बहुगुणी हायलुरॉनीक अॅसिड नक्की काय आणि कसे काम करते ?
संध्याकाळच्या टिव्हीवरच्या जाहिरातीत सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींचा मोठा हिस्सा असतो.कारण सोप्पं आहे.गृहिणींचा सिरियल बघण्याचा हा प्राईम टाईम असतो. सध्या चेहेर्याला लावायच्या क्रीमच्या जाहिरातीत 'हायलुरॉनीक अॅसिड'चा उल्लेख असतो. हे 'हायलुरॉनीक अॅसिड' काय आहे हे कोणीच तपासून बघत नाही पण क्रीम विकत घेतलं जातं.आपापल्या प्रसाधनांचा वेगळेपणा मिरवण्यासाठी असे शब्द वापरण्याचा त्या त्या कंपनीचा उद्देश सफल झालेला असतो. आजच्या आपल्या लेखात चेहेर्याला लावायच्या क्रीमच्या जाहिरातीत उल्लेख असलेल्या 'हायलुरॉनीक अॅसिड' चे फायदे समजून घेऊ या !
जखम लवकर भरून यायला मदत
मुळात नैसर्गिकरित्या हे ऍसिड त्वचेमध्ये असतंच. पण त्वचेला जेव्हा इजा होते किंवा जंतुसंसर्ग होतो, अशावेळी त्याचं प्रमाण वाढतं. एखाद्या ठिकाणी काही गडबड गोंधळ असेल तर तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी ताबडतोब पोलीस तैनात केले जातात तसंच काहीसं हे आहे.
एखाद्या ठिकाणी जखम झाल्यानंतर तिथे त्वचेचा दाह होतो हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. या दाहाची तीव्रता कमी करण्याचं काम हायलुरॉनिक ऍसिड करतं. त्याचवेळी ते शरीराला ज्या ठिकाणी जखम झाली आहे त्या भागात जास्त प्रमाणात रक्तवाहिन्यांचं जाळं तयार करण्याचा सिग्नल देतं. एका अभ्यासानुसार हायलुरॉनिक ऍसिड जखमेवर लावल्यामुळे जखमेचा आकार कमी होतो आणि त्या ठिकाणी होणाऱ्या वेदनाही बऱ्याच प्रमाणात कमी होतात. शिवाय हायलुरॉनिक ऍसिडमध्ये जिवाणू विरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे ते जंतुसंसर्ग कमी होण्यासाठीही उपयुक्त आहे. जखम लवकर भरून येण्यासाठी ते थेट जखमेवरच लावण्याचा सल्ला दिला जातो. ते सप्लिमेंटच्या स्वरूपात घेण्याचा कितपत फायदा होतो हे अजूनही समजलेलं नाही. केवळ त्वचेवरील जखमाच नाहीत तर हिरड्यांना आलेली सूज, तोंडाच्या आतल्या बाजूला असलेले व्रण यांच्यावरही हायलुरॉनिक ऍसिड प्रभावी आहे.
सांधेदुखीवर आराम
हायलुरॉनिक ऍसिड सांध्यांसाठी वंगण पुरवतं, त्यामुळे सांधेदुखी कमी होते. सांध्याच्या ठिकाणी हाडं जोडली जातात. या भागात पुरेसं वंगण असल्यास हाडं एकमेकांवर घासली जाऊन झीज होण्याचं प्रमाण कमी होतं. आर्थ्रायटिस नावाचा विकार असलेल्या रुग्णांना हायलुरॉनिक ऍसिड सप्लीमेंट्सचा बराच फायदा होतो असं आढळून आलं आहे. या विकारामध्ये सांध्यांची झीज होते. दोन महिने रोज 80 ते 120 मिलीग्रॅम हायलुरॉनिक ऍसिड घेतल्याने या रुग्णांमध्ये गुडघेदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होते असं सिद्ध झालं आहे. विशेषत: चाळीस ते सत्तर या वयोगटातल्या रुग्णांना याचा फायदा होत आहे.
ऍसिडिटीला बाय बाय
आज-काल बदललेला आहारविहार, ताणतण आणि जीवनशैली यांच्यामुळे ऍसिडिटीची तक्रार वाढल्याचं आढळून येतं. जेवण झाल्यानंतर आम्लपित्त, घशाशी येणं, जळजळणं यासारख्या गोष्टींमुळे अन्ननलिकेच्या आतल्या बाजूच्या अस्तराचा दाह होतो. या त्रासावर हायलुरॉनिक ऍसिड प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.
डोळ्यांच्या कोरडेपणावर इलाज
सुमारे दहा टक्के लोकांना डोळे कोरडे पडण्याचा त्रास सतावतो. मुख्यतः अश्रूंची निर्मिती कमी झाल्यामुळे किंवा तयार झालेल्या अश्रूंचं बाष्पीभवन झाल्याने हा त्रास संभवतो. हायलुरॉनिक ऍसिड मध्ये ओलावा धरून ठेवण्याचा गुणधर्म असल्यामुळे ते या त्रासावर प्रभावी इलाज ठरतं. कोरड्या डोळ्यांवर उपचार म्हणून हळूहळू हायलुरॉनिक ऍसिड सोडणारी कॉन्टॅक्ट लेन्सेस तयार करण्यावरही संशोधन सुरू आहे. डोळे ओलसर ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बऱ्याचशा आय ड्रॉप्सचा हा एक महत्त्वाचा घटक आहे.
हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त
प्राण्यांवर झालेल्या काही प्रयोगांवरून हायलुरॉनिक ऍसिड मुळे हाडांची ताकद वाढते हे सिद्ध झालं आहे. मात्र अजून माणसांमध्ये यासंबंधीच्या चाचण्या घेण्यात आलेल्या नाहीत. हायलुरॉनिक ऍसिड मुळे हाडांच्या निर्मितीसाठी जबाबदार असलेल्या ऑस्टीओब्लास्ट नावाच्या पेशींची क्रियाशीलता वाढते असं लक्षात आलं आहे.
मूत्राशयाच्या वेदनांवर प्रभावी
सुमारे तीन ते सहा टक्के स्त्रिया इंटरस्टिशियल सिस्टाइसिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहेत. यामध्ये त्यांना तीव्र स्वरूपाच्या पोटदुखीला तोंड द्यावं लागतं. शिवाय लघवीची तीव्र भावना निर्माण होऊन ती रोखून धरण्यात अडचणी येतात. याला पेनफुल ब्लॅडर सिंड्रोम असंही म्हणतात. या विकारावर हायलुरॉनिक ऍसिड प्रभावी आहे. कॅथेटरच्या सहाय्याने ते थेट मूत्राशयात सोडल्यास या लक्षणांपासून आराम मिळतो.
हे झालं या रसायनाच्या गुणांबद्दल. पण त्याच्या दोषांचं काय?
हायलुरॉनिक ऍसिडचे दुष्परिणाम तसे पाहता अगदीच कमी आहेत. तुलनेने हे वापरासाठी सुरक्षित आहे. मात्र गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रिया यांच्यासाठी हे कितपत सुरक्षित आहे याचा अजून पुरेसा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे अशा स्त्रियांनी याचा वापर टाळलेलाच चांगला. याशिवाय एका अभ्यासानुसार हायलुरॉनिक ऍसिड मुळे कॅन्सरच्या पेशी अधिक जोमाने वाढतात. त्यामुळे कॅन्सरचे रुग्ण किंवा ज्यांना कॅन्सरची फॅमिली हिस्टरी आहे अशांनी या ऍसिडपासून लांब राहावं.
म्हणजे बघा, या गुणकारी पदार्थाचे दुष्परिणाम तसेच फारच किरकोळ आहेत. लेख वाचून तुम्हाला नक्कीच हा बहुगुणी पदार्थ कुठे मिळतो याची उत्सुकता वाटली असेल. तर याचे उगम आहेत चिकन ब्रॉथ, सोया उत्पादनं, लिंबूवर्गीय फळं, पालेभाज्या, नट्स आणि बिया.
लवकरात लवकर या आहाराकडे वळा आणि नैसर्गिक रित्या सुंदर त्वचा आणि उत्तम आरोग्य मिळवा.
-स्मिता जोगळेकर