computer

या औषधाने केले हजारो बालकांना जन्मजात अपंग !

मला सकाळी कसंसच होतं- आजकाल ना सकाळ्ळपासून माझ्या पोटात ढवळून येतं अशा तक्रारी घरातली सूनबाई करते तेव्हा काळजीसोबत घरात आनंदाचे वातावरणही पसरते. थोडक्यात पुढच्या पिढीची चाहूल घराला लागते. डोहाळ्यांची ही सुरुवात 'मॉर्निंग सिकनेस' या नावानेही ओळखली जाते. पण १९५०-६० च्या दरम्यान पाश्चात्य जगातील अनेक देशात बर्‍याच घरांच्या आनंदावर एक दु:खाची सावली पडली. त्या काळात जन्माला येणारी हजारो बाळे अनेक व्यंगासकट जन्माला यायला लागली.कोणाला हात नाहीत तर कोणाला पाय नाहीत.काहीवेळा दोन बाळं एकमेकांना चिकटून जन्माला आली.बरीचशी बाळं अर्थातच जास्त जगली नाहीत.जी जगली ती फारच कष्टाने आणि अल्पवयात गेलीही !

अर्थातच त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासह चर्चा सुरु झाल्या आणि थोड्याच दिवसात असं लक्षात आलं की सकाळच्या उलट्यांचा त्रास कमी होण्यासाठी जे औषध डॉक्टर देत होते ते औषधच या सगळ्यासाठी जबाबदार आहे. हे नक्की कसं आणि काय घडलं हेच आपण आज जाणून घेऊ या आजच्या बोभाटाच्या लेखातून !!

१९५० साली  थालीडोमाइड  (Thalidomide) हे एक औषध जर्मन फार्मासिटिकल कंपनी Chemie Grunenthal ने विकसित केले.सुरुवातीला हे औषध एखाद्या आजाराच्या लक्षणांनी होणारी तगमग शांत करणारे औषध ह्या प्रकारात विकसित केले गेले. त्याचा वापर निद्रानाश, सर्दी, पडसे, मळमळ आणि ताणतणाव कमी करण्यासाठी होऊ लागला. 

लवकरच ह्याचा वापर गर्भवती स्त्रियांना गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत होणाऱ्या सकाळच्या त्रासावर म्हणजे 'मॉर्निंग सिकनेस'वर उपचार म्हणून व्हायला लागला. उलट्या, भडभडून येणे, चक्कर इत्यादींवर हे औषध परिणामकारक सिद्ध होऊ लागले.पण हे औषध तयार करताना ह्याची कोणतीही चाचणी गर्भवती स्त्रियांवर केली गेली नव्हती. आणि ह्याचेच गंभीर दुष्परिणाम हजारो परिवारांना किंबहुना तब्बल दोन पिढ्यांना भोगावे लागले.

मातेने थालीडोमाइट घेतले की जन्माला येणारी मुलं व्यंगासकट जन्माला यायला लागली.काहींना हात-पाय नव्हते तर काहींचे डोळे,कान,जबडा विकसित झालेला नव्हता.काही बालकांचे अंतर्गत अवयव  सदोष होते किंवा विकसितच झाले नव्हते. लक्षात घ्या त्यावेळी आज उपलब्ध असलेले अल्ट्रासाऊंड (ultrasound) तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. त्यामुळे गर्भाच्या व्यंगाचा पत्ता लागायचाच नाही.या औषधाच्या प्रभावाने ४० टक्के बाळं जन्माच्या वेळेस किंवा जन्मानंतर काही महिन्यात मरण पावली.

गर्भावस्थेत निर्माण होणार्‍या विकृतीचे स्वरुप आणि तीव्रता आईने गर्भधारणेच्या कोणकोणत्या दिवशी औषध घेतले त्यावर अवलंबून असते असे नंतर लक्षात आले. २०व्या दिवशी घेतलेल्या औषधामुळे मध्यवर्ती मेंदूचे नुकसान होते,२१ व्या दिवशी डोळे तर २२ व्या दिवशी कान नाक चेहरा आणि २४ व्या दिवशी हात आणि २८ व्या दिवशी पायांचे नुकसान होते.साधारणतः गर्भारपणाच्या ४२ दिवसांच्या नंतर या घेतलेल्या औषधाच्या परिणामांची तीव्रता कमी असते.

 

इंग्लंडमध्ये साधारण तीन वर्षांच्या कालावधीत दोन हजार बालके या औषधाला बळी पडली.स्पेन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड जर्मनी, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रिया यांसोबतच  इतर अनेक देशांमध्ये या औषधाने धुमाकूळ घातला.या औषधामुळे जगभरात सुमारे पन्नास हजारंपेक्षा जास्त बालके प्रभावित झाल्याचं सांगण्यात येतं.तरीही हा आकडा खऱ्या संख्येपेक्षा बराच कमी असावा. त्या काळी औषध उत्पादक कंपन्या औषधांची सखोल तपासणी न करता औषधे बाजारात आणत.परीणामी त्या दरम्यान अशी अनेक औषधे बाजारातयायची आणिदुष्परीणाम दिसले की नाहीशी व्हायची. औषध कंपन्यांवर धाक ठेवणारी FDA सारखी यंत्रणा तेव्हा अस्तित्वात नव्हती.  थालीडोमाइट औषधाच्या गंभीर प्रकारानंतर, कोणतेही औषध बाजारात आलं तर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी 'फार्मा कोव्हीज्युलन्स' किंवा 'औषध नियमन आणि देखरेख'यंत्रणा निर्माण झाली.

१९६८ साली जर्मनीत  Grünenthal या औषध कंपनीला आणि कर्मचार्‍यांना कोर्टात खेचले गेले.औषध निर्मितीतील निष्काळजीपणा आणि सदोष मनुष्यहत्येचे आरोपपत्र त्यांच्यावर दाखल केले गेले.कंपनीने कोर्टाबाहेर खटला मिटवण्यासाठी १० कोटी डॉयश मार्क नुकसान भरपाई दिली. या रकमेत जर्मनीच्या सरकारने ३२ कोटी डॉयश मार्कची भर घालून एका ट्रस्टची स्थापना केली.मृत बाळांच्या पालकांना एकरकमी नुकसान भरपाई तर जगलेल्या बालकांना दरवर्षी मदत देण्यात आली.कंपनीवर कोणताही आरोप लागला नाही आणि कंपनी उजळ माथ्याने सहीसलामत बाहेर पडली.त्यानंतर ५० वर्षांनी कंपनीने जनतेची माफी मागीतली पण व्हायचे ते नुकसान होऊन गेले होतेच. आजही या औषधामुळे व्यंगासह जन्माला आलेली पाच सहा हजार आजही कसेबसे जीवन जगत आहेत. 

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या या औषधाचे दुष्परिणाम सुदैवाने भारतात मात्र नाही झाले. ह्याचे कारण म्हणजे, भारतात अजूनही गर्भवती स्त्रियांनाच नाही तर सगळ्यांनाच, छोट्या मोठ्या शरारिक तक्रारींवर घरगुती उपचार करण्यावरच भर दिला जातो. आयुर्वेद आणि योगासनांची जननी असलेल्या भारतात अजूनही घरगुती उपचारांवर सकस आहार आणि व्यायाम यांवरच भर दिला जातो. आता बाकी देशही आपलं अनुकरण करू लागले आहेत.

लेखिका:पद्मिनी ढवळे

सबस्क्राईब करा

* indicates required