्याय असता तर त्याने खाणं टाळून त्याऐवजी कामच केलं असतं. युनिव्हर्सिटीत शिकत असताना या माणसाचा रोजचा खाण्यापिण्याचा खर्च केवळ एक डॉलर होता. आता मात्र त्याला व्यायामाची फारशी आवड नाही. यापेक्षा चवीनं खाणं त्याला जास्त आवडतं.
चविष्ट अन्न ही त्याची आवड आहे. हेल्थ फूड वगैरे खाऊन आरोग्य सांभाळणं आणि दीर्घायुषी होणं या गोष्टींवर त्याचा विश्वास नाही. आयुष्य एकवेळ छोटं असलं तरी चालेल पण चवीने खाता आलं पाहिजे असं त्याला वाटतं. चविष्ट अन्नपदार्थ खायला मिळणं ही आयुष्यातली एक अत्यंत उत्तम आणि आनंददायी गोष्ट आहे, ज्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. त्यामुळेच वजन आटोक्यात ठेवणं, बांधा प्रमाणशीर असणं वगैरे गोष्टींना या महाशयांनी चक्क फाटा दिला आहे.
२. मार्क झुकरबर्ग
यशस्वी आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांच्या यादीत झुकरबर्गला वगळून कसं चालेल? झुकरबर्गचं वैशिष्ट्य म्हणजे नवीन वर्षाचे त्याचे काहीसे हटके संकल्प. २०११ मध्ये त्याने नवीन वर्षाचा संकल्प केला होता की मांस खाण्यासाठी तो स्वतः त्या प्राण्याला मारेल. प्राण्यांची शिकार करण्यासाठी त्याच्याकडे म्हणे एक लेझर गन देखील होती. ही लेझर गन आणि सुरी वापरून तो आधी त्या प्राण्याची शिकार करी आणि मग ते खाटकाकडे पाठवत असे. ट्विटरचा सहसंस्थापक जॅक डॉरसी याला त्याने अशा प्रकारे तयार केलेली नॉनव्हेज डिश थंड करून स्वतः पेश केली होती. आजकाल म्हणे तो स्वतः शिकार वगैरे करत नाही, पण त्याच्याकडे एक पाळीव बकरा आहे. शिवाय आजकाल त्याचे खाण्यापिण्याचे नखरे देखील कमी झाले आहेत. काम करत असताना खाण्याकडे वगैरे दुर्लक्ष केल्याने मध्यंतरी त्याचं वजन दहा पौंडाने घटलं होतं.
३. जेफ बेझोस
ऑनलाइन शॉपिंगच्या विश्वात अग्रगण्य असलेल्या ॲमेझॉन या कंपनीचा हा संस्थापक. हा खाण्याचा किती शौकीन आहे हे दाखवणारे फोटोही प्रसिद्ध झालेत. २०१८ च्या शाळेत एका फोटोमध्ये जेफ बेझोस भाजलेल्या घोरपडीच्या डिशवर ताव मारताना दिसला, ज्यामध्ये जोडीला अजगर, कोळी आणि झुरळांची मेजवानी होती. जेफ बेझोस स्वतः पिल्सबरी बिस्किटांचा निस्सीम चाहता. रोज सकाळी बटरवर भाजलेली पिल्सबरी बिस्कीटं हा त्याचा आवडता नाश्ता होता. लग्न झाल्यावर त्याच्या बायकोने त्याला रोखलं आणि ही सवय सुटली. आजकाल मात्र हे महाशय हेल्दी ब्रेकफास्टने दिवसाची सुरुवात करतात.
४. अरियाना हफिंग्टन
वाचकांना हिचं नाव फारसं माहिती असण्याची शक्यता नाही. ही अमेरिकेतली प्रसिद्ध लेखिका आणि प्रकाशिका आहे. थ्राईव्ह या जगप्रसिद्ध पोर्टलची ही संस्थापिका. या बाईची सकाळ बटर कॉफीने (ज्याला बुलेट-प्रुफ कॉफी असेही म्हणतात) उजाडते. यामध्ये वापरलेलं बटर म्हणे ऑरगॅनिक आहे. त्यानंतर हफिंग्टन बाई थेट जेवणाच्या वेळीच नाश्ता करतात. त्यांचा आहार मुख्यतः मेडिटरेनियन(भूमध्यसागरी) प्रकारचा आहे. यात ताजे मासे, भाज्या, फळं, नट्स, योगर्ट, फेटा चीज यांचा समावेश होतो. जोडीला तंदुरुस्त राहण्यासाठी त्या व्हिटॅमिन्स आणि चिनी जडीबुटी यांचा आहारात अंतर्भाव करतात.
५. ऑप्रा विन्फ्रे
आपल्या जादुई आवाजाने आणि निवेदनाच्या शैलीने जगावर गारुड करणारं हे व्यक्तिमत्त्व. तिच्या आहाराचा तक्ताच तिने सांगितला आहे. सकाळच्या नाश्त्याला मोड आलेली कडधान्ये आणि होल ग्रेन वापरून तयार केलेला टोस्ट, तळलेलं अंडं आणि टर्कीच्या दोन स्लाईसेस, दुपारच्या जेवणात ग्रील केलेल्या टर्कीचा बर्गर, कमी फॅट असलेलं मेयॉनीज आणि मस्टर्ड व दोन ग्रिल व्हेजिटेबल कबाब, मधल्या वेळेला खायला ग्रीन ॲपल आणि पार्मेसन चीज, तर रात्रीचं जेवण म्हणजे फळं आणि अक्रोड व सिरीयल घातलेलं योगर्ट. ब्रेड हे विन्फ्रेचं आवडतं खाणं. त्यामुळे ब्रेड वापरून तयार केलेलं अन्न ती छान एन्जॉय करते.
६. सर रिचर्ड ब्रॅन्सन
वयाच्या अवघ्या विशीत नेकर आयलंड नावाचं अख्खं बेट खरेदी करणारा हा अवलिया. करोना महासाथीच्या काळात त्याचा जास्तीत जास्त वेळ या बेटावर जायचा. हे बेट म्हणजे मत्स्यप्रेमींसाठी खास मेजवानी, कारण येथे बारा महिने ताजी मासळी उपलब्ध असते. मात्र सर रिचर्ड हे आजकाल शाकाहाराकडे जास्त प्रमाणात वळले आहेत. कोणे एके काळी बीफ खाणाऱ्या या माणसाने आजकाल ते खाणं सोडलं आहे. जेवढ्या जास्त प्रमाणात गाईगुरांची कत्तल होईल तेवढ्या जास्त प्रमाणात पृथ्वीवरची रेनफॉरेस्ट्स (पर्जन्यवनं) नष्ट होतील, हे समजल्यापासून पर्यावरण वाचवण्याच्या भूमिकेतून त्यांनी हा बदल केला. याशिवाय सीस्पायरसी नावाचा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी मासे खाणं कमी केलं. आता कधीतरी बदल म्हणून मांसाहार केला जातो इतकंच. आजकाल सकाळी ते फक्त चहा कॉफी घेतात.
व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणेच व्यक्ती तितक्या खाण्याच्या आवडीनिवडी हे देखील खरं आहे, असं या लेखावरून वाटतं. या सगळ्या यशस्वी मंडळींच्या खाण्यापिण्याच्या सवयीत साम्य काय ते मात्र शोधायला जाऊ नका. कारण तसं तांत्रिक दृष्ट्या काही साम्य नाही. एक मात्र आहे, जवळजवळ सगळ्यांनीच आपल्या मनाचं ऐकलं आहे. त्यामुळे मिळणारे समाधान, आनंद हेही अमोल आहे, नाही का?
स्मिता जोगळेकर