बोभाटा बाजार गप्पा : व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या आत्महत्येमागचं कारण आणि CCD-बाजारावरचे परिणाम!!
सीसीडीचे सर्वेसर्वा व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या जीवनाचा काल करुण अंत झाला. याबद्दल बहुतेक सगळीच माहिती आतापर्यंत तुम्ही कुठे ना कुठे तरी वाचलीच असेल. बोभाटावर ती माहिती पुन्हा एकदा देण्यापेक्षा ‘कॅफे कॉफी डे’ची (सीसीडी) ही शोकांतिका कशी घडली आणि त्याचा सर्वसामान्य जनतेवर काय परिणाम होईल याचा आज विचार करूया.
सीसीडीने तुम्हाला काय दिले?
ज्या देशात जेमतेम दोन-तीन टक्के लोक कॉफी पितात, त्या देशात सीसीडीने आपल्याला कॉफीच्या पलीकडे जाऊन कॉफीच्या निमित्ताने स्वप्नं बघायला शिकवले. १९९६ साली बंगलोरच्या ब्रिगेड रोडवर सुरु झालेल्या पहिल्या सीसीडीनंतर नंतरच्या २० वर्षात तरुणाईच्या जीवनशैलीचा सीसीडी हा अविभाज्य भाग झाला होता. आपल्यापैकी बऱ्याचजणांनी नव्या व्यवसायाची स्वप्नं सीसीडीमध्ये बसूनच बघितली असतील. काहीजणांचे नोकरीचे इंटरव्ह्यू पण इथेच झाले असतील, आणि हो बहुतेकांनी पहिलं ‘प्रपोज’ सीसीडीमध्येच केलं असेल. आता या पिढीला ही स्वप्नं बघायला दुसरा एखादा कोपरा शोधायला लागेल.
व्ही. जी. सिद्धार्थ यांनी हा आततायी निर्णय का घेतला असेल ?
कालपासून सर्वत्र उपलब्ध असलेल्या एका पत्रात त्यांनी आयकर विभाग आणि प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर्स यांच्या असह्य दबावामुळे आपण हरलो आहोत असे निवेदन केले आहे. आयकर विभागाने आपण असे काहीच केले नाही, उलट व्ही. जी. सिद्धार्थ यांनीच ३६२ कोटी रुपयांचे उत्पन्न दडवल्याचा आरोप केला आहे. आपल्या देशात सरकारी यंत्रणा बऱ्याचवेळा राजकीय दबावाखाली काम करतात हे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. सत्य काय ते थोड्याच दिवसांत कळेल. राहता राहिला प्रश्न प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर्सचा, ते आधी समजून घेऊया.
प्रायव्हेट इक्विटी म्हणजे काय ?
प्रायव्हेट इक्विटी हे कंपनीच्या सुरुवातीच्या काळात भांडवल पुरवणारे गुंतवणूकदार असतात. असे भांडवल उभे करून देणार्या काही कंपन्या असतात. या कंपन्या अनेक श्रीमंत लोकांचे किंवा कंपन्यांचे पैसे एकत्र करून प्रायव्हेट इक्विटी फंड बनवतात. जगभरात अब्जावधी डॉलर्सचा व्यवहार अशा पध्दतीने होत असतो. उबर-ओला-फेसबुक-गूगल अशा मोठमोठ्या कंपन्या पण अशाच प्रकारचे भांडवल उभे करून मोठ्या झाल्या आहेत. या गुंतवणूकीत धंद्याच्या संकल्पनेवर आणि ती संकल्पना राबवणार्या प्रवर्तकावर सगळी मदार असते.
अशी भागीदारी करण्यात भांडवल नाहीसे होण्याची जोखीम असते, पण संकल्पना म्हणजे आयडिया यशस्वी ठरली तर धंद्यात लावलेले पैसे कितीतरी पट होऊन परत मिळण्याची शक्यताही असते. थोडक्यात ‘सीसीडी’मध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनेक प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर्सना जोखीमीची जाणीव होतीच. त्याखेरीज शेअर्स बाजारात नोंदणीकृत असल्याने बाहेर पडण्याचा रस्ताही मोकळा होता.
सिद्धार्थ यांच्या शेवटच्या पत्रात अशा प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर्सचा त्यांच्यावर दबाव आल्याचा उल्लेख आहे. हा काय प्रकार असावा ?
यामध्ये दोन शक्यता आहेत.
१. ज्या प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर्सची कंपनीतून बाहेर पडण्याची इच्छा होती, त्यांचे शेअर्स खरेदी करण्यासाठी सिद्धार्थ यांना अवाजवी अटींवर पैसे उभे करावे लागले असतील आणि त्यापैशांची देखील मुदत आता संपली असेल.
२. बरेच प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर्स वरवर बघता परदेशी गुंतवणूकदार असतात. बऱ्याचवेळा भारतातलेच राजकारणी त्यांचा काळा पैसा मॉरिशस सारख्या देशात हवाल्याने पाठवून तोच पैसा प्रायव्हेट इक्विटीच्या रुपात देशात परत घेऊन येतात. असे प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर देशातलेच असल्याने सिद्धार्थसारख्या प्रवर्तकांवर अवाजवी आणि बेकायदेशीर दबाव आणू शकतात. कदाचित असा दबाव असह्य झाल्यामुळे सिद्धार्थने आत्महत्या केली असावी. बाजारातल्या गुंतवणूकदारांना या समस्येची कुणकुण ४-५ महिन्याआधीच लागली होती त्यामुळे 'माईंड ट्री'च्या शेअर विक्रीतून ‘लार्सन अँड टुब्रो’कडून ३२०० कोटी रुपयांची आवक झाल्यावरही शेअर्सचे भाव सतत पडतच होते.
(ग्राफ फोटो आणि लिंक)
सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे काय ?
आज हा लेख लिहिताना सीसीडीच्या शेअर्सचा भाव १२३ रुपयांपर्यंत खाली आलेला आहे. ६ महिन्यापूर्वी तोच शेअर ३०० रुपयांच्या पातळीवर होता. ३ महिन्यापूर्वी २५० रुपयांच्या पातळीवर होता. विकायची संधी तेव्हाच होती. आताही विकायला हरकत नाही, पण एक वेगळा विचार आम्ही इथे मांडत आहोत तो आधी वाचून घ्या.
सीसीडीचे जवळजवळ १७०० कॅफे आहेत, ४८००० कॉफी व्हेंडिंग मशीन्स आहेत, ५३२ किओस्क आहेत आणि दळलेली कॉफी विकायला ४०३ दुकानं आहेत. कंपनीचा दैनंदिन व्यवहार उच्चशिक्षित पारंगत व्यवस्थापक बघतात. वार्षिक उलाढाल ४५०० कोटीच्या घरात आहे. व्ही. जी. सिद्धार्थ नसल्यामुळे दैनंदिन कामावरती काहीच परिणाम होणार नाही. काल मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या एका पत्रात सीसीडीचे मूल्य ८००० कोटी रुपयाच्या वर आहे. अशा परिस्थितीत जर व्ही. जी. सिद्धार्थ नसल्यामुळे कंपनी विक्रीस काढायची म्हटल्यास अनेक विदेशी कंपन्या ताबडतोब तयार होतील. सीसीडीचा जनमानसाशी असलेला संबंध न तोडता हा व्यवहार पूर्ण झाला तर शेअरहोल्डर्सचे नुकसान होणार नाही.
वित्तसंस्थांचे भवितव्य काय ?
अनेक बँका, वित्तसंस्था यांचे कर्ज किंवा इक्विटीच्या मार्गाने जवळजवळ ८१८३ कोटी सीसीडीमध्ये गुंतलेले आहेत. या सर्व संस्थांची यादी आम्ही तुम्हाला देत आहोत. तूर्तास ही यादी फक्त बोभाटानेच दिली आहे.
यावरून असे लक्षात येईल की आयडीबीआय ट्रस्टीशीप सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे सगळ्यात जास्त नुकसान होऊ शकते. कारण त्यांचे ४५७५ कोटी रुपये या कंपनीत गुंतलेले आहेत. कदाचित या पुढची सरकारी चौकशी या ४५७५ कोटीबद्दल व्हायला हवी. एचडीएफसी बँकेचे असेच कर्ज सीसीडीवर होते, मात्र ते कर्ज त्या बँकेने वेळीच वसूल केलेले आहे. जर अशीच सावधगिरी इतर बँकांनी दाखवली असती तर कदाचित ही वेळ आलीच नसती.
या शोकांतिकेचा जनमानसांवर काय परिणाम होईल ?
जनमानसांत शेअरबाजार, बँका आणि वित्तसंस्था यांच्याबद्दल अविश्वास निर्माण होईल. नवीन स्टार्टअप्सना गुंतवणूक मिळणे कठीण जाईल. नव्या अर्थव्यवस्थेत गेली २० वर्षे अनेक धाडसी उद्योजक पुढे आले होते. कदाचित हे धंदेवाईक धाडस करण्यास घराघरांतून विरोध निर्माण होईल. एक पिढी हर्षद मेहताने वाया घालवली. दुसरी केतन मेहताने वाया घालवली. निश्चितच येणाऱ्या पिढीवर अशा घटनांचा नकारात्मक परिणाम होईल.
सीसीडीची टॅग लाईन “A lot can happen over coffee” अशा विपरीत अर्थाने जनमानसात कायमची लक्षात राहील हीच सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.