computer

गुलामगिरी नष्ट करण्यासाठी झटणाऱ्या अब्राहम लिंकनना त्यांचे हे प्रयत्नच भोवले आणि एका अभिनेत्याने त्यांची हत्या केली.

काही माणसांचं या जगातून जाणं अनेकांसाठी चटका लावून जाणारं असतं. अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन हे यापैकीच एक. सिस्टीममध्ये राहून सिस्टीम बदलण्याचा प्रयत्न करणारा द्रष्टा आणि संवेदनशील राजकारणी म्हणून जग त्यांना मानतं. लोकशाहीबद्दलची त्यांची तत्त्वं जग आजदेखील अनुसरतं. त्यांच्या कारकिर्दीत अमेरिकेत घडलेल्या सिव्हील वॉर(अमेरिकन यादवी युद्ध)ची परिणिती त्यांच्या हत्येत झाली. हे युद्ध इतिहासातील सर्वाधिक रक्तरंजित युद्धांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. लिंकन यांच्या हत्येने जगाने एक उत्तम राजकारणी गमावला. अजून काही काळ हयात असते तर कदाचित अमेरिकेत कृष्णवर्णीयांना जास्त अधिकार मिळाले असते आणि अमेरिकेचं चित्रही वेगळं दिसलं असतं. पण तसं व्हायचं नव्हतं.

लिंकन यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८०९चा. जवळपास २०० वर्षांपूर्वीचा. तेव्हा अमेरिकेत गुलामगिरी मोठ्या प्रमाणावर होती आणि त्याच्याच जोडीला टोकाचा वंशवाद होता. आफ्रिकन कृष्णवर्णीय लोकांकडे गोरे हीन दृष्टीनेच बघत असत. त्यावेळी अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये कापसाची शेती केली जात असे आणि त्या शेतांत राबण्यासाठी आफ्रिकेतून लोक गुलाम म्हणून नेले जात. तिथे त्यांना अत्यंत कष्टाची कामं करावी लागत. शिवाय त्यांना कोणत्याही सोयीसुविधा किंवा अधिकार नव्हते. तुटपुंज्या मजुरीच्या बदल्यात त्यांना भरपूर कष्ट करावे लागत. गुलामगिरीचे हे प्रमाण उत्तरेकडील राज्यांच्या तुलनेत दक्षिणेकडील राज्यांत जास्त होते. या दक्षिणेकडील राज्यांना कॉन्फेडरेट स्टेट्स असं म्हणत.

गरीब कुटुंबात वाढलेल्या आणि स्वतःच्या कर्तृत्वावर अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद मिळवलेल्या अब्राहम लिंकन यांनी ही गुलामगिरीची प्रथा समूळ उपटून टाकायची असं ठरवलं. त्यांनी गुलामगिरीला नुसता विरोधच केला नाही, तर त्याविरोधात कायदाही केला. साहजिकच गुलामगिरीचं समर्थन करणारी दक्षिणेची राज्यं, तेथील लोक चिडले. त्यांनी हा कायदा त्यांच्या राज्यात लागू करणार नाही असं जाहीर केलं. त्याचाच परिणाम म्हणून अमेरिकेत सिव्हील वॉर(यादवी युद्ध) झालं. या युद्धामध्ये गुलामगिरीला विरोध करणारे आणि गुलामगिरीचं समर्थन करणारे असे दोन गट एकमेकांना भिडले. या युद्धात दोन्ही बाजूंनी अपरिमित हानी झाली. दिवसागणिक निष्पाप लोक मारले जात होते. लिंकन यांनी युद्ध थांबवण्याचे आटोकाट प्रयत्न केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट दिवसेंदिवस ते आणखीनच उग्र रूप धारण करत होतं. तब्बल चार वर्षं हे युद्ध सुरू राहिलं. या काळात त्या त्या वेळच्या परिस्थितीला अनुसरून लिंकन यांनी काही निर्णय घेतले खरे, पण ते चांगलेच वादग्रस्त ठरले. त्यांनी लोकांच्या भाषण स्वातंत्र्यावर बंधनं आणली. इतरही काही अधिकार काढून घेतले. पुढेपुढे लोक या महाभयंकर संहारासाठी लिंकन यांनाच जबाबदार धरू लागले. लिंकन स्वतःदेखील असहाय्य झाले होते. अखेरीस त्यांनी कॉन्फेडरेटच्या नौदल नाकाबंदीची घोषणा केली आणि युद्धाला पूर्णविराम मिळाला. एकेक करत उत्तरेकडील राज्यांनी कॉन्फेडरेट्सवर विजय मिळवला. पूर्ण विजय मिळाल्यानंतर लगोलग लिंकन यांनी अमेरिकेत गुलामगिरी बंद करत असल्याची घोषणा केली.

या कारणामुळे अनेक लोक नाराज झाले. लिंकन यांच्या विरोधकांची संख्या वाढायला लागली. असाच एक अभिनेता त्यांच्यावर चांगलाच चिडून होता. त्याचं नाव होतं जॉन बूथ. त्याच्या मते गुलामगिरीच्या प्रथेत वाईट काहीही नव्हतं. उलट त्यामुळे गोऱ्या लोकांचे श्रम वाचत होते आणि काळ्यांनाही उपजीविकेचं साधन मिळालं होतं. त्याच्यामते सिव्हील वॉर दरम्यान लिंकन उगाच नाही तो मुद्दा धरून अमेरिकेला चुकीची दिशा देत होते. त्यांच्याचमुळे अमेरिकेतल्या घराघरात मृत्यूचं तांडव घडून आलं होतं, असा बूथचा समज झाला होता.

हा बूथ दिसायला उंचापुरा आणि अतिशय मोहक होता. लिंकन यांनी गुलामगिरीला केलेला विरोध संपुष्टात आणण्यासाठी केलेल्या कायद्यामुळे जॉनची तळपायाची आग मस्तकात गेली. शिवाय काहीही झालं तरी गुलामगिरीच्या विरोधकांच्या बाजूने लढणार नाही असं त्याने त्याच्या आईला वचन दिलं होतं. त्याने अब्राहम लिंकन यांना धडा शिकवण्याचा प्लॅन केला. सुरुवातीला त्याने त्यांना फक्त किडनॅप करण्याचाच विचार केला होता. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात कैद केलेल्या कॉन्फेडरेट सदस्यांची सुटका करून घ्यायची असं त्याने ठरवलं होतं. त्यावेळी लिंकन नेहमी सुरक्षेच्या वेढ्यात असतात असं सांगत त्याच्या इतर साथीदारांनी त्याच्या अपहरणाच्या योजनेला विरोध दर्शवला. नंतर लिंकन आपलं नाटक बघण्यासाठी नाट्यगृहात येणार आहेत हे कळल्यावर बूथने त्यांना ठार मारण्याचा बेत आखला.

अखेरीस तो दिवस उजाडला. १४ एप्रिल १८६५ या दिवशी लिंकन नाट्यगृहात बसलेले होते. प्रयोग रंगलेला. त्यावेळी तो त्यांच्या मागून असलेल्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करता झाला. त्याने लिंकन यांच्यावर मागच्या बाजूने गोळी झाडली आणि तत्क्षणी तिथून पसार झाला. जे काही घडलं होतं इतकं धक्कादायक होतं, की तिथे शेजारी बसलेली त्यांची बायको जोरात ओरडली. अब्राहम लिंकनना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली, पण त्याचा उपयोग झाला नाही. लिंकन यांचा मृत्यू झाला. पुढे अनेक दिवसांच्या तपासानंतर या हत्याकांडाचे सर्व आरोपी पकडले गेले.

या घटनेनंतर उत्तर आणि दक्षिण अमेरिका यांच्यातील संबंध पूर्णपणे बिघडले. त्यांच्या मृत्यूचा विरोधकांना अफाट आनंद होता. गुलामगिरीच्या विरोधकांनी लिंकन यांच्या हत्येसाठी दक्षिणेतील राज्यांना जबाबदार ठरवत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. दक्षिणेतील राज्यांनी आम्ही गुलामांना अधिकार देऊ असं सांगितलेलं असलं, तरीही प्रत्यक्षात मात्र तसं घडलं नाही. परिणामी लिंकन यांचं गुलामगिरी संपुष्टात आणण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required