जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बनणार भारतात....वाचा कुठे बनणार आहे हा पूल !!
बोगीबील पुलानंतर आता आणखी एक पूल तयार होण्याच्या मार्गावर आहे. हा पूल बोगीबीलपेक्षा मोठ्या उंचीवर तयार होणार आहे राव. हा जगातला सर्वात उंचावरचा रेल्वे पूल असणार आहे. कुठे तयार होणार आहे हा पूल? चला जाणून घेऊ या....
पुलाचं नाव आहे ‘चिनाब ब्रिज’. हुशार बोभाटावाचकांनी चिनाब नावावरून ओळखलंच असेल हा पूल कुठे असेल ते. तर, काश्मीरच्या चिनाब नदीवर तब्बल ३५९ मीटरवर(जवळजवळ ११७७ फुट) हा रेल्वे पूल बांधण्यात येणार आहे. म्हणजे किती मोठ्या उंचीवर? तर, आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर जास्त उंचीवर. या पुलामुळे काश्मीरच्या खोऱ्यांना उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लाईन्सशी जोडण्यात येईल. पुलाच्या दोन्ही बाजूंना रेल्वे स्टेशन्स बांधण्यात येणार आहेत. हा रेल्वेपूल कसा दिसेल याची एक झलक बघा.
या पुलाची दोन वैशिष्ट्ये आहेत. पाहिलं वैशिष्ट्य, पुलाला एका विशिष्ट अशा स्टील पासून बनवण्यात येणार आहे. या स्टीलमुळे पूल ‘ब्लास्ट प्रूफ’ असणार आहे. कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याने पुलावर परिणाम होणार नाही. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पुलाच्या बांधणीसाठी स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे. काश्मीरमधल्या ५०० लोकांना या कामासाठी निवडण्यात आलंय.
मंडळी, बोगीबीलप्रमाणेच चिनाब पूल देखील सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. शिवाय या पुलामुळे नवीन पर्यटनस्थळ तयार होईल. स्थानिक लोकांना रोजगारासोबत दळणवळणाचा नवीन मार्ग खुला होणार आहे.
तर मंडळी, आजही ही गुड न्यूज तुम्हाला कशी वाटली? आम्हाला नक्की सांगा !!
आणखी वाचा :
भारताने चीनच्या नाकावर टिच्चून तयार केलाय आसामचा पूल....वाचा ५ महत्वाच्या गोष्टी !!