computer

या सिनेमागृहाबाहेरची रांग सांगायची फिल्म हिट की फ्लॉप...वाचा एका सिनेमागृहाचा प्रवास !!!

“बिवी नंबर 1 हाऊसफुल्ल हो रही थी पर ३ हफ्ते के बाद उतारना पड़ा. लेकिन हम दिल दे चुके सनम ने भी कमाल का बिझनस किया. ७० का बालकनी टिकिट लोग ब्लॅक में १००० के लिए बेच रहे थे.”

कासिम भाय हे चंदन सिनेमागृहाचे प्रोजेक्शनिस्ट म्हणून काम करत होते. १९७५ साली त्यांनी चंदन सिनेमागृहात नोकरी पत्करली. त्याच्या दोन वर्षापूर्वी चंदन सिनेमाचा जन्म झाला होता. त्यांनी सांगितलेला ‘हम दिल दे चुके सनम’चा किस्सा हा त्यांच्याकडच्या किश्यांच्या भल्यामोठ्या साठ्यातील केवळ एक थेंब आहे.

आज आपण बोलणार आहोत जुहूच्या चंदन या सिंगल स्क्रीन सिनेमागृहाबद्दल. असं म्हणतात ह्या सिनेमागृहात सिनेमाचं भविष्य ठरायचं. रोहित शेट्टीने एका मुलाखतीत त्याच्या सुरुवातीच्या दिवसाचा किस्सा सांगताना म्हटलं होतं, की ‘चंदन सिनेमाबाहेरची रांग आणि पार्किंग मध्ये असलेल्या गाड्या सांगायच्या ती फिल्म फ्लॉप आहे की हिट.’ पूर्वीच्या हाऊसफुल्लच्या बोर्ड पासून ते आजच्या स्टॉल मध्ये झोपलेल्या २-३ माणसांपर्यंत या सिनेमागृहाने खूप काही पाहिलं आहे. हा मामला फक्त मनोरंजन पुरता न राहता अनेकांच्या दोनवेळच्या अन्नाचा प्रश्न होता. मनोरंजन विश्वावर अनेकांची संसार उभे राहिले. हा सगळा कारभार ज्या सिंगल थियेटरपासून सुरु होतो त्याचा मेरुमणी म्हणजे चंदन सिनेमा.

आज चंदन सिनेमाचा विषय काढण्यामागचं कारण म्हणेज या वर्षाच्या शेवटी हे सिनेमागृह कायमचं बंद होणार आहे. या सिनेमागृहाच्या जागी ३ मिनी थियेटर्स उभारण्यात येतील. प्रत्येकात ७० सीट्स असतील. पण जी मजा चंदनच्या सिंगल स्क्रीन थियेटर मध्ये होती ती या पुढे कधीच अनुभवता येणार नाही. हे का याचं कारण पुढे लेखात येईलच.

चला तर सुरु करूया चंदन सिनेमाच्या जन्मापासून.

चंदनचे जन्मदाते बैजनाथ जोशी हे प्लास्टिकच्या व्यापारात होते. त्यांची पत्नी चंद्रकांता ज्यांचं टोपणनाव चंदन होतं त्यांना सिनेमाची आवड होती. त्यांचा शुक्रवारच्या शो चा बेत ठरलेला असायचा, पण शुक्रवारी तिकिटं मिळवणं कर्मकठीण असायचं. तो काळच अमिताभ बच्चन आदी स्टार्सने गाजवलेला काळ होता. आज सारखं मोबाईलवर फिल्मची पायरेटेड कॉपी मिळायची नाही. सुपरहिट फिल्म असेल तर शुक्रवारच्या शोची तिकिटं अव्वाच्या सव्वा पैसे मोजून ब्लॅकने घ्यावी लागायची किंवा मग आदल्यादिवशी रांग लावून तिकिटं मिळवावी लागायची.

बायकोचं सिनेमाचं वेड पाहून बैजनाथ यांनी सिनेमगृहच सुरु करायचं ठरवलं. ते एके दिवशी सकाळीच आपल्या एका आर्किटेक्ट मित्राकडे गेले. त्यांचा हा मित्र सिनेमा थियेटर बनवण्यासाठी ओळखला जायचा. बैजनाथ यांनी त्याला एक नवं कोरं सिनेमागृह बांधायचं काम दिलं. अशा प्रकारे ‘चंदन’ चा जन्म झाला.

अल्पावधीत चंदन सिनेमा प्रसिद्ध झाला. हे यश किती मोठं होतं हे या किश्यावरून तुम्हाला समजेल. त्याकाळी चंदन सिनेमाच्या आजूबाजूचा परिसर दाट झाडींनी वेढलेला होता, रस्ते व्यवस्थित नव्हते, रिक्षा किंवा बस त्या परिसरात येऊ धजत नव्हत्या. अशावेळी आपल्या प्रेक्षकांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी सिनेमागृहातर्फे अंधेरी स्टेशन पर्यंत मोफत बस सेवा सुरु करण्यात आली. प्रेक्षकांना बांधून ठेवण्यासाठी अशी शक्कल लढवणारं कदाचित हे पाहिलंच सिनेमागृह असावं.

कासीम भाय त्यावेळच्या आठवणी आजही सांगतात. ते म्हणतात की फिल्मची क्रेज पहायची असेल तर प्रेक्षकांनी स्क्रीनवर फेकलेल्या चिल्लरकडे बघून अंदाज बांधता यायचा. स्क्रीनवर चिल्लर ? हो !! आपल्यातल्या बऱ्याच जणांना हा काय प्रकार आहे हे चटकन समजणार नाही. सिंगल स्क्रीनचा प्रेक्षकगृह हा तळागाळातील कामकरी कष्टकरी वर्ग होता. या प्रकारच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया या कमालीच्या असायच्या. फिल्म आवडली तर डोक्यावर घ्यायचं किंवा मग सडकून आपटायचं. यातलाच एक प्रकार होता चिल्लर फेकण्याचा (आताही काही सिनेमागृहांमध्ये आहे). सिनेमा जर अफलातून आवडला तर स्क्रीनवर लोक चिल्लर फेकायचे. हिरोच्या एन्ट्रीला तर हे हमखास घडायचं. सलमान खान सारख्या मोठ्या स्टारची फिल्म असेल तर प्रेक्षकांना गुरुवारी रात्री सिनेमागृहात एन्ट्री मिळायची. दुसऱ्या दिवशी सिनेमा लागण्याच्या आधी सिनेमागृह सलमानच्या फोटोंनी भरलेलं असायचं.

कासीम भाय म्हणतात की सिनेमा जर रटाळ असेल तर ते स्वतः तिथल्या तिथे सिनेमा एडीट पण करायचे. काहीही झालं तरी प्रेक्षक ‘बोर’ नाही झाले पाहिजेत. आणखी एक वेगळी आठवण म्हणजे ‘बँडीट क्वीन’च्यावेळी संध्याकाळी आठवडाभर केवळ महिलांसाठी शो लागला होता. स्त्रियांनी तो सिनेमा पाहावा यासाठी नव्हे तर सिनेमातल्या दृश्यांमुळे.

मोठमोठ्या स्टार्सना आपली फिल्म किती पाण्यात आहे हे पहायचं असल्यास चंदन मध्ये चोरून यावं लागायचं. प्रेक्षक तर प्रेक्षक पण इथले तिकीट ब्लॅक करणारे पण सिनेमाचं भविष्य सांगून जायचे. इम्तियाज अलीला त्याच्या ‘लव्ह आज कल’ सिनेमाच्या वेळी एका ब्लॅक करणाऱ्या इसमाने सांगितलं होतं की ‘आपने तो सेकंड हाफ मैं बिलकुल छोड़ दिया, इम्तियाज भाई. कोई मेहनत ही नहीं की.’ शेवटी काहीही झालं तरी फिल्म ही गल्ल्यावर चालते आणि गल्ल्याचा एवढा चांगला लेखाजोखा आणखी कोण देणार.

१९७३ ते आजच्या २०१९ पर्यंत चंदनने फिल्म्सचा बदलेला चेहरा पाहिला. सध्या बैजनाथ जोशी यांचा मुलगा समीर जोशी चंदन सांभाळत आहे. समीर जोशी यांच्याकडे वडिलांनी थियेटर सुपूर्त केलं ते नव्वदीत. तोवर चंदनचे वाईट दिवस सुरु झाले होते. सिनेमागृहातला AC काढून टाकण्यात आलेला. सीट्स तुटल्या होत्या. त्यांची डागडुजी झाली नव्हती. पण सगळं बदललं एका सिनेमाने – ‘हम आपके है कौन’ (१९९४). आपल्याला हा सिनेमा म्हणजे लग्नाची कॅसेट वाटू शकते पण याच सिनेमाने चंदन आणि तिथे काम करणाऱ्यांना पुन्हा चांगले दिवस आणून दिले. सिनेमागृहात पुन्हा एकदा AC बसवण्यात आले, सीट्स बदलल्या गेल्या, फरश्या दुरुस्त करण्यात आल्या. हा सगळा मामला ३ कोटीत गेला, पण नुकसान झालं नाही.

पुढे आलेल्या मल्टीप्लेक्सने सगळं ढासळत गेलं असं आपण म्हणू शकतो. मल्टीप्लेक्स, पायरेसी, बदलेली गणितं असं सगळं या सिनेमागृहाने पचवलं. समीर जोशी यांनी नुकतंच चंदन बंद करायचा निर्णय घेतला. या सिनेमागृहाशी असलेला फिल्म इंडस्ट्रीचा जिवाभावाचा संबंध लक्षात घेऊनही केवळ कमी झालेल्या प्रेक्षकांमुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. नर्गिस फाक्रीच्या ‘अमावस’ सिनेमाच्यावेळी सिनेमागृहात केवळ ३ माणसं बसली होती. या तीन व्यक्तीही झोपलेल्या होत्या. कितीही कमी प्रेक्षक असले तरी शो कॅन्सल करायचा नाही हे चंदन सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य.

यावर्षी आलेल्या काही फ्लॉप फिल्म्स नंतर आलेल्या ‘गली बॉय’ने प्रेक्षकांना पुन्हा एकदा चंदन मध्ये खेचून आणलं. अशा अधूनमधून येणाऱ्या सुपरहिटने पण चंदन सावरेल अशी आशा वाटत नाही. यात सिनेमा विश्वाचाही तेवढाच दोष आहे. जवळच्याच मल्टीप्लेक्स मध्ये फिल्म फेस्टिव्हल भरवला जातो तेव्हा चंदनची साधी आठवणही काढली जात नाही.

सिंगल स्क्रीन आणि फिल्म बघण्याचा अनुभव

सिंगल स्क्रीनचा प्रेक्षकवर्ग हा टाळ्या, शिट्ट्या, पैसे फेकणारा बिन्दास्त असतो. धक्काबुक्की, घाम, भांडणं. फिल्म चालू असताना आरडाओरडा ही सिंगल स्क्रीनची ओळख. मल्टिप्लेक्स बद्दल बोलताना एक लेखक म्हणाले की मल्टिप्लेक्स मध्ये हसण्याची पण चोरी असते.

मंडळी, सिंगल स्क्रीनचा प्रेक्षकवर्ग भारतातला खरा प्रेक्षकवर्ग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सिनेमाचं गणित जमवण्यासाठी या प्रेक्षकांना लक्षात घेऊनच सगळं बसवावं लागतं. हा विचार आजही लक्षात घेतला जातो. चंदन पाठोपाठ शहरातले आणखी सिंगल स्क्रीन सिनेमागृह बंद होण्याच्या वाटेवर आहेत ही आजची परिस्थिती.

मंडळी, चंदन सिनेमागृहाबरोबर एक संपूर्ण काळ संपणार आहे. फिल्म इंडस्ट्रीच्या इतिहासात चंदनचं एक वेगळं स्थान निश्चितच राहील. आपल्या वाचकांमध्ये कोणी जर चंदन मध्ये सिनेमा पाहिलेला असेल तर तुमचा अनुभव आम्हाला नक्की सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required