घरातल्याच साध्या गोष्टी वापरून सुरेख सुंदर गणपती आरास करण्याचे ६ प्रकार!!
अहो, गणपती बाप्पा आले. अगदी १५ दिवसांवर आले. दरवर्षी केवढी धावपळ, आखणी, योजना.. अनेकांची सजावटीची योजना तयार झालेली असते. त्यासाठी काही वस्तू मिळविणे सुरू असते. गावी जाणारी भक्त मंडळी, काहीच जमणार नसेल तर खास मुंबईहून तयार मखरे घेऊन जातात. शहरातील बिझी मंडळी २/४ दिवस आधी मिळेल त्या किंमतीला तयार मखरे घेऊन येतात. २ वर्षांपूर्वी थर्मोकोल बंदीमुळे, मराठी मखर कलावंताचे अक्षरशः पेकाटच मोडले. या वर्षीच्या कोरोना संकटाने सगळेच मोडले आहे. त्यामुळे आता सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंमधून, जास्तीत जास्त चांगली सजावट करण्याचा विचार करायला हवा.
पूर्वी आपल्याकडे घरगुती गणपतींसाठी पिढ्यानपिढ्या साध्या सजावटीची पद्धत होती. लाकडी प्रशस्त शिसवी टेबलावर गणपतीची मूर्ती, त्यामागे एक मोठा परंपरागत आरसा, मूर्ती आणि आरसा यांच्यामध्ये वाहिलेला
केवडा, दोन्ही बाजूंना समया किंवा काचेच्या रंगीत शेडचे विद्युत दिवे, पुढे उतरंडीवर मांडलेली चांदीची परंपरागत पूजेची उपकरणे आणि दुर्मिळ कलात्मक वस्तू, चांदीच्या तबकात फळे, लाडू, करंज्या अशा वस्तू, खूप जुने तेलाचे परंपरागत दिवे, चिनीमातीची कांही खेळणी आणि बाहुल्या असा कांहीसा थाट असे.
अगदी आजसुद्धा अनेक घरांमध्ये या निमित्ताने ४ / ५ पिढ्यांच्या पूर्वीच्या अत्यंत सुंदर वस्तू पाहायला मिळतात. यासाठी त्या वर्षातून फक्त एकदाच बाहेर काढल्या जातात. पूर्वी घरातील सर्व कुटुंबीय या निमित्ताने एकत्र जमायचे आणि सर्व माणसे याच परंपरेला साजेल अशी वेशभूषा आणि दागिन्यांनी सज्ज असायची. घरात शिरल्यावरच केवडा, सोनचाफा अशा फुलांचा व खस, हीना अत्तराचा सुगंध जाणवू लागत असे. दर्शनाला येणारे इष्टमित्र, नातेवाईक यांचे अत्तर लावून व गुलाबपाणी शिंपडून स्वागत होई. फराळ आणि चहा, कॉफी, प्रसाद दिला जात असे. प्रसादासाठी पंचखाद्य, खिरापत, पेढे असायचे.
यावर्षी तर सगळेच पालटले आहे. आलेच तर येणाऱ्या पाहुण्यांचे हसतमुखाने स्वागत करताना त्यांच्या मुखावर आधी मास्क आहे ना, हे पाहावे लागेल. अत्तर लावण्याऐवजी सॅनिटायझर लावावा लागेल. गुलाबपाण्याऐवजी टेम्परेचर पाहावे लागेल . ५ / ५ फूट दूर बसावे लागेल. असो. पण आपल्याला वर्षभर आनंद पुरवणाऱ्या गणपती बाप्पाचे स्वागत, पूजाअर्चा, आरती, नैवेद्य या गोष्टी, सध्या असलेल्या बंधनांमध्ये बसतील अशा तऱ्हेने कराव्या लागतील. तुटपुंज्या वस्तूंमध्ये सुद्धा बाप्पासाठी आरास करावी लागेल.
घरातल्या घरात उपलब्ध होतील किंवा आता बाजारात थोडीशी सूट दिलेली असतांना मिळू शकतील अशा वस्तूंतूनX चांगली, वेगळी, सोपी सजावट कशी करता येईल ते पाहूया. मी केलेल्या अशा कांही सजावटीचे फोटोही देत आहे. घरातील विविध रंगांच्या ओढण्या आणि दुपट्टे वापरून, त्यांच्या विविध रचना करून सुंदर सजावट करता येते.
कागदाच्या कोरलेल्या विविध प्रकारच्या जाळ्या ( किरीगामी ) वापरूनही सुंदर आरास करता येईल.
गणपतीपुढे एक आगळीवेगळी पर्यावरणस्नेही आरास करता येते. मोठ्या शहरातील मुलांना ही कधी पाहायलाच मिळलेली नसते. माझ्या गणपतीसमोर मी जशी कोकण- गोवा येथे माटोळी बांधली जाते तशी माटोळी तयार केली होती. याला माटी किंवा अंबारी असेही म्हणतात. मुंबईत ज्या ज्या भाज्या-फळे मिळू शकल्या त्या त्या माटोळीला बांधल्या होत्या. गणपतीचे आगमन हे निसर्गाच्या समृद्ध काळी होते. पावसामुळे फळे,फुले, भाज्या यांची रेलचेल होते. त्यातील पहिले फळ, पहिली भाजी देवाला अर्पण करण्याचा हेतू यामागे असतो. फुले ही देवाला वाहिली जातातच पण फळे आणि भाज्यांचे काय ? म्हणूनच एक लाकडी चौकट गणेशापुढे छताला टांगली जाते. त्यावर त्यावेळी उपलब्ध होणारी फळे, भाज्या, फळभाज्या बांधून सजावट केली जाते. १०० % पर्यावरणस्नेही अशी ही आरास असते. गणपतीला पूजेत पत्री वाहतांना जशी आपोआपच वनस्पतींची ओळख होते तशी माटोळीमुळे भाज्यांची ओळख होते. गोव्यामध्ये तर माटोळीच्या स्पर्धा घेतल्या जातात. एकेका माटोळीला ४०० किंवा त्याहूनही अधिक फळे- भाज्या बांधल्या जातात. गोव्याच्या श्री. भूषण भावे यांनी माटोळीवर लिहिलेल्या कोंकणी पुस्तकाला कर्नाटक सरकारचा " सर्वोत्तम कोंकणी पुस्तक पुरस्कार " मिळाला होता.
विविध रंगातील फुले, पाकळ्या वापरून प्रसादाच्या जेवणाचे ताट मांडता येते. यावेळी उपलब्ध झाल्यास पांढऱ्या कमळाचा कळा ठेवला तर तो मोदकासारखा दिसतो. अर्थातच ही फक्त सजावट आहे.
बाप्पाला आपण मोदकांसह जेवणाचा नैवेद्य दाखवतोच !
कागदांची सजावट तर सोपी आणि खूप आकर्षक दिसते. एका रंगीत कागदावर खुणा करून घेऊन त्याला फक्त एक उलट व एक सुलट अशा घड्या घालाव्यात. नंतर याची एक बाजू घट्ट बांधून दुसरी बाजू उघडत गेल्यावर एक सुंदर पंखा तयार होतो. पंखा जेवढा हवा असेल त्या मापाचा कागद घ्यावा. दोन वेगळ्या रंगांचे कागद असतील तर छोटा व मोठा असे दोन पंखे बनवून एकमेकात अडकविता येतात. मोरपिसे उपलब्ध झाल्यास ही आरास मयुरेश गजाननाला शोभून दिसते.
समजा मोठा कागद उपलब्ध नसेल तर वेगवेगळ्या रंगांचे आणि आकाराचे कागद घेऊन अनेक पंखे बनविता येतात.
हे पंखे गणेशाच्या मूर्तीच्या मागे वेगवेगळे मांडून त्यावर प्रकाशझोत टाकल्यावर खूप सुंदर परिणाम साधता येतो.
फक्त एकाच रंगाचे बरेच कागद उपलब्ध असतील तर एकाच जाडीच्या नळकांड्या बनवून, गणपतीच्या मूर्तीच्या मागे त्यांचीच एक देखणी पार्श्वभूमी तयार करता येते.
ओम, श्री, अशी मंत्रबीजे, पूर्वीच्या ठिपक्यांच्या रांगोळ्या, अंगणात रांगोळीने काढली जाणारी शुभचिन्हे एखाद्या कागदावर रंगवून गणेशमूर्तीच्या मागे भिंतीवर लावता येतात. अंकांची सरस्वती तर सोपी, वेगळी आणि छानच दिसते. जर मोरपिसे उपलब्ध असतील तर हीच सरस्वती सौम्य निळ्या कागदावर गडद निळ्या रंगाने काढून त्यातील प्रत्येक वेलांटीच्या / टोकाच्या शेवटी मोरपीस लावल्यास ते मोर आणि सरस्वतीच्या संदर्भामुळे छान दिसते.
या कांही सजावटी आहेत. तुम्हालाही अशा अनेक सजावटीची माहिती असेल. त्याही जरा शेअर करूया. पण काहीही झाले तरी कृपया कोरोना, मास्क, व्हायरस, स्वयंपाकाची भांडी, फळे, भाज्या अशा गोष्टींची गणपतीची मूर्ती, आकृती बनवू नका.
।। गणपती बाप्पा मोरया ।।
लेखक, छायाचित्रे : मकरंद करंदीकर.