बोभाटाची बाग : भाग ८ - १४ कोटी वर्षांपासून अस्तित्वात असलेले, पण दुर्लक्षित राहिलेले नेचे !!
पावसाच्या चार सरी येऊन गेल्या, पाणी भिंतीत थोडंसं मुरलं की थोड्याच दिवसांत त्या शेवाळून हिरव्यागार दिसायला लागतात. काही दिवसांत मग त्या शेवाळातून वाट काढत नेचे बाहेर येतात. हे नाजूक नेचे दर पावसाळ्यात येतात आणि जातात. त्याची दखलही फारशी घेतली जात नाही. कदाचित त्याला फुलं येत नाहीत किंवा आपल्या कुठल्याच भाजीत त्याचा समावेश होत नाही ही दोन कारणं बहुतेक दखल न घेण्यासाठी पुरेशी आहेत. तसे आपण पुरेसे स्वार्थी आहोतच नाही का? नाहीतर आतापर्यंत आपण नेच्यांच्या बागा लावल्या असत्या. त्यामुळेच नेचा हा शब्दही बर्याचजणांच्या परिचयाचा नसेल. कदाचित 'फर्न' म्हटल्यावर ओळख पटेल.
हिरवीगार पानं आणि त्याला धरून ठेवणारे बारीक तारेसारखे खोड अशी रचना या वनस्पतीची असते. बहुतेकजण त्याला शेवाळाचाच एक प्रकार समजतात. पण तसे नाही. शेवाळ ही त्यामानाने फारच मागासलेली वनस्पती आहे. आज आपण दर पावसाळ्यात आपल्या भेटीला येणार्या आणि शास्त्रीय परिभाषेत Adiantum Fern या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका प्रकारच्या नेच्याबद्दल बोलणार आहोत.
हा नेचा असा दिसतो:
या नेच्याला मराठीत नाव नाही, पण संस्कृतमध्ये त्याला हंसपदी म्हणतात. या नेचा म्हणजेच फर्नची पानं अलगद धरून ठेवणार्या बारीक तारेसारख्या खोडाला मेडन्स हेअर म्हणजे तरुणीचे केस म्हटले जाते, आणि ही तरुणी कोण तर प्रेमाची देवता व्हिनस!!
फर्नच्या Adiantum याच प्रजातीत आणखी २५० सदस्यं पण आहेत. फार आश्चर्य वाटायला नको, कारण एकूण फर्नच्या कुळात १०५६० वेगवेगळ्या वनस्पती आहेत. या सर्व फर्नचे आणखी एक वैशिष्ट्य असे की यांची उत्पत्ती ३६ कोटी वर्षांपूर्वी झाली आहे. आपण जे फर्न किंवा नेचे बघतो आहे त्यांची उत्पत्ती १४ कोटी वर्षांपूर्वीची आहे. आपण तेव्हा पृथ्वीवर नव्हतोच हे वेगळे सांगायला नकोच!
सगळ्यांनाच नेच्याचा विसर पडलाय असं मात्र बिलकुल नाही. Alsophila जातीच्या सिल्वर फर्नला एक खास मान मिळाला आहे. १८८० सालापासून सिल्वर फर्न ही न्यूझिलंड या देशाची ही राष्ट्रीय ओळख आहे. न्यूझिलंडने या नेच्यांना हे खास मानांकन देण्याचे कारण असे की माओरी आदीवासी ही वनस्पती शक्ती, सहनशक्ती आणि मायभूमीच्या प्रेमाचे प्रतिक मानतात. न्यूझिलंड क्रिकेट टीम, न्यूझीलंडची एअरलाइन या सगळ्यांच्या लोगोत अॅसोफीला म्हणजे सिल्व्हर फर्नचा वापर केलेला दिसेल.
(सिल्वर फर्न)
आम्हाला खात्री आहे आज संध्याकाळी फिरायला बाहेर पडलात तर तुमची नजर नक्कीच हा नेचा शोधत असेल .
लेखिका : अंजना देवस्थळे