ओळख जिल्ह्यांची: जिजाऊंच जन्मस्थान ते गजानन महाराजांचं शेगाव, बुलढाणा जिल्ह्यात काय काय आहे?
विदर्भाच्या पश्चिमेकडे असलेला बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्रासाठी विविध कारणांसाठी महत्त्वाचा आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म याच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला होता. सिंदखेडराजाला दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. तसेच लोणार सरोवरामुळे या जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. अशा बुलढाणा जिल्ह्याची आज आपण संपूर्ण ओळख करून घेणार आहोत.
बुलढाण्याचा इतिहास तसा प्राचीन आहे. पण अलीकडील गोष्टींचा विचार केल्यास १८ व्या शतकात बुलढाणा प. बेरारचा भाग होता. १८६४ साली बुलढाण्याला स्वतंत्र जिल्हा म्हणून मान्यता मिळाली. तेव्हापासून हा जिल्हा स्वतःचे वैशिष्ट्य राखून आहे.
बुलढाणा जिल्ह्यात तापी आणि गोदावरी अशा दोन्ही नद्यांचे खोरे आहेत. सातपुडा पर्वतरांगेचा भाग समजला जाणारा गाविलगड आणि अजिंठा बालाघाट डोंगररांगा या जिल्ह्याचा भाग आहेत. पैनगंगा नदीचा उगम हा याच जिल्ह्यात होऊन ती अकोला जिल्ह्यात प्रवेश करते. तापी आणि पैनगंगेप्रमाणेच पूर्णा ही देखील महत्त्वाची नदी बुलढाण्यातून वाहते. यांच्याशिवाय काटेपूर्णा, नळगंगा, विश्वगंगा, ज्ञानगंगा, बाणगंगा अशा नद्याही येथुन वाहतात.
बुलढाणा जिल्ह्यातील जमिन ही वाळू, चुनखडी तसेच ज्वालामुखीजन्य काळ्या दगडापासून बनली आहे. शेती हाच बुलढाण्याचा पण प्रामुख्याने व्यवसाय आहे. जिल्ह्यात कापूस पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्याशिवाय अन्नधान्य हे प्रमुख उत्पादन आहे. याव्यतिरिक्त काही भागात संत्री, द्राक्ष, केळी अशी पिके पण घेतली जातात.
खनिज संपत्ती महाराष्ट्रातील मोजक्या जिल्ह्यात अस्तित्वात आहे. बुलढाणा त्यापैकी एक. बुलढाण्यात लोणार भागात मीठ आणि शिशाचे उत्पन्न घेतले जाते. पर्यटनाच्या दृष्टीने मात्र बुलढाणा जिल्हा विशेष आहे.
गजानन महाराजांच्या सहवासाने शेगाव हे ठिकाण धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे बनले आहे. शेगाव संस्थान हे अनेकार्थाने महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहे. तेथील स्वच्छता, शिस्त यांचे कौतुक सर्वत्र होते. तेथील आनंद सागर हा प्रकल्प पाहण्यासाठी दूरवरून लोक येत असत.
आकाशातून पृथ्वीवर उल्का आदळली आणि त्यातून तयार झालेले लोणार सरोवर जगभरातील शास्त्रज्ञांसाठी मोठे कुतूहल आहे. हे सरोवर खाऱ्या पाण्याचे असून आश्चर्य म्हणजे फक्त या सरोवराचे पाणीच तेवढे खारे आहे. बाजूला असलेल्या विहिरीला गोड पाणी आहे. तब्बल ५०,००० वर्षे जुने हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असते.
दिनगंगा आणि अंबा बरवा हे दोन अभयारण्य या जिल्ह्यात असून विविध प्राण्यांचा संचार येथे पाहायला मिळत असतो. अंबा बरवा अभयारण्यात चित्ता, सांबर, वाघ तसेच चार सिंगांचे हरीण वास्तव्य करत असतात. त्याचप्रमाणे अनेक पक्षी पण तिथे दिसतात.
तर ही होती बुलढाणा जिल्ह्याची माहिती. तुम्हाला या जिल्ह्याबद्दल आणखी काही माहित असेल तर आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये जरूर कळवा.