फोटो स्टोरी: खांद्यावर नुडल्सचा मनोरा तोलणारे जपानचे आगळेवेगळे डिलिव्हरी बॉईज!!
फोटोत दिसत असलेला माणूस आपल्या खांद्यावर काय तोलून नेत आहे? तुम्हाला काही अंदाज आला का? फोटोवरून अंदाज येणं थोडं कठीण आहे, आम्हीच सांगतो. हा फोटो एका डिलिव्हरी बॉईचा आहे. त्याच्या खांद्यावर दिसणारा उंच मनोरा हा नुडल्स बाउल्सचा आहे. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा झोमॉटो आणि स्वीगीसारख्या सेवा नव्हत्या. जपानमध्ये या पद्धतीने कित्येक डिलिव्हरी बॉईज नुडल्स पोचवण्याचं काम करायचे. अन्नपदार्थ पोचवण्याच्या काही जुन्या पद्धतींमध्ये जपानच्या या पद्धतीचा समावेश होतो. आजच्या फोटो स्टोरीमध्ये जपानच्या या आगळ्यावेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
लगेच खाता येण्यासारख्या अन्नपदार्थांना पोचवण्याची ही पद्धत जपानमध्ये Demae नावाने प्रचलित आहे. Demae चा अर्थ होतो सामोरे जाणे. Demae चा इतिहास हा १७०० च्या इडो काळापर्यंत मागे जातो. त्या काळातल्या जपानमध्ये, मुख्यत्वे श्रीमंतांकडून ही सेवा वापरली जायची. हे श्रीमंत लोक आपल्या नोकरांना हॉटेल्समध्ये पाठवून जेवण मागवायचे. पुढे जाऊन ही पद्धत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचली. सर्वसामान्य कर्मचाऱ्यांपासून ते विद्यार्थी, व्यावसायिक, कामगार या सेवेचा वापर करू लागले. आपल्याकडे जशी बिर्याणीला सर्वात जास्त मागणी असते, त्याप्रमाणे त्याकाळात जपानमध्ये सोबा बकव्हीट नुडल्सना मागणी होती. Demae चा वापर करून मागवल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये सोबा बकव्हीट नुडल्सचे प्रमाण जास्त असायचे. याचं एक कारण म्हणजे सोबा बकव्हीट नुडल्स स्वस्त असायच्या आणि खराब न होता अन्न सहज नेता यायचे.
वर्षानुवर्षांच्या मागणीमुळे सोबा बकव्हीट नुडल्सना पोचवणाऱ्या करणाऱ्या लोकांची एक परंपराच तयार झाली. हे काम अत्यंत जिकरीचे असायचे. एकतर हॉटेल मालक कमी लोकांना कामावर ठेवत, त्यामुळे एका डिलिव्हरी बॉईला डझनभर सोबा बकव्हीट नुडल्स पोचवायला लागायचे. पैशांची कमतरता असल्याने डिलिव्हरीचं काम करण्यासाठी केवळ एकच साधन वापरता यायचं. ते म्हणजे सायकल.
अनेक वर्षांमध्ये ही परंपरा एवढी विकसित झाली की डिलिव्हरी बॉईज सहजपणे नुडल्सचे मनोरे घेऊन प्रवास करू शकायचे. ही एक जीवनपद्धतीच झाली होती म्हणा ना. काही वेळा नुडल्सचा मनोरा ५ फुट उंच असायचा. हे मनोरे एका खांद्यावर ठेवले जायचे. ते पडू नये म्हणून एका हाताने त्यांना धरून ठेवलं जायचं, तर दुसरा हात सायकलचा तोल धरून असायचा. आपल्याकडे डोंबारी ज्या पद्धतीने तोल सांभाळतात त्यापेक्षा हे काही वेगळं नव्हतं.
अन्नपदार्थ पोचवण्यासाठी जो खर्च लागायचा त्याचं व्यवस्थापनही जवळजवळ आजच्या प्रमाणेच होतं. म्हणजे काही वेळा डिलिव्हरी चार्जेस माफ असायचे तर काही वेळा बिलामध्ये ते आधीच गृहीत धरलं जायचं. काही हॉटेल्स तर एकापेक्षा जास्त ऑर्डर असतील तरच डिलिव्हरी द्यायचे.
जपान प्रमाणेच कोरियामध्येही या प्रकारची सेवा दिली जायची. दोन्हीकडे एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे नुडल्सची प्रचंड मागणी. काळाच्या ओघात नुडल्सचे मनोरे घेऊन जाणारे लोक नाहीसे झाले असले तरी त्यांची जागा नव्या तंत्रज्ञानाने घेतली आहे. याअर्थी Demae अजूनही सुरूच आहे असं म्हणता येईल.
जाता जाता जपानच्या इतिहासातील Demae ची काही क्षणचित्रे पाहून घ्या.
आजची फोटो स्टोरी कशी वाटली हे सांगायला विसरू नका.