computer

कोण आहे सातोशी नाकामोटो? बिटकॉइनचा जनक कोण हे कोडं अजूनही उलगडलं नाहीये!!

सध्या बिटकॉईन भारीच चर्चेत आहे. प्रकरण काय आहे हे कळो ना कळो, त्याच्या जाहिराती तर सगळीकडेच दिसत आहेत. ज्यांना अद्याप ही भानगड काय आहे हे माहित नाही त्यांच्यासाठी- बिटकॉईन हे आभासी चलन आहे आणि त्यावर कुणा एका देशाची-एका माणसाची किंवा एका संघटनेची मक्तेदारी नाही. आता हे थोडं अवघड वाटत असेल तर हे लक्षात घ्या की एकेकाळी डिजिटल मनी, पेटीएमसारखे ॲप्स आणि क्रेडिट-डेबिट कार्डसारखे प्लास्टिक मनी या सगळ्या संकल्पनाही लोकांना जाम अवघड वाटल्या होत्या आणि आज पाह्यलं तर रस्त्यावरचा भेळवालासुद्धा फोनपे-पेटीम आणि गुगलपे सहज वापरताना दिसतो.

काही म्हणा, बिटकॉईनचा जन्म झाल्यापासून गुंतवणूकदारांना आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. २००८ साली बिटकॉईनला सुरुवात झाल्यापासून आजतागायत बिटकॉईनने चांगलीच प्रगती केली आहे. बिटकॉईन सोबतच जन्माला आलेला एक प्रश्न म्हणजे बिटकॉईनची निर्मिती करणारा आणि इंटरनेटवर पहिल्यांदा बिटकॉईनची लिंक शेअर करणारा, तो सातोशी नाकामोटो आहे तरी कोण?

३१ ऑक्टोम्बर २००८ रोजी कुण्या सातोशीने पहिल्यांदा बिटकॉईन हा पेपर आणि त्याचा ब्लॉकचेन कोड इंटरनेटवरुन प्रसारित केला. आतापर्यंत तरी हा सातोशी कोण ही एक गूढच राहिले आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याची भलामण करणाऱ्या प्रत्येकाकडे सातोशी म्हणूनच पहिले गेले. आजवर सातोशी म्हणून अनेकांच्याकडे बोट दाखवण्यात आले. प्रत्येकाबद्दल अशी काही माहिती हाती लागत होती की हाच असावा तो सातोशी असेच वाटावे.
काही लोकांच्या मते तो एक नाही तर अनेक लोकांचा समूह आहे, तर काही लोकांनी त्याच्या लेखनशैलीवरुन काही अंदाज बांधले आहेत. आजवर काही लोकांनी ते सातोशी आहेत असा दावा केला आहे. त्यांच्याबद्दल आपण आज जाज़ऊन घेऊयात. जोपर्यंत अधिक माहिती हाती येत नाही तोवर हे आधुनिक 'तोतयाचे बंड' आहे असे समजायला हरकत नाही.

१) हाल फिनी

या संशयितांच्या यादीतील पहिले नाव आहे हाल फिनि. फिनि हा एक अनुभवी प्रोग्रॅम डेव्हलपर होता, त्याचाही बिटकॉईनच्या कोडमध्ये हातभार होता, त्याने काही बग रिपोर्ट केले होते, त्याच्या शेजारीच कुणी नाकोमोटो राहात असे. त्याची लेखनशैली आणि नाकोमोटीची शैली बरीच सारखी होती. पीजीपी (Pretty Good Privacy- ही कम्प्युटर सिक्युरिटीमधली एक संकल्पना आहे) कार्पोरेशनमध्ये तो मुख्य डेव्हलपर म्हणून काम करत असल्याने बिटकॉईन डेव्हलप करणे त्याच्यासाठी काही फार मोठी गोष्ट नव्हती.

त्याची उदारमतवादी भूमिका, त्याचे कॅलिफोर्नियातील राहण्याचे ठिकाण आणि नेमकी त्याच वेळी त्याने पीजीपीमधून निवृत्ती घेतल्याने हा संशय आणखीनच बळकट झाला. शिवाय या नेटवर्कमधला पहिला व्यवहार त्यानेच केल्याने तोच सातोशी असावा या अंदाजाला पुष्टी मिळत होती. पण एवढ्या आधारावर तोच सातोशी असल्याचा दावा करणे तसे चुकीचेच होते. ऑगस्ट २०१४ मध्ये फिनि हे जग सोडून गेला. त्यामुळे तोच सातोशी असावा किंवा होता याबद्दल पुढे काहीच माहिती हाती लागली नसल्याने हा अंदाज असाच हवेत विरून गेला.

२) निक झाबो

तर दुसरी सुई वळली ती निक झाबोकडे. न्यूज बिटकॉईन.कॉमचा एक कर्मचारी ग्राहम स्मिथ याने असा दावा केला होता निक साबो हाच सातोशी आहे. बिटकॉईनच्या आधी निक साबोने बीट गोल्ड नावाचा असाच प्रयोग केला होता. बीट गोल्डची संकल्पना मांडणार साबोच बिटकॉईनचा जनक असावा अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती.
साबोने क्रिप्टोग्राफी आणि स्मार्ट कॉंट्रॅक्टबद्दल ही बरेच काही लिहिले आहे. बीट गोल्डची संकल्पना आधी मांडण्यात आली असली तरी, बिटकॉईन आल्यानंतर त्याच्या प्रकाशनाची तारीख नंतर बदलण्यात आली. सातोशीने आपल्या ईमेल संभाषणात या बीट गोल्डचा अनेकदा उल्लेख केला आहे.
पण निक साबो सातोशी असता तर बिटकॉईन आणि त्याचा दृष्टिकोन एकसारखाच असता, पण तसे तर दिसत नाही. शिवाय त्याने त्याच्या ब्लॉगवरून केलेल्या पोस्टसही संदिग्धता वाढवणाऱ्या आहेत. अशा अनेक त्रुटीमुळे साबो हाच सातोशी असण्याची शक्यता मावळली.

३) शिनीच मोचीझुकी

२०१९ च्या डिसेंबरमध्ये न्यूज बिटकॉईन.कॉमने शिनीच मोचीझुकी हाच सातोशी असल्याबद्दल एक लेख प्रकाशित केला होता. शिनीचची तशी फारशी काही ओळख नसलेला व्यक्ती. पण त्याने याआधी गणितात अनेक शोध लावले होते. म्हणून तोच सातोशी असावा असा अनेकांचा कयास होता. सातोशी आणि शिनीच यांच्यातील एकच साम्य म्हणजे त्याची अमेरिकन पार्श्वभूमी आणि त्यांची लिखणाची ब्रिटिश स्टाइल. नंतर मात्र काही कारणाने हे नाव मागे पडले.

४) इयान ग्रीग

त्यानंतर संशयाची सुई वळली ती ग्रीगकडे. ग्रीग टेक्नॉलॉजी एक्स्पर्ट असल्याने तो बिटकॉईनची निर्मिती करू शकतो, ग्रीगने ट्रिपल एंट्री अकाऊंटींग नावाचा एक शोध-निबंधही लिहिला होता. त्याच्या या शोधनिबंधाचा आधार घेऊन त्याला सातोशी म्हणून पहिले जात होते. या शोधनिबंधात त्याने ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीबद्दल आणि त्यात येणाऱ्या समस्यांबद्दल लिहिले होते. शिवाय ग्रीग काही काळ क्रेग राइट सोबतही होता, जो स्वतःला बिटकॉईनचा शोधकर्ता म्हणवून घेतो. सातोशीची इमेल लिहिण्याची स्टाइल आणि ग्रीगची इमेल लिहिण्याची स्टाइल दोन्ही सारख्या वाटतात म्हणूनही ग्रीग हाच सातोशी असल्याचा दावा करण्यात येत होता.

५) डोरियन नाकामोटो

मूळचा कॅलिफोर्नियाचा असणारा हा जापनीज इंजिनियर डोरियन नाकामोटो, हाच सातोशी नाकामोटो असल्याचेही म्हटले गेले. मॅकग्रेथ गुडमॅन याने ‘द फेस बिहाइंड बिटकॉईन’ नावाचा एक लेख वर्तमानपत्रातून प्रकाशित केला होता. ज्यामध्ये मॅकग्रेथ गुडमॅन याने डोरियन हाच बिटकॉईनचा निर्माता असावा असा दावा केला होता. परंतु स्वतः डोरियननेच मी याचा भाग नाही म्हणत हा दावा फेटाळून लावला.

६) वेई दाई

बी-मनीचा निर्माता वेई दाई हाच बिटकॉईनचाही निर्माता असू शकतो अशीही एक शक्यता पुढे आली होती. शेवटी वेई दाई सातोशी असल्याचा दावा ही फक्त ‘असू शकतो’ अशा शक्यतेपुरताच मर्यादित होता. तो हे करू शकतो, त्याच्याकडे क्षमता आहे, असे म्हणण्यापालिकडे याच्याही बाबतीती ठोस असे काही हाती लागले नाही. बी-मनीसुद्धा व्हाईट-पेपरच्या आधारेच प्रकाशित करण्यात आला होता आणि बिटकॉईनमध्येसुद्धा असाच एका लिंकसोबत व्हाईट पेपर देण्यात आला होता. वेई दाई आणि सातोशी यांच्यात मेलद्वारे संवाद झालेला आहे त्यावरून असे वाटते की, वेई दाई स्वतःच सातोशी आणि दाई बनून संवाद करत आहे. पण, हळूहळू ही चर्चाही बंद झाली.

७) ॲडम बॅक

११ मे २०२० रोजी ‘बेअरली सोशल’ नावाच्या एक युट्यूब चॅनलवर ‘सातोशीचा पर्दाफाश’ अशा अर्थाचा एक व्हिडिओ प्रदर्शित झाला होता. या युट्यूबरचे मत होते की, ‘ॲडम बॅक’ हाच बिटकॉईनचा निर्माता असावा. इथेही पुन्हा तोच आधार होता - सातोशी आणि ॲडम यांची लेखनशैली आणि दोघेही आपल्या नावाच्या स्पेलिंगसाठी ब्रिटिश इंग्लिशचा वापर करतात.
बेअरली सोशलच्या या व्हिडिओमध्ये असेही म्हटले गेले होते की, ॲडमने हा दावा कधीच स्वीकारला नाही किंवा त्याने कधीच आपण सातोशी असल्याचे कबूल केले नाही. या व्हिडिओला चार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तेव्हापासून ॲडमकडेच लोक सातोशी म्हणून पाहत असत. ॲडमने बेअरलीच्या ट्विटर हँडलवरही यावरून बराच वाद घातला होता.

अर्थात, संशयाचा हा प्रवास इथेच संपत नाही. याव्यतिरिक्तही आणखी काही लोक आहेत ज्यांच्याकडे सातोशी नाकामोटो म्हणून पहिले गेले. तर काहींनी स्वतःच आपणच सातोशी नाकामोटो असल्याचा दावा केला.

असे असले तरी, अजूनही सातोशीचा खरा चेहरा जगासमोर आलेला नाही. पुढे तरी येईल की नाही माहिती नाही. सातोशी कुणी एक व्यक्ति आहे, की अनेक व्यक्तींचा एक समूह आहे, जो बिटकॉईनचे नियंत्रण काही काळाने आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करेल? की कसे? याबद्दलही संदिग्धता आहेच.

सातोशी नाकामोटो हा व्यक्ति कोण असावा याचा बिटकॉईन ट्रेडिंगवर किंवा क्रिप्टोकरन्सीच्या भविष्यावर काही फरक पडेल का? तुम्हाला काय वाटते?

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required