देशाच्या पहिल्या तृतीयपंथी पोलीस उपनिरीक्षकाची कहाणी !!!
आपल्या देशात तृतीयपंथी माणसाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन काहीसा ठरलेला असतो. सार्वजनिक ठिकाणी त्यांना एखाद्या परग्रहावरच्या माणसाप्रमाणे वागणूक मिळते, नोकरी देताना टाळाटाळ केली जाते. तेही समाजाचे एक भाग आहेत हे आपण विसरतो आणि हे फक्त भारतातच नव्हे तर जगात अनेक ठिकाणी साधारण अशीच परिस्थिती दिसून येईल.
तृतीयपंथीयांसाठी झालेल्या सामाजिक चळवळी, प्रबोधन यामुळे काही प्रमाणात का होईना, बदल घडत आहेत. तृतीयपंथीयांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलत आहे. या बदलाचं एक जिवंत उदाहरण म्हणजे के. प्रीतिका यशिनी. प्रीतिका आहेत देशातील पहिल्या तृतीयपंथी पोलीस उपनिरीक्षक. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना साहजिकच मोठा झगडा द्यावा लागला.
काय आहे प्रीतिकाची कहाणी ?
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी गरजेचा असलेला पोलीस अकादमीचा एक वर्षाचा अभ्यासक्रम प्रीतीकाने पूर्ण केला आहे. पण या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी बसण्यात त्यांना मोठीच अडचण आली. राज्य लोकसेवा आयोगाच्या नियमावलीत तृतीय पंथीयांसाठी कोणतेही नियम किंवा आरक्षण नसल्याने प्रीतीका यांचा अर्ज ताबडतोब फेटाळण्यात आला. या घटनेनंतर खचून न जाता या विरोधात प्रीतीकाने वेगवेगळ्या ठिकाणी याचिका दाखल केल्या. काही माणसं त्यांच्यापाठी खंबीरपणे उभी राहिली. शेवटी मद्रास उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश आला आणि देशाला पहिली तृतीयपंथी पोलीस उपनिरीक्षक मिळाली.
मद्रास न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर प्रीतिकाचा पोलीस उपनिरीक्षक बनण्याचा मार्ग सुरळीत तर झालाच पण पोलीस दलात तृतीयपंथीच्या समावेशाबद्दल आवश्यक बदलही करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
प्रीतीकाच्या या यशस्वी लढ्यानंतर त्यांना इथेच न थांबता भारतीय पोलीस सेवेत जायचं आहे. या ऐतिहासिक घटनेनंतर अनेक तृतीयपंथीयांच्या मनात आशा जागृत झाली आहे.
अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला बोभाटाचा सलाम आणि प्रीतिका यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.