बोभाटाची बाग : भाग १० - गोकर्णाच्या फुलांच्या आयुर्वेदिक चहाबद्दल कधी ऐकलंय?
इतके दिवस आपण बागेत फेरफटका मारतोय. पण एकदाही "चला चहा घेऊ या" असं काही आम्ही म्हटलं नाही. पण आज आठवणीने विचारतो आहोत. "काय, चहा घेणार का?" हो, आणि हा चहा आपल्या बागेतलाच चहा आहे. तो आपण नाक्यावर पितो तसा कटिंग चहा नाही. आजचा चहा आहे निळ्या रंगाचा, गोकर्णीच्या फुलांपासून बनवलेला!
गोकर्णाचा वेल लावल्याशिवाय कोणतीही बाग अपूर्णच राहील. बारा महिने हिरवीगार, भरपूर फुलं देणारी, थोडी मातीच्या ओलाव्याची माया मिळाल्यावर सुखाचा संसार थाटणारी वेल म्हणजे गोकर्णीची! एकदा ही वेल बागेत लावला की त्याची वाढ चक्क 'ऑटॉ पायलट मोड' वर होते. माळ्याकडून खत वगैरे अशी फारशी अपेक्षा नसते. वेळच्यावेळी फुलांनी बहरते आणि फुलपाखरांना आमंत्रण देते. तशी ही बहुप्रसवा म्हणावी अशी वनस्पती आहे. फुलागणिक एक शेंग उगवते. जरा उन्हाने तापली की शेंग फुटून पाच दहा बिया मातीत पडतात. थोड्याच दिवसात अंकुर येतात, ते आसपासच्या कोणत्याही दुसर्या झाडाच्या आधाराने वाढतात. असं साधं सोपं लाइफ सायकल फारच कमी बघायला मिळतं.
गोकर्णाची फुलं निळीच असतात. पण गोकर्णाच्या चुलत घराण्यात पांढरी, गुलाबी अशी इतर रंगांची फुलं पण बघायला मिळतात. अनेक पाकळ्या असलेल्या गोकर्णाच्या काही वेली बघायला मिळतात. पण त्यांच्यात शेंगांचे म्हणजेच परिणामी बियांचे प्रमाण फार कमी असते. गोकर्ण, अपराजिता, शंखपुष्पी, ब्लूबेल्व्हाइन, विष्णुकांता,ब्ल्यू-पी,बटरफ्लाय-पी आणि डार्वीन-पी अशा बर्याच नावानी गोकर्णाची ओळख आहे. पण 'गाईच्या कानासारखी दिसणारी' या अर्थाने गोकर्ण हेच नाव एकदम अर्थवाही वाटते.
चला, इतकं वाचू दमला असाल तर गोकर्णाच्या चहाबद्दल बोलू या! ताज्या किंवा सुकवलेल्या गोकर्णाच्या पाकळ्या पाण्यात टाकल्या की निळ्या रंगाचा आरोग्यदायक चहा तयार होतो. हा चहा थंड किंवा गरम कसाही घ्या. गोडी आवश्यक असेल तर मध घाला, चव आणखी वाढवायची असेल तर लिंबू पिळून घ्या. या फुलांमध्ये अँथोसायनीन हे रसायन असते. अँथॉस म्हणजे फूल आणि सायनीन म्हणजे निळा -जांभळा रंग अशी या शब्दाची उत्पत्ती आहे.
एक गंमतीदार वैशिष्ट्य असे की अँथोसायनीनचा रंग ज्या पाण्यात मिसळाल त्या पाण्याच्या pH प्रमाणे बदलतो. लिंबू पिळले की चहा अॅसीडीक होतो आणि चहाचा रंग गुलाबी होतो.
चहा ही गोकर्णाची एकमेव उपयुक्तता नाही. इतर आयुर्वेदिक औषधी घटक पण या वनस्पतीत आहेत. पण ते आज बागेत सांगत बसत नाही. आज तुम्ही फक्त चहाचा आनंद घ्या!
लेखिका : अंजना देवस्थळे