computer

बारमाही फुलणाऱ्या सोनचाफ्याची कलमं बनवणाऱ्या वेलणकरांची प्रेरणादायी गोष्ट!!

पन्हाळगडाच्या परिसरात जर तुम्ही पावसाळ्यात-श्रावणाच्या-दरम्यान फिरला असाल, तर सोनचाफ्याची अनेक झाडं सोनेरी फुलांनी बहरलेली पाह्यली असतील. पन्हाळ्याच्या आसपास ही झाडं आढलण्याचं कारण असं की छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रावणात गडावरच्या सोमेश्वराला एक लाख सोनचाफ्याची फुलं वाहण्याचा संकल्प केला होता. त्या संकल्पानुसार पन्हाळ्याच्या आसपास सोनचाफ्याची लागवड करण्यात आली होती.

पण समजा, तुम्ही मुंबई-पुण्यात रहात असाल तर तुमच्या मनात प्रश्न येईल की श्रावण असो वा नसो, सोनचाफ्याची फुलं बाजारात बारमाही मिळतात हे कसं काय? वाचकहो, बाराही महिने बार देण्याचा हा चमत्कार 'वेलणकर चाफा' या कलमाचा आहे. आता तुम्ही म्हणाला सोनचाफा म्हणजे सोनचाफा. त्यात हा वेलणकर चाफा काय वेगळा प्रकार आहे? तर त्याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही घेऊन आलो आहोत. आम्हाला खात्री आहे की वेलणकर चाफ्याची ही कथा 'बोभाटा'च्या अनेक वाचकांना प्रेरित करणार आहे!

'वेलणकर चाफा' हा सोनचाफ्याचा प्रिमियम ब्रँड आहे. हा ब्रँड विकसित करणाऱ्या शेतकर्‍याचे नाव आहे 'उदय गोपिनाथ वेलणकर'!! मुंबई-गोवा महामार्गावरून जाताना ओरोसच्या पुढे डावीकडे वळण घेतलं की कुडाळ तालुक्यातल्या वेताळ बांबर्डे या छोट्याश्या गावात राहणार्‍या वेलणकरांचे नाव सोनचाफ्याशी कसे जोडले गेले ही कथा आज आपण वाचणार आहोत.

(उदय गोपिनाथ वेलणकर)

'वेलणकर चाफा' या ब्रँडची सुरुवात एखाद्या चित्रपटाच्या सुरुवातीसारखी झाली. १९८० साली वडिलांच्या निधनानंतर घरच्या शेती-बागायतीचा भार उदयरावांच्या खांद्यावर आला. या दरम्यान त्यांनी छोट्या प्रमाणात झाडांची नर्सरी सुरु केली. एक दिवस वेलणकर कामानिमित्त रत्नागिरीला गेले होते. बाजारात काही नवीन प्रकार बघता येतील म्हणून ते तिथल्या एका नर्सरीत गेले आणि त्यांनी तिथे 'सोनचाफ्याची' कलमं आहेत का? अशी चौकशी केली. नर्सरीच्या मालकांनी, "सध्या विश्वासार्ह सोनचाफा कलमं मिळतच नाहीत. वेलणकर नावाचे गृहस्थ आम्हाला पूर्वी दर्जेदार कलमं पुरवायचे. पण आता ते नाहीत म्हणून आम्ही सोनचाफ्याची कलमं विक्रीस ठेवणं बंदच केलं आहे." असं उत्तर दिलं. त्यावर उदयराव अभिमानाने म्हणाले, "मी त्यांचाच म्हणजे गोपिनाथ वेलणकरांचा मुलगा. आता ते नाहीत. पण मी सोनचाफ्याची कलमं निश्चितच तुम्हाला पुरवू शकतो". नर्सरीच्या मालकांनी पुढच्या सीझनसाठी सोनचाफा कलमांची वेलणकरांना ऑर्डर दिली. इथून पुन्हा सोनचाफ्याचा प्रवास सुरु झाला...

यानंतर मात्र 'ऑपरेशन सोनचाफा' जोरात सुरु झाले. सोनचाफ्यातही सात वेगवेगळ्या जाती आहेत. त्यांपैकी केशरी, फिक्कट पिवळा, शुभ्र पांढरा आणि गडद पिवळा हे चार प्रकार जास्त वापरात आहेत. कोणतीही बारमाही उत्पन्न देणारी प्रजाती नक्कीच व्यावहारीक उपयोगाची असते हे लक्षात घेऊन वेलणकरांनी 'गडद पिवळा' हे वाण विकसित करायचे ठरवले. त्याचे शुद्ध वाण मिळवून ते घरच्या मातृकलमावर विकसित करण्यापासून सुरुवात केली. थोड्याच काळात 'वेलणकर चाफा' हे वाण जन्माला आलं. आसपासच्या परिसरात या कलमाची विक्री धडाक्यात सुरु झाली. थोड्याच दिवसांत 'वेलणकर चाफा' हा प्रिमियम ब्रँड झाला.

लोकप्रिय ब्रँड 'ड्युप्लिकेट' व्हायला वेळ लागत नाही. अनेक व्यापार्‍यांनी 'वेलणकर चाफा' या नावाखाली बोगस कलमं विकायला सुरुवात केली आणि शेतकर्‍यांच्या तक्रारी कानावर येण्यास सुरुवात झाली. यानंतर मात्र वेलणकरांनी त्यांची मार्केटींग स्ट्रॅटेजी बदलली. थेट शेतकर्‍यांनाच त्यांनी कलमे द्यायला सुरुवात केली. या प्रयत्नात अनेक अडचणी होत्या. आपल्या उत्पादनाचे म्हणजे वेलणकर चाफा कलमांचे 'मार्केट' विकसित करण्यापासून सुरुवात होती. आज त्यांच्या अथक श्रमामुळे पालघर परिसरात आठ ते दहा हजार एकरांवर सोनचाफ्याची शेती केली जाते. पुणे परिसरातही हजारो एकर शेतीत सोनचाफ्याचे उत्पादन होते. असं रोख उत्पन्न देणारे सोनं कोणाला नको आहे? आजच्या तारखेस दरवर्षी वेलणकरांची दहा हजार कलमं विकली जातात. त्यातूनच अनेक शेतकरी चक्क सोन्याचे उत्पादन घेतात असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

प्रश्न असा येतो की जर चाफ्याच्या बियांपासूनही झाडं उगवतात तर वेलणकरांचेच कलम का घ्या? त्याचे उत्तर असे आहे की बियांपासून आलेली झाडं फक्त श्रावणातच फुलं देतात, बारमाही नाही. वेलणकरांची कलमं खात्रीशीर बारमाही फुलं देतात. वसईच्या रॉबर्ट दिब्रिटो या शेतकर्‍याने त्याच्या शेतात फक्त २८० कलमं जोपासली आहेत आणि त्यातून वार्षिक नऊ लाखांचे उत्पन्न दिब्रिटो यांना मिळते!!

एखाद्या कृषी उत्पादनात किंवा उद्यान उत्पादनात स्वतःचा ब्रँड बनवणे हे अत्यंत कठीण काम असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर हापूस आंब्याचे घ्या. गेली अनेक वर्षे 'हापूस' या नावाखाली आपण कर्नाटक ते गुजराथ यांपैकी कुठेही उत्पादन घेतलेला कलमी आंबा आपण हापूस म्हणूनच खात होतो. पण अस्सल 'हापूस' आंबा फक्त रत्नागिरी-सिंधुदुर्गातल्या परिसरातला आंबा हे जिओग्राफीकल इंडीकेशन Geographical Indication (GI) मिळवायला कितीतरी वर्षांची तपश्चर्या करावी लागली. त्यामुळे कोकणात सोनचाफ्यासारख्या दारोदारी असलेल्या झाडांच्या फुलांमध्ये 'वेलणकर चाफा' ही खास वेगळी ओळख मिळवायला उदय गोपिनाथ वेलणकर यांना किती मेहनत घ्यावी लागली असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.

एखादा व्यावसायिक कृषितज्ञ कदाचित हे काम कमी वेळात करू शकेलही. पण उदय गोपिनाथ वेलणकर यांच्यावर घरच्या शेतीच्या कामाचा व्याप सांभाळण्यासाठी जबाबदारी असल्याने सातवीच्यापुढे त्यांचे शिक्षणही झालेले नाही. वेलणकारांनी हे सर्व ज्ञान पुस्तकातून नव्हे, तर त्यांच्या 'प्रॅक्टीकल अ‍ॅप्रोचमधून मिळवले आहे. आज त्यांच्याकडे डिझेलचा पंप बिघडलेला असो वा त्यांची गाडी बंद पडलेली असो, प्लंबींग-वेल्डिंग-सुतारकाम काहीही काम असो, इंजीनिअर एकच आहे. स्वतः उदय गोपिनाथ वेलणकर!!

तर पुढचा साहजिक प्रश्न असा की वर्षाकाठी दहा हजार कलमं विकण्यापेक्षा वेलणकर स्वतःच फुलं का विकत नाहीत? याचे एकमेव कारण असं आहे की वेलणकर फार्म ज्या भागात आहे त्या भागात फुलांचा बाजार अजून विकसित झालेला नाही. फुलं खुडल्यानंतर ती काही तासांतच बाजारात पोहचायला लागतात. पालघर, वसई, पुणे या सर्व गावांच्या आसपास मुंबई-पुण्यासारखी बाजारपेठ आहे. 'चिपी'चा विमानतळ सुरु झाल्यावर कदाचित वेलणकरांची फुलंही दूरवरच्या बाजारात पोहचतील. आजच्या तारखेस दक्षिणेतल्या अनेक राज्यांतून शेतकरी त्यांच्याकडून कलमं घेऊन जातात.

सध्या हा सगळा भार वेलणकर आणि त्यांचे दोन पगारी नोकर सांभाळत आहेत. परंतु प्रत्येक उद्योजकाला एक प्रश्न नेहेमीच छळत असतो तो असा की मी घेतलेला वसा पुढे कोण वाहून नेईल? या बाबतीत वेलणकर नशिबवानच म्हणायला हवेत. कारण त्यांची तिन्ही उच्चशिक्षित मुलं हा वारसा पुढे नेण्यास समर्थ आहेत.

बोभाटाच्या वाचकांपैकी अनेकजण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या शेतीशी जोडलेले आहेत. कोविडच्या नंतरच्या काळात समजा काही वेगळा मार्ग चोखाळायचा विचार असेल, तर ही 'वेलणकर चाफ्याची कथा नक्कीच तुम्हांला प्रेरणा देईल!!

 

(लेखासाठी दिलेल्या संदर्भ सहाय्यासाठी आम्ही श्री प्रभाकर सावंत यांचे आभारी आहोत.)

सबस्क्राईब करा

* indicates required