एअर इंडियाच्या समृद्ध इतिहासाची झलक...वाचा १० महत्वाचे मुद्दे !!

एकेकाळी ही टाटांची खाजगी विमानसेवा कंपनी होती. पुढे त्याचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आणि आता पुन्हा ती टाटांच्या मालकीची कंपनी झाली आहे. आपण बघूया एअर इंडियाच्या समृद्ध वारशाची एक झलक या १० महत्वाच्या मुद्द्यांमधून.
१. एअर इंडियाचा पहिला लोगो
एअर इंडियाचा आजचा लोगो जर तुम्ही बघितला तर त्यात एक लाल रंगातील हंस आणि त्या हंसावर कोणार्क चक्र कोरलेलं दिसतं. पण एअर इंडियाची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा जे आर डी टाटांनी एक वेगळा लोगो निवडला होता. हा लोगो धनु राशीच्या चिन्हाशी मेळ खाणारा होता. या चिन्हाला ‘सेंटॉर’ म्हणतात. सेंटॉर म्हणजे असा माणूस ज्याचं कमरेच्या वरचं शरीर मानवाचं असून बाकीचं शरीर घोड्याचं आहे.
तर, एअर इंडियाच्या या लोगोवर धनु राशीतील धनुर्धारी प्रमाणे लाल रंगातील धनुर्धारी होता ज्याने हातातील धनुष्याचं लक्ष उंचावर ठेवलं होतं. हे उंचावरील लक्ष म्हणजे उच्च अध्यात्मिक आदर्शचं प्रतिक होतं. एक समान धागा म्हणजे, सध्याच्या लोगोत असलेला कोणार्क चक्र या जुन्या लोगो मध्येही होता.
२. सिंगापूर एअरलाईन्स
एअर इंडियाच्या यशानंतर इतर अनेक उद्योजकांना प्रेरणा मिळाली. यातील सर्वात पाहिलं नाव घेतलं जातं ते म्हणजे सिंगापूर एअरलाईन्सचं. सिंगापूर एअरलाईन्स बरोबरच कॅथी पॅसिफिक, थाई एअरवेज या विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्या तयार झाल्या. यामागे प्रेरणा होती ती आपल्या एअर इंडियाची.
३. जे आर डी टाटा
जे आर डी टाटा हे आपल्या कामाच्या बाबत किती काटेकोर होते हे त्यांच्या एअर इंडियातील कामावरून दिसतं. एअर इंडियाचे मालक असले तरी जे आर डी त्यांच्या प्रत्येक फ्लाईटच्या वेळी हजर असायचे. ग्राहकाच्या बियर पासून ते हवाई सुंदरीच्या हेअरस्टाईल पर्यंत सगळ्यांवर त्यांची बारीक नजर असायची. जर एअरलाईन काउंटर स्वच्छ नसेल तर जे आर डी ते स्वतःहून साफ करायचे. काम किती झोकून देऊन केलं पाहिजे याचं हे एक मोठं उदाहरण आहे.
४. ग्राहकांचे लाड
त्याकाळी ब्रिटीश एअरलाईन्सची सेवा एअर इंडिया पेक्षा कैकपटीने जलद होती, पण ग्राहक चक्क एअर इंडियाची निवड करायचे. याचं कारण म्हणजे एअर इंडियाचा विमानात ग्राहकांचे आत्यंतिक लाड व्हायचे. एअर इंडियासाठी ग्राहकांपेक्षा जास्त महत्वाचं काहीही नव्हतं.
५. पाहिलं जेट एअरक्राफ्ट
२१ फेब्रुवारी १९६० साली एअर इंडियाने पहिलं जेट एअरक्राफ्ट आपल्या सेवेत आणलं. जेट एअरक्राफ्ट असलेली एअर इंडिया ही आशिया खंडातील पहिली विमान कंपनी होती.
६. एक खास 'अॅश-ट्रे'
१९६७ साली एअर इंडियाने त्यांच्या खास ग्राहकांना (VIP) एक ‘अॅश-ट्रे’ भेट दिला. हा अॅश-ट्रे खास होता कारण जगद्विख्यात चित्रकार ‘साल्वाडोर दाली’ ने त्याला डिझाईन केलं होतं. हे डिझाईन सुद्धा खास होतं मंडळी. तुम्ही फोटो मध्ये बघूच शकता.
हा खास अॅश-ट्रे’ बनवल्याचा बदल्यात आपण साल्वाडोर दाली यांना एक बेबी हत्ती महुतासाहित गिफ्ट केला होता.
७. पॅलेस इन दि स्काय
एअर इंडियाने ‘पॅलेस इन दि स्काय’ या ब्रीद वाक्याखाली Boeing 747-200B हे प्रवासी विमान ग्राहकांच्या सेवेत आणलं. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात प्रवाश्यांना घेऊन जाणारं हे विमान त्यातील सर्वोत्कृष्ट सेवांसाठी ओळखलं जात होतं.
८. 'एअर लिफ्ट'
तुम्ही अक्षय कुमारचा 'एअर लिफ्ट' बघितला आहे का ? त्या चित्रपटात भारतीयांना मायदेशी परतण्यासाठी जे काम अक्षय कुमारचं पात्र करतं ती भूमिका खऱ्या आयुष्यात एअर इंडियाने सुद्धा निभावली होती. तब्बल १,११,००० भारतीयांना एअर इंडियाने कुवेत मधून भारतात यायला मदत केली होती.
५९ दिवसात अम्मान ते मुंबई दरम्यान तब्बल ४८८ वेळा फेऱ्या मारून एअर इंडियाने ही कामगिरी पार पाडली. एका नागरी विमानसेवा कंपनीने एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेली मदत ऐतिहासिक ठरली. अभिमानाची गोष्ट म्हणजे याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे.
९. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी खास विमाने
Flight AIC001 आणि Air India One ही Boeing 747 प्रकारातील एअर इंडियाची विमाने राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर मान्यवरांसाठी राखीव ठेवलेली आहेत. भारताच्या अत्यंत महत्वाच्या व्यक्तींसाठी राखीव असल्याने यांची बनवट सुद्धा वेगळी आहे. एकदा का प्रवासाचं वेळापत्रक ठरलं की या विमानांचं रुपांतर एका उडणाऱ्या ऑफिस मध्ये होतं. या विमानांमध्ये ८ पायलट जगात कुठेही उड्डाण करण्यासाठी नेहमी सज्ज असतात.
१०. मुछवाला महाराज
एअर इंडियाची एक जाहिरात प्रचंड गाजली ती म्हणजे मुछवाल्या महाराजची. एअर इंडियाच्या लाल रंगाचे कपडे, पगडी, मोठ्याल्या मिश्या आणि आदराने झुकलेली मान. एअर इंडिया लोकांच्या सेवेत नेहमी हजर असल्याचं हा महाराज ग्वाही देत आहे. तुम्ही सुद्धा असा फोटो बघितला असेल. हा महाराज इतका गाजला की तो एअर इंडियाचा आहे हेच लोक विसरले.