टर्मिनस, सेन्ट्रल, जंक्शन मधला फरक माहित्ये का ?
रेल्वे म्हणजे आपल्या भारतीयांची लाईफ लाईन. मुंबई, दिल्ली सारख्या ठिकाणच्या पब्लिकसाठी तर रेल्वे हा जीव की प्राण असतो मंडळी. आता आम्ही हे सांगत बसणार नाही की रेल्वेतून दररोज किती प्रवासी प्रवास करतात. जाणून घ्यायचंच झालं तर कोणत्याही स्टेशनवर जा, तुम्हीच डोळ्यांनी बघाल.
आता आपण अनेकदा ट्रेनने प्रवास करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, काही रेल्वे स्टेशन्सना टर्मिनस तर काहींना सेन्ट्रल, काहींना जंक्शन किंवा फक्त स्टेशन म्हणून का ओळखलं जातं ? हा नावात फरक का? हे टर्मिनस, जंक्शन, स्टेशन ही काय भानगड आहे महाराजा ?
तर याची पूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
१. टर्मिनस
टर्मिनस म्हणजे असं स्टेशन जिथून ट्रेन पुढे जात नाही. म्हणजे ज्या दिशेने ट्रेन आली आहे त्याच दिशेने तिला पुन्हा प्रवास करावा लागतो. जसं की छत्रपती शिवाजी टर्मिनस, जिथून देशातल्या विविध भागात जाण्यासाठी ट्रेन निघतात. पण एकाच दिशेनं त्यांचं प्रयाण होतं.
काही उदाहरणं :
छत्रपती शिवाजी टर्मिनस
लोकमान्य टिळक टर्मिनस
वांद्रे टर्मिनस
२. सेन्ट्रल
सेन्ट्रल हे अत्यंत गजबजलेलं ठिकाण असतं. या स्टेशनवरून अनेक ठिकाणांसाठी गड्या रवाना होतात. यात अनेक स्टेशन्सचा समावेश असतो. काही ठिकाणी सर्वात जुन्या स्टेशन्सला सुद्धा सेन्ट्रल नाव दिले जाते. भारतात एकूण ५ सेन्ट्रल आहेत :
मुंबई सेन्ट्रल (बीसीटी)
चेन्नई सेन्ट्रल (एमएएस)
त्रिवेंन्द्रम सेन्ट्रल (टीवीसी)
मँग्लोर सेन्ट्रल (एमएक्यू)
कानपुर सेन्ट्रल (सीएनबी)
३. जंक्शन
जंक्शन म्हणजे एक असं स्टेशन जिथून येण्याजाण्यासाठी जवळ जवळ ३ रूट असतात. म्हणजेच एक ट्रेन जेव्हा जंक्शनमध्ये येते तेव्हा तिला जाण्यासाठी कमीत कमी २ रूट तरी असतातच.
भारतातील काही महत्वाची जंक्शन :
मथुरा जंक्शन (7 रूट)
सलीम जंक्शन (6 रूट)
विजयवाड़ा जंक्शन (5 रूट)
बरेली जंक्शन (5 रूट)
४. स्टेशन
स्टेशन म्हणजे असं ठिकाण जिथे ट्रेन येते, थांबते आणि निघून जाते. त्या त्या भागातील रेल्वेच्या थांबण्याचे ठिकाण म्हणजे स्टेशन. (मुंबईच्या माणसांना काही वेगळं सांगायची गरज नाही.)
भारतात एकूण ८००० ते ८५०० रेल्वे स्टेशन्स आहेत.
या माहितीमुळं ज्ञानात भर पडली का राव ?