जनरल मोटर्सना लोटांगण घालायला लावणारा ग्राहक चळवळीचा 'बाप' - 'राल्फ नादेर'
अमेरिकेत मॉन्सँटो केमिकल या कंपनीच्या एका तणनाशक रसायनामुळे कॅन्सर झालेल्या एका गृहस्थाला करोडो डॉलर्सची भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिल्याचे तुम्ही कदाचित वाचले असेल.
याच वर्षी भारतात जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला त्यांच्या सदोष सांध्यांसाठी रुग्णांना भरपाई देण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य खात्याने दिल्याचेही नक्कीच तुम्ही वाचले असेल. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने त्यांच्या सदोष उत्पादनाची भरपाई म्हणून प्रत्येक ग्राहकाला २५ लाख देण्याचे कबूलही केले आहे. काही ग्राहकांना यापेक्षा जास्त म्हणजे एखाद्या करोडची नुकसान भरपाई मिळण्याची पण आता शक्यता आहे. या विषयावर 'बोभाटा'चा हा लेख तुम्ही आधी वाचला असेलच !
अशा अनेक बातम्या गेल्या काही वर्षात वारंवार तुमच्या वाचनात आल्या असतीलच.
ग्राहकाला मोठमोठ्या कंपन्यांशी लढा करून न्याय मिळवण्याच्या या प्रक्रियेला ग्राहक संरक्षण कायदा असे म्हणतात. भारतात ग्राहक संरक्षण कायदा १९८६ संसदेत पारीत करण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी २४ डिसेंबर १९८६ साली झाली . तो दिवस भारतात ग्राहक संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो .
अमेरिकेसारख्या प्रगत देशात जिथे प्रचंड मोठ्या औद्योगिक साम्राज्यांच्या आधारावर सरकार अवलंबून असते तिथे मात्र ग्राहकांना संरक्षण मिळायला बरीच वर्षे लागली. १९६२ साली अमेरीकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी ग्राहकाचे हक्क आणि ग्राहक संरक्षण या विषयाला पहिल्यांदा हात घातला म्हणून जगात सर्वत्र १५ मार्च हा ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. ग्राहकाला स्वत:च्या हक्काची जाणीव करून देण्याचे आणि अमेरिकन सरकारला ग्राहक संरक्षणाचे अनेक कायदे करायला भाग पाडण्याचे श्रेय फक्त एका आणि एकाच व्यक्तीकडे जातं ज्याचं नाव आहे राल्फ नादेर!!
राल्फ नादेर यांच्या बद्दल आणखी माहिती आम्ही तुम्हाला देणारच आहोत पण त्यापूर्वी राल्फ नादेर यांच्या ज्या पुस्तकामुळे ही ग्राहक हक्काची क्रांती घडून आली त्या पुस्तकाबद्दल आधी वाचू या !! साठीच्या दशकात अमेरीकन ऑटो-इंडस्ट्री तेजीत होती. गाड्यांना मागणी दिवसेंदिवस वाढत जात होती. फोर्ड, क्रिसलर, पॅकार्ड आणि जनरल मोटर्स या कंपन्या नवनवीन मॉडेल्स आणत होत्या. कमीतकमी उत्पादन खर्च म्हणजे जास्त नफा या तत्वावर या कंपन्या काम करत होत्या. कारच्या डिझाइनला जास्तीतजास्त महत्व दिले जात होते. पण यापैकी कोणतीही कंपनी सुरक्षेचा विचार करत नव्हती. डिझाइनच्या मोहात जीवाच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात होते.
दरम्यान जनरल मोटर्सने 'कोर्वेर' नावाची नवी गाडी बाजारत आणण्याचे ठरवले. या गाडीच्या निमित्ताने राल्फ नादेरने "अनसेफ अॅट एनी स्पीड " हे पुस्तक प्रकाशीत केले. जनरल मोटर्सची ही नवी गाडी कशी ग्राहकाच्या जीवावर उठली आहे याचे सप्रमाण विवेचन या पुस्तकात केले होते. उदाहरणार्थ, या गाडीच्या सस्पेंशनचे पैसे वाचवण्यासाठी गाडीच्या पुढच्या भागातला फ्रंट बार काढून टाकण्यात आला होता. त्याऐवजी समोरच्या टायरमध्ये जास्त दाबाने हवा भरण्याची सूचना करण्यात आली होती. जर समोरच्या टायरमध्ये हवेचा दाब कमी झाला तर गाडी उलटण्याची शक्यता जास्त होती. परंतू याची सखोल माहिती कंपनीद्वारे दिलीच जात नव्हती. याखेरीज कोर्वेरच्या इतर अनेक त्रुटींवर सडकून टिका करून नादेर यांनी कार पूर्ण असुरक्षित असल्याचे दाखवून दिले होते. नादेरचे मत पूर्णपणे बरोबर होते याची ग्वाही जॉन डीलॉरेन या जनरल मोटर्सच्या मॅनेजरने "On a Clear Day You Can See General Motors" या पुस्तकात दिली आहे. अमेरिकन ऑटो इंडस्ट्रीला या पुस्तकाच्या प्रकाशनाने हादराच बसला. यासाठी सरकारने जी ग्राहकाभिमुख ठोस पावले उचलली त्याबद्द्ल आपण वाचूच, पण अमेरीकन सरकारवर दडपण आणू शकणार्या जनरल मोटर्ससारख्या कंपनीने राल्फ नादेरला कसा त्रास दिला ते बघू या!!
नादेरच्या पुस्तकामुळे आणि त्याच्या दिवसेंदिवस वाढत जाणार्या प्रभावाने धंदा बुडीत जाईल या भितीने जनरल मोटर्सने खाजगी गुप्तहेरांची मदत घेतली. या गुप्तहेरांनी नादेरच्या नातेवाईकांना भेटून त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा तपास केला. नादेरच्या सवयी काय आहेत हे शोधण्यासाठी अनेकांना प्रश्न विचारण्यात आले. नादेरच्या पाळतीवर हेर नेमून त्याच्या हालचालीची नोंद ठेवण्यात आली. त्याच्या आर्थिक व्यवहारावर बारीक लक्ष ठेवण्यात आले. त्याला फोनवरून धमक्या देण्यात आल्या. त्याचे फोन टॅप करण्यात आले. त्याच्या येण्याजाण्याच्या मार्गावर सुंदर मादक तरुणी त्याला भेटतील अशी व्यवस्था करून त्याला सेक्स ट्रॅपमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करण्यात आला. बदनाम करण्यासाठी जी-जी माहिती उपयुक्त ठरेल अशी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यादरम्यान आपल्यावर पाळत ठेवली असल्याचे नादेरच्या लक्षात आले आणि त्याने अमेरिकन सिनेटमध्ये तक्रार केली. या तक्रारीच्या चौकशीसाठी जनरल मोटर्सच्या जेम्स रोश यांना सिनेटच्या कमीटीसमोर उभे केले गेले. जेम्स रोश यांनी जनरल मोटर्स नादेर यांच्या खाजगी जीवनात आपण लुडबूड करत असल्याचा आरोप कबूल केला.
(जेम्स रोश यांनी सुरुवातीला सगळे आरोप फेटाळले तेव्हाचा क्षण.)
१९६६ साली नादेरने जनरल मोटर्सला कोर्टात खेचले. पण हा खटला लढवण्याऐवजी जनरल मोटर्सने कोर्टाबाहेर समझौता करून जनरल मोटर्सने राल्फ नादेरला ४२५००० डॉलर्सची भरपाई दिली. नादेरने ही रक्कम वापरुन ग्राहकांच्या हक्कासाठी काम करणार्या एका न्यासाची स्थापना केली.
यानंतर जे घडले त्याचे फायदे आज आपल्याला मिळत आहेत. आता गाड्या केवळ डिझाइनसाठी नाही तर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बनवल्या जातात. नादेरने केलेल्या प्रयत्नामुळे आजच्या गाड्यांमध्ये डोअर सेफ्टी लॉक, सिटबेल्ट, एअर बॅग्ज आणि इतर अनेक व्यवस्था केल्या गेल्या आहेत.
"अनसेफ अॅट एनी स्पीड" नंतर नादेर सातत्याने ग्राहकांच्या हक्कासाठी आणि संरक्षणासाठी लढत राहिला. नादेरच्या आग्रहामुळे जे कायदे अमेरिकेत करण्यात आले त्याची यादी बघितल्यावर थक्क व्हायला होते.
१. Freedom of Information Act
२. Foreign Corrupt Practices Act,
३. Clean Water Act,
४. Consumer Product Safety Act,
५. Whistleblower Protection Act.
हे कायदे नादेरने केलेल्या चळवळीचे फलित आहेत.
आजही वयाच्या ८५ व्या वर्षी नादेर सक्रीय आहेत. व्यवसायाने वकील असलेले नादेर बुध्दीमत्तेच्या जोरावर आणि चळवळीच्या ताकदीवर प्रचंड ऐश्वर्य उभे करू शकले असते, पण समृध्द अमेरिकेत नादेर संन्यासाचे जीवन जगत आहेत. नादेर वर्षभरात फक्त २५००० डॉलर खर्च करतात. शक्यतो बसनेच प्रवास करतात. त्याच्या घरात टेलीव्हिजन नाही. बँकेत आणि म्युच्युअल फंडात जी गुंतवणूक आहे हेच त्यांचे उत्पन्न आहे. आपल्या भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की नादेरना महात्मा गांधी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
आता एक शेवटचा मुद्दा असा की या भारतीयांनी राल्फ नादेरच्या कार्याची का दखल घ्यावी ?
यासाठी वर दिलेल्या कायद्यांची यादी तपासून बघा. हे सगळे कायदे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रितीने काही वर्षांच्या फरकाने आपल्याकडे आलेले आहेत. आता अनेक अमेरिकन कंपन्या भारतात आलेल्या आहेत. तुम्ही जर या कंपन्यांचे ग्राहक असाल तर वर दिलेल्या यादीतला पाचवा कायदा अवश्य वाचा. बोभाटाच्या पुढच्या लेखात या कायद्याचे महत्व आपण बघणारच आहोत.