आता भारतातही अनुभवा साकुरा-चेरी ब्लॉसम उत्सव!! दोनपैकी कोणत्या ठिकाणी तुम्ही जाल?
साकुरा. साकुरा म्हणजे चेरीच्या झाडांना बहर येण्याचा काळ. जपानमधला हा साकुरा खूप प्रसिद्ध आहे. साकुरा हा अर्थातच जपानी शब्द आहे. तुम्ही जर इंटरनेटवर चेरी ब्लॉसम सर्च केलं तर सर्वात आधी तुमच्यासमोर जपानचा फोटो येईल. थोडा आणखी शोध घेतला तर स्पेन आणि पॅरीस ही दोन नावं पण मिळतील. भारतात चेरी ब्लॉसम कोणाला फारसं माहित नाही. इंटरनेटवर गुलाबी रंगांच्या फुलांनी बहरलेल्या झाडांचे फोटो बघितले असतील तेवढाच काय तो अपवाद.
कालपर्यंत जपान आणि चेरी ब्लॉसम महोत्सव असं समीकरण होतं, ते तसं आजही आहे पण आता चेरी ब्लॉसम फक्त जपानपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते जगभरात पसरलंय. भारतात देखील चेरी ब्लॉसम महोत्सव भरतोय. आज आपण भारतात होणाऱ्या चेरी ब्लॉसम महोत्सवाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
शिलॉंग (मेघालय)
चेरी ब्लॉसम महोत्सवाचं हे यंदाचं चौथं वर्ष आहे. चेरी ब्लॉसम आयोजक समिती, इन्स्टिट्यूट ऑफ बायोरिसोर्सेस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट (IBSD) आणि स्थानिक सरकारच्या मदतीने हा महोत्सव भरवला जातो.
यावर्षी शिलॉंगमध्ये १३ नोव्हेंबर २०१९ ते १६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत चेरी ब्लॉसम महोत्सव होणार आहे. गुलाबी फुलांनी लगडलेली झाडे इतकंच या महोत्सवाचं वैशिष्ट्य नाही, तर या महोत्सवात संगीत, कला, नृत्य, खाद्यपदार्थ, सिनेमा, सौंदर्य स्पर्धा, गोल्फ स्पर्धा, अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश असणार आहे.
याखेरीज शिलॉंगच्या निसर्गरम्य जागेत सायकल रॅली, तायक्वांदो मार्शल आर्ट्सचे प्रात्यक्षिक आणि पुस्तकांच्या चाहत्यांसाठी कथावाचानाचे कार्यक्रम असणार आहेत. यावर्षी एका नवीन स्पर्धेची भर पडली आहे. यंदा ‘चेरी ब्लॉसम फोटोग्राफी स्पर्धा’ असणार आहे, चेरी ब्लॉसमचे जुने तसेच नवे फोटो या स्पर्धेसाठी पाठवता येतील. ४ दिवसांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आणि चेरीच्या झाडांमधून फेरफटका असं या स्पर्धेचं स्वरूप असणार आहे. हे फक्त एक ढोबळ वर्णन झालं, खरा अनुभव हा शिलॉंगला जाऊनच घेता येईल.
या लिंकवर जाऊन महोत्सवाची आणखी माहिती मिळवू शकता : https://cherryblossomfestival.in/
कयिनु (मणिपूर)
मणिपूर आणि नागालँडच्या सीमारेषेवर कयिनु गाव वसलेलं आहे. या गावाला मणिपूरचं प्रवेशद्वार म्हटलं जातं. निसर्गाने या गावाला भरभरून दिलंय आणि याच निसर्गाच्या कृपेने या ठिकाणी दरवर्षी अत्यंत दुर्मिळ वनस्पती उगवतात. या वेगळेपणामुळे गेल्यावर्षी चेरी ब्लॉसम महोत्सवातील वार्षिक पुष्प महोत्सवाचा एक भाग म्हणून कयिनु गावाची निवड करण्यात आली आहे.
कयिनुचं वैशिष्ट्य तिथली फुलं असल्याने फुलांची सजावट आणि अत्यंत दुर्मिळ प्रकारची फुलं या महोत्सवात पाहायला मिळतील. याखेरीज महोत्सवाचं मुख्य आकर्षण असलेलं चेरी ब्लॉसम तर असणार आहेच.
पर्यटकांना स्थानिक संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून महोत्सवात पारंपारिक कार्यक्रमांवर भर असणार आहे. पारंपारिक नृत्य, खाद्यपदार्थ आणि खेळ हे मुख्य आकर्षण असतील. कयिनु महोत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिलॉंगच्या चेरी ब्लॉसम महोत्सावापेक्षा या महोत्सवाला कमी गर्दी असते, त्यामुळे ज्यांना कामापासून थोडी विश्रांती हवी आहे आणि निसर्गात शांततेत वेळ घालवायचा आहे अशा लोकांसाठी कयिनु महोत्सव अगदी योग्य आहे. दुसरा फायदा असा की फारसा प्रसिद्ध नसलेला मणिपूर पाहायला मिळेल.
यावर्षापासून कयिनुच्या महोत्सवाला संगाई महोत्सवात देखील सामावून घेण्यात आलं आहे. संगाई महोत्सवाचा भाग म्हणून २४ नोव्हेंबर यते ३० नव्हेंबरपर्यंत कयिनु महोत्सव भरवला जाईल.
आणखी माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा : http://www.manipurtourism.gov.in/
तर मंडळी, १ नाही तर २ ठिकाणी चेरी ब्लॉसम महोत्सव होतोय. तुम्ही कोणत्या महोत्सवाला हजर राहणार ?