computer

१५ अद्भुत आणि जगावेगळे प्राणी...

पृथ्वीवरील जीवसृष्टीत कितीतरी वैविध्य आहे. कितीतरी प्राणी, पक्षी, झाडे, फुले, त्यांचे वेगवेगळे रंग आणि आकार. निसर्गातील ही विविधताच आपल्याला निसर्गाच्या प्रेमात पाडते. या सगळ्या वेगळेपणात ज्याचे त्याचे एक वैशिष्ट्य आहे, खासियत आहे, ज्यामुळे इथे प्रत्येक प्राण्याला महत्व आहे. कितीतरी प्राणी आपल्या पाहण्यातही येत नाहीत. तर, कित्येक प्राणी पाहिल्यावर आपल्याला असे वाटते की जणू हे प्राणी या जगातील नव्हेतच. आज इथे अशाच काही प्राण्यांची आपण ओळख करून घेणार आहोत जे दिसायाला इतके अद्भुत आहेत की ते या ग्रहावरचे आहेत यावर सहज विश्वास बसत नाही.

१. पिकॉक स्पायडर

कोळ्याचे अनेक प्रकार तुम्ही पहिले असतील. त्यातीलच हा एक प्रकार. या कोळ्याच्या शरीरावरील विविध रंगांच्या पट्ट्यांमुळे त्याला पिकॉक स्पायडर हे नाव  मिळालं. हा कोळी ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो. याचा आकारही अगदी छोटा असतो. फक्त ३ ते ५ मिमी आकाराचा हा पाणी शरीरावरील रंगीबेरंगी पट्ट्यांमुळे चटकन आपले लक्ष वेधून घेतो.

२. ग्लॉकस अॅटलांटिकस

हा समुद्री गोगलगायीचा प्रकार आहे. गडद निळ्या रंगाचा हा प्राणी दिसायला तरी एकमद आकर्षक आणि निरुपद्रवी वाटतो, पण प्रत्यक्षात हा प्राणी खूपच भयानक आहे. समुद्रातील विषारी जेलीफिश हे त्याचं खाद्य. या प्राण्याला हात लावणं खूपच धोकादायक ठरू शकतं. याला स्पर्श केल्यानंतर हा डंख मारतो. जेलीफिशच्या विषाहूनही याच्या दंशातील विष खूपच घातक असतं. दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व आणि दक्षिण किनाऱ्यावर, युरोप, मोझांबिक आणि ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर हा प्राणी आढळतो.

३. पांडा अँट

आता याच्या नावात अँट असले तरी हा कीटक म्हणजे काही मुंगी नाही. गांधीलमाशीच्या कुळातील हा कीटक आहे. हा कीटक फारसा विषारी नसला तरी त्याच्या दंशाने तीव्र वेदना होतात. हा कीटक समूहाने राहण्यापेक्षा एकटाच राहतो. हा प्रामुख्याने अर्जेन्टिना आणि चिली या देशात आढळून येतो.

४. रेड-लिप्ड बॅटफिश

गॅलापागोस बेटाजवळील खोल समुद्राच्या तळाशी आढळून येणारा हा एक विशिष्ट प्रकारचा मासा आहे. याचा आकार थोडा चपटा आणि पसरट असतो. याचे ओठ एकदम लालभडक असतात. शास्त्रज्ञांच्या मते जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी याच्या ओठांना निसर्गाने असा रंग दिला असेल.

५. ब्ल्यू पॅरट फिश

याचा रंग एकदम निळा भडक असतो आणि याच्या डोक्यावर एक पिवळा डाग असतो. मजेशीर बाब म्हणजे हा मासा मोठा होत जाईल तसतसा डोक्यावरचा तो पिवळा डाग फिकट होत जातो. पश्चिमी अटलांटिक समुद्रात हा मासा आढळून येतो. वाळूतील अल्गी सारख्या एकपेशीय वनस्पती हेच याचे खाद्य. याचा संपूर्ण दिवस फक्त स्वतःचे खाद्य शोधण्यातच जातो.

६. हॅलिट्रेफेस जेली

शरीरावरील विविध रंगाच्या पट्ट्यांमुळे हा प्राणी खूपच आकर्षक दिसतो. समुद्राच्या तळाशी हा जेलीफिश आढळतो. शास्त्रज्ञांना मेक्सिको आणि कॅलिफोर्नियातील समुद्र तळाशी ४.०१९ फुल खोल अंतरावर हा पहिल्यांदा आढळला होता.

७. पिकॉक मँटीस श्रींप

संपूर्ण शरीरावर विविध रंगांची झालर पांघरणारा हा एक दुर्मिळ जलचर. याच्या नावात श्रींप असले तरी, हा झिंगा नाही. पण, झिंग्याचा दूरदूरचा नातेवाईक आहे. इंडो-पॅसिफिकच्या एपीप्लेजीक समुद्र किनाऱ्यावर हा प्राणी आढळतो. विशेषत: गुआम ते पूर्व आफ्रिकेच्या किनारपट्ट्यावर हा प्राणी जास्त आढळतो.

८. लिफी सी ड्रॅगन

या पृथ्वीवर किती प्रकारचे जीव आहेत आणि ते कोणते याची आपल्याला कल्पनाही नाही. आपण कल्पना करू शकणार नाही असाच एक हा प्राणी, लिफी सी ड्रॅगन. याच्या शरीराचा आकार, रंग पाण्यातल्या एखाद्या झुडपासारखा असतो. त्यामुळे हा प्राणी चटकन ओळखता येत नाही. गमतीची बाब म्हणजे समुद्री घोड्याप्रमाणे यांच्यातही अंडी उबवण्याचे काम नर करतो. विशेषत: दक्षिण आणि पूर्व ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात हा प्राणी आढळतो.

९. प्रोबिस्कस मंकी

प्रोबिस्कस माकडाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे नाक खूपच लांब आणि टोकदार असते. एखाद्या पक्ष्याचा चोचीसारखे. नर माकडे याचा वापर मादीचे लक्ष्य आपल्याकडे खेचून घेण्यासाठी करतात. फक्त बोर्निओच्या जंगलात, मग्रूव्ह बेटात या जातीची माकडे आढळून येतात.

१०. इन्सुलमन पॅलाव्हॅन्सेस क्रॅब

याच्या जांभळ्या आणि लाल रंगामुळे हा खेकडा खूपच आकर्षक दिसतो. फिलिपाईन्स मधील पलावन बेटावरील स्वच्छ पाण्यात हे खेकडे आढळतात.

११. डूगॉंग

पूर्व आफ्रिकेच्या उबदार समुद्र किनारी आढळणारा हा एक व्हेल माशासारखाच सस्तनप्राणी. हा समुद्रातील गवतात चरतो. आकाराने खूपच मोठा असल्याने याची हालचाल अतिशय मंद असते. सुरक्षेसाठी हा जमिनीखाली लपतो आणि किमान सहा मिनिटे तरी हा जमिनीखालीच राहू शकतो.

१२. आय आय

मादागास्कर बेटावर आढळणारा हा एक प्राणी. चिपांझी, एप्स आणि मानव यांच्यातील एक दुवा म्हणण्यास हरकत नाही. हा प्राणी केसाळ असतो आणि शरीरापेक्षा याची शेपूट मोठी असते. पायांच्या बोटांना अणकुचीदार नखे असतात. मादागास्कर बेटावर मात्र या प्राण्याबद्दल अंधश्रद्धा आहेत. सध्या हा प्राणी अत्यंत दुर्मिळ प्रजातीत गणला जातो आणि कायद्याने याची शिकार करायला बंदी आहे.

१३. स्टार नोज्ड मोल

या प्राण्याचे नाक हे स्टारच्या आकाराचे असते. त्याच्या भोवताली २२ मिश्या असतात. ज्याचा वापर करून तो आपले अन्न शोधतो. याला डोळे नसतात तरीही तो जगातील वेगवान शिकारी प्राणी आहे. अळी, किडा हेच याचे खाद्य.

१४. ग्लास फ्रॉग

या बेडकाची त्वचा काचेसारखी पारदर्शी असते. त्याच्या या वैशिष्ट्यावरूनच त्याला ग्लास फ्रॉग हे नाव पडले आहे. त्याच्या या पारदर्शी त्वचेमुळे त्याच्या शरीरातील सगळे अवयव तुम्ही पाहू शकता. अगदी त्याचे हृदयही. हे बेडूक झाडात लपून बसतात. फक्त विणीच्या हंगामातच ते बाहेर पडतात. उंच ठिकाणी आणि आर्द्र हवामानात हा प्राणी राहतो. बेलीझ, कोस्टारिका, कोलंबिया, ग्वॉटेमाला, पनामा, मेक्सिको याठिकाणी हा प्राणी आढळतो.

१५. लॉंग-वॅटल्ड अंब्रेला बर्ड

हा एक अतिशय दुर्मिळ पक्षी असल्याचे मानले जाते. कोलंबियाच्या नैऋत्य भागात हा पक्षी आढळतो. विशेषत: कमी उंचीच्या ठिकाणावर तो राहतो.

 

लेखिका : मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required