जेव्हा पक्षी गनिमी कावा वापरून माणसांशी युद्ध जिंकतात...वाचा हा अतरंगी इतिहास !!
माणसा माणसांमध्ये युद्ध होतं, त्यातला एक जिंकतो आणि दुसरा हरतो, हे ठरलेलं असतं, पण तुम्हाला कोणी विचारलं की पक्षी आणि माणसांमध्ये युद्ध झालं तर कोण जिंकेल ? तर उत्तर सोप्पं आहे. माणूसच जिंकेल ना भाऊ. पण इतिहासात असे खूप कमी दिवस येतात जेव्हा आपण विचार करतो त्याच्या उलट घडतं. असाच दिवस उगवला होता १९३२ साली जेव्हा माणूस चक्क पक्ष्यांकडून हरला होता. हे पक्षी होते ‘एमू’.
एमू पक्षी हा ६ फुट उंच आणि जवळजवळ ४५ किलोंचा असतो. एमू पळण्यात अगदी चपळ बरं का. त्याच्या पाळण्याची गती जवळजवळ ताशी ४८ किलोमीटर असते.
चला आता आपल्या विषयाकडे वळूयात. एमू पक्षी आणि ऑस्ट्रेलियाचे जवान यांच्यातील युद्धात काय झालं घडलं होतं ? चला जाणून घेऊया...
पश्चिम ऑस्ट्रेलिया मध्ये १९३२ साली ‘एमू युद्ध’ घडलं होतं. एका बाजूला गरीब निशस्त्र एमू पक्षी आणि दुसऱ्या बाजूला मशीन गन घेतलेला माणूस. हे युद्ध बरोबरीचं नव्हतं पण तरीही चक्क एमू पक्ष्यांचा विजय झाला. पण त्या आधी जाणून घेऊया हे युद्ध घडलं तरी का ?
पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या भागात शेतकऱ्यांना एमूंचा त्रास होत होता. तब्बल २०,००० एमू त्या भागात आले होते. त्यांनी गव्हाचं पिक खाऊन फस्त केलं होतं, शेतकरी हैराण झाले होते. शेतकऱ्यांनी लगेचच सरकारकडे धाव घेतली. सरकारने त्यांच्या मदतीसाठी थेट पहिल्या महायुद्धातील सैनिकांना पाचारण केलं आणि एमूंला हाकलण्याची मोहीम सुरु केली.
पहिल्या महायुद्धात वापरण्यात आलेली ‘लुईस’ मशीनगन यावेळी वापरण्यात येणार होती. या मशीन गनच्या मार्फत तब्बल ५०० गोळ्या प्रती मिनिट झाडता येत होत्या. तर अशा रीतीने एमू हे जवळजवळ संपणार हे ठरलंच होतं. पण एमू मूर्ख नसतात राव.
युद्धाच्या दिवशी
पहिला दिवस
एमू ज्या भागात होते त्या भागात सैनिकांनी छावणी उभारली. सैनिकांना एमू स्पष्ट दिसत होते पण समस्या अशी होती की ते फायरिंग रेंजच्या बाहेर होते. यामुळे सैनिकांचा प्रमुख ‘मेरीडीथ’ याने त्यांना फायरिंग रेंज मध्ये आणण्यासाठी शेतकऱ्यांना विनंती केली. शेतकऱ्यांनी त्याप्रमाणे एमूं ना घाबरवण्यास सुरुवात केली पण एमू मूर्ख नव्हते. ते चक्क जंगलात पळाले आणि त्यांनी गनिमी काव्याचा वापर केला.
एमू जंगलात गेले हे बघून मेरीडीथ ने जंगलाच्या दिशेने फायरिंग करण्यास सुरुवात केली. त्यात किरकोळ संख्येने एमू जखमी झाले. या संघर्षातून एमूंचे चातुर्य आणि सैनिकांची हतबलता फक्त सिद्ध झाली.
दुसरा दिवस
जवळपासची शेतं आणि एमूंचा वावर याचा अंदाज घेऊन मेरीडीथने एमूंना ‘अँबुश’ करून म्हणजेच घेराव घालून मारण्याचा बेत आखला. घेराव घालण्यासाठी पाणवठा किंवा तळे ही अत्यंत योग्य जागा होती. ४ नोव्हेंबरला अंदाजे १,००० एमू तळ्यावर आले. मेरीडीथ आणि त्याची माणसे गन्स सज्ज ठेवून वाटच बघत होती. एमू टप्प्यात आपल्या नंतर गन्स धडाडू लागल्या. त्या गोळीबारात डझन दोन डझन एमू पडले पण एक मशीनगन बंद पडली. शेकडो एमू परत झाडांच्या आश्रयाला पळून गेले. मेरीडीथच्या माणसांनी मशीनगन दुरुस्त केली आणि एमूंची वाट पाहू लागले पण चतुर एमू परत तळ्याकडे फिरकलेच नाहीत.
तिसरा दिवस
पुढच्यावेळी मेरीडीथने एक नवीन योजना आखली. एमू माणसांपेक्षा जास्त चपळ होते व त्यांच्यावर नेम धरून गोळीबार करायच्या आधीच ते पळून जात होते. मेरीडीथने त्याची मशीनगन एका ट्रकवर बसवली आणि एमूंवर नेम धरला. ट्रक ज्या रस्त्यांवरून जात होता ते रस्ते खडबडीत असल्याने सैनिकांना नेम धरताच आला नाही. एकही एमू मारला गेला नाही. त्यांची ही योजना सपशेल आपटली.
मंडळी, शेवटी हे युद्ध थांबवण्यात आलं आणि अप्रत्यक्षपणे एमूंचा यात विजय झाला. आटोकाट प्रयत्न करूनही एमूंना मारण्यात अयशस्वी झाल्याने सरकारने हार पत्करली. पुढे सरकारने स्थानिक शेतकऱ्यांनाच एमूंचा नायनाट करण्याची जबाबदारी दिली.
या गमतीदार युद्धाचा यथेच्छ समाचार स्थानिक वर्तमानपत्रांनी घेतला आणि सैनिकांची खिल्ली उडवली. सर्वोतोपरी एमूंचा विजय मान्य करण्यात आला. स्वतः मेरीडीथ म्हणाला की 'एमूंचा चिवटपणा सैनिकांमध्ये असेल तर ते जगातील कोणतही युद्ध जिंकू शकतात.'
तर अशा रीतीने गनिमी कावा वापरून पक्ष्यांनी माणसाला चीतपट केल्याचं इतिहासातील हे एकमेव उदाहरण ठरलं.