computer

चहाची निर्मिती, प्रकार आणि दर्जा कसा ओळखावा यांसह चहाबद्दल या १६ गोष्टी तुम्हांला माहित असायलाच हव्यात!!

‘बायकांनी कुंकवाच्या बोटाला आणि पुरुषांनी चहाच्या घोटाला नाही म्हणू नये.’ अशी आपल्याकडे म्हण आहे. बाहेर मस्त मुसळधार कोसळणारा पाऊस, जोडीला धुक्याची अलवार पखरण अशा वातावरणात हमखास आठवणारं पेय म्हणजे चहा. अशा वेळी वाफाळत्या चहाचा आस्वाद घेणं ही सुखाची परमावधी आहे.

लहानथोर, गरीब श्रीमंत अशा सगळ्यांनी आपलंसं केलेला, माणसं जोडणारा, भूक भागवणारा, कधी भूक मारणाराही, नेहमीच्या टपरीवाल्याकडे कटिंग बनून येणारा आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नजाकतीने ’कस्टमर’समोर ‘प्रेझेंट’ होणारा... हे समस्त गुणविशेष मिरवणारा चहा हे जगात पाण्याच्या खालोखाल प्यालं जाणारं पेय आहे. काही ठिकाणी उल्लेख केल्यानुसार चहा तृषाशामक- तहान भागवणारा, झोप घालवणारा, मेंदूला उत्तेजित करणारा, मेंदू, मूत्राशय, घसा आणि छातीच्या विकारांवर उपयुक्त असल्याचा उल्लेख आहे. पण याशिवाय त्याचे इतर अनेक रंजक पैलू आहेत. बघा तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत का...

१. सुरवात आपली चहापत्ती कशी बनते यापासून करू.

आपण जाहिरातींत पाठीवर टोपल्या घेतलेल्या बायका चहाची पानं खुडून टोपलीत टाकताना पाहातो. पण मग आपल्यापर्यंत येणारी चहापत्ती नक्की कोणत्या प्रक्रियेतून जाते?

आपली नेहमीची चहाची पत्ती तयार करताना चहाची पानं तोडून वाळवतात. नंतर विशिष्ट तापमानाला आणि बाष्प नियंत्रित कक्षात ती आंबवतात आणि मग भट्टीत भाजतात. त्यामुळे ही पत्ती काळी दिसते आणि तिला विशिष्ट रंग, वास आणि किंचित कडसर चव प्राप्त होतात. मात्र ग्रीन टी तयार करताना चहाची पानं खुडून न आंबवता फक्त वाफवतात.

२. पांढरा चहा

चहाच्या झाडांची जी पानं अगदी कोवळी असतात, त्यांच्यात हरितद्रव्य तयार झालेलं नसतं. त्या पानांपासून पांढरा चहा (व्हाईट टी) बनवला जातो. याचा स्वाद आणि रंग सौम्य असतात, चव मात्र नैसर्गिकरित्या गोड असते.

३. चीनमध्ये ऊलाँग टी प्याला जातो. तो बनवण्यासाठी चहापत्ती अल्प प्रमाणात आंबवली जाते.

४. चहा उकळण्याची पद्धती.

चहाची पत्ती जेवढी लांब, तेवढा चहा मुरण्यासाठी वेळ जास्त लागतो. त्यामुळे लांब पानं असलेला चहा जास्त वेळ उकळला तरच त्याचा टेस्ट पॉइंट बरोबर जमतो. याउलट चहाची पावडर बारीक असेल तर चहा उकळताना तुलनेने लवकर गडद रंग येतो.

५. चहा पानं(लीफ) आणि डस्ट (भुकटी) या दोन प्रकारांत मिळतो.

पानं असलेला चहा उत्तम दर्जाचा समजला जातो. तो मुरण्यासाठी अधिक वेळ लागत असला, तरी त्याची चव तुलनेने अफलातून असते. डस्ट हा कमी दर्जाचा चहा मानला जातो. बरेचदा तो लीफ टी म्हणजे पानांचा चुरा काढून घेतल्यानंतर राहणारा भाग असतो. पण हा डस्ट टी पटकन मुरत असल्याने टी बॅग्जमध्ये तोच वापरला जातो. काहीलोक अगदीच भुकटी नाही आणि अगदीच पानांचा चुरा नाही, असा दाणेदार चहा वापरतात. पण म्हणजे, जितकी चहाची भुकटी बारीक, तितका त्याचा दर्जा कमी असतो हे सूत्र लक्षात ठेवायला हरकत नाही.

६. चहाचा स्वाद चांगला येण्यासाठी तो जरूर मुरवावा. त्यासाठी साधारण १ मिनिट त्यावर झाकण ठेवावं. मात्र ५ मिनिटांपेक्षा जास्त चहा मुरवल्यास तो कडू बनतो.

७. सन टी हा चहाचा असा प्रकार आहे, ज्यात चहा आणि पाणी सूर्याच्या उष्णतेने उकळून चहा तयार करतात.

८. भारतातल्या चहा तयार करण्याच्या पद्धती.

आपल्याकडे कोकणात दुधाच्या ऐवजी नारळाचं दूध घालून चहा करतात. त्यांच्याकडे बिनदुधाच्या चहाला फुटी चाय म्हणतात. अनेक ठिकाणी खेडेगावांमध्ये गुळाचा चहा करतात, तो खमंग लागतो. तसंच हैदराबादला चहावर भरपूर सायीचा जाड थर घालतात, ज्याला बुरखेवाली चाय किंवा चद्दरवाली चाय म्हणतात. पिताना फक्त कॅलरीजचा विचार नाही करायचा!

९. गुलाबी चहा

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात खास पिंक टी किंवा काइमाक टी अर्थात गुलाबी चहा प्रसिद्ध आहे. याला नून चाय असंही म्हणतात. हा हिवाळ्यात आणि खास प्रसंगी प्यायला जातो. यासाठी खास प्रकारची पत्ती वापरली जाते. काहीसा घट्टसर, सुवासिक आणि मलईदार टेक्श्चर असलेला हा श

१०. हाय टी

हाय टी हा प्रकार मूळचा ब्रिटनमधला. हा संध्याकाळी ५ ते ६ च्या दरम्यान घेतात आणि जेवणाच्या उंच टेबलवर दिला जातो. म्हणून त्याला म्हणायचं हाय टी. आपल्याकडे कॉन्फरन्सेसमध्ये संध्याकाळी चहा-बिस्किटं दिली जातात त्याला हाय टी म्हणण्याची फॅशन आजकाल आलेली दिसते

११. मुंबईतल्या भटाच्या चहाला एक वेगळा इतिहास आहे.

पूर्वी फोर्टमध्ये ऑफिसमधील कारकून उच्चवर्णीय असत. त्यांना पाणी आणि चहा ब्राह्मणांच्या हातचा लागायचा. त्यासाठी हे राजस्थानी ब्राह्मण मुंबईत आणले गेले. यांना आखूड धोतरवाले असेही म्हटले जाई. कारण लांब धोतर विद्वान ब्राह्मण नेसत असत. त्यातून हे अमृततुल्य चहावाले ठिकठिकाणी आले.

१२. अमृततुल्य चहा

अमृततुल्य चहा तयार करताना बघणं हाही एक वेगळा अनुभव आहे. त्यासाठी पितळी भांडं वापरतात. जसजसं भांडं जास्त वापरलं जाईल तसतशी चहाची चव अधिकाधिक उत्तम बनत जाते.

१३. अंडं टाकलेला चहा.

पूर्वी मुस्लिम टॅक्सीवाल्यांचे चहावाले वेगळे असायचे. त्यात अंड्यातील पांढरा भाग वापरला जाई. त्याला 'चिलीया' चहा म्हणत असत.

१४. टाइम्स ऑफ इंडियाचा चहा.

टाइम्स ऑफ इंडियाने पण चहा विकून बघितला होता. पोर्सेलीनच्या बरणीत हा उच्च प्रतीचा चहा विकला जायचा. या चहाची किंमत १४०० रुपये किलो होती.

१५. चहा सुरुवातीला उच्चभ्रू लोकांचं पेय मानलं गेलं. तेव्हा बिअरला आरोग्यदायी पर्याय म्हणून चहा पुढे आला होता. पुढे त्याच्या किंमती कमी झाल्या आणि तो सर्वसामान्य लोकांना सहज उपलब्ध होऊ लागला.

१६. अमेरिकेच्याच नाही, तर जगाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटनांपैकी एक म्हणजे बोस्टन टी पार्टी.

१७७३ मध्ये ब्रिटिश सरकारनं ईस्ट इंडिया कंपनीला कुठलाही कर न भरता अमेरिकन वसाहतींमध्ये चहा विकण्याची परवानगी दिली. पण वसाहतींमधल्या व्यापारावर ब्रिटनचं असं नियंत्रण अमेरिकन राष्ट्रवाद्यांना मान्य नव्हतं. त्याचा निषेध करण्यासाठी १६ डिसेंबर रोजी बोस्टन येथे क्रांतिकारक एकत्र जमले. या जमावानं बंदरात घुसून तीन जहाजांवरचा जवळपास तीनशे टन चहा समुद्रात फेकून दिला. या घटनेनंतर अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्याने वेग घेतला. ज्या परिसरात ही घटना घडली, तिथं आता बोस्टन टी पार्टी म्युझियम आहे.

चहा हा विषय इतका खोल आहे की तो एका लेखात संपण्यासारखा नाही. पण आपल्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या या दोस्ताची थोडी ओळख करून घेतलेली काय वाईट?

 

लेखक : स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required