computer

स्मायलीचा जन्मदाता कोण माहित आहे? त्याला या डिझाईनचे किती पैसे मिळाले हे वाचून थक्क व्हाल!!!

स्मायली. गर्द पिवळ्या रंगाचा गोल आणि त्यावर उभट डोळे आणि हसरी जिवणी. पाहिल्या पाहिल्याच आपल्याही चेहर्‍यावर हसू उमटतं. आता व्हॉटसऍपवर काही लिहिताना स्मायली म्हणजेच इमोटिकॉन वापरला नाही तर कसंसंच होतं. पण मुळातल्या या हसर्‍या तोंडाचा शोध कुणी आणि कधी लावला?

या अवलियाचं नांव आहे हार्वी बॉल. १० जुलै १९२१साली जन्मलेला हा अमेरिकन  मनुष्य एक कमर्शिअल आर्टिस्ट होता.

कोण होता हा हार्वी बॉल?

या हार्वी बॉलनं हायस्कूलमध्ये असताना एका साईन बोर्ड पेंटरकडे उमेदवारी केली. त्यानंतर वोर्शेस्टर आर्ट म्युझियम स्कूलमध्ये रीतसर ललित कला म्हणजेच फाईन आर्टचं  शिक्षणही घेतलं. त्यानंतर या पठ्ठ्यानं दुसर्‍या महायुद्धात भाग घेतला. ओकिनावाच्या लढ्यातल्या कामगिरीबद्दल त्याला ब्रॉन्झ पदकही मिळालं होतं.

त्यानंतर त्यानं आपली स्वत:ची कंपनी काढण्याआधी एका स्थानिक जाहिरात कंपनीत काम केलं. तेव्हाच त्यानं या स्मायलीला जन्म दिला. त्यानंतर तो पुन्हा सैन्यात गेला. तब्बल २७ वर्षं त्यानं नॅशनल गार्डमध्ये काम केलं आणि १९७३मध्ये ब्रिगेडियर जनरल म्हणून तिथून निवृत्त झाला. यावेळेपावेतो तो ५२ वर्षांचा झाला होता.  आता तरी माणसानं गप्प बसावं ना!! पण नाही.. त्यानं पुढची ६ वर्षं आर्मी रिझर्व्हजमध्ये काम केलं आणि १९७९मध्ये कर्नल म्हणून तो निवृत्त झाला.

 

स्मायलीचा जन्म कसा झाला?

मॅसॅच्युसेट्सच्या वोर्शेस्टर इथल्या स्टेट म्युच्यअल लाईफ इन्शुरन्स कंपनी या नावानं  ओळखल्या जाणार्‍या कंपनीनं ओहायो इथली गॅरंटी म्युचुअल कंपनी खरेदी केली. हे प्रकरण कंपनीच्या कर्मचार्‍यांना फारसं रूचलं नव्हतं आणि त्यांचं मानसिक धैर्य थोडं खच्ची झाल्यासारखं झालं होतं. यावर तोडगा म्हणून स्टेट म्युच्यअल लाईफ इन्शुरन्स कंपनीनं हार्वी बॉलला फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून बोलावणं धाडलं. त्याला  कर्मचार्‍यांचा उत्साह परत येईल असं काहीतरी करायला संगण्यात आलं होतं.

त्यानं बनवला एक हसरा चेहरा- स्मायली. पण त्यात एक डोळा दुसर्‍या डोळ्यापेक्षा थोडासा मोठा होता.  दहा मिनिटांतच त्यानं दुसरं - जगप्रसिद्ध डिझाईन तयार केलं. साधं, सोपं असं हे डिझाईन कंपनीला पसंत पडलं आणि हार्वीला त्या कामाचे ४५ डॉलर्स मिळाले. साल होतं १९६३.

स्मायलीनं काय कमाल केली?

कंपनीनं आपल्या १०० नोकरदारांना या स्मायली चेहर्‍याच्या पिन्स दिल्या. रोजचं काम करताना, फोन करताना, हे हसरे चेहरे समोर आले की आपोआपच कर्मचार्‍यांचा चेहरा हसरा होईल ही त्यांची अटकळ होती. या हसर्‍या पिना एकदम पॉप्युलर झाल्या. कंपनीला  या पिनांच्या अगदी १०,०००च्या लॉटमध्ये ऑर्डरी येऊ लागल्या. १९६३ मध्ये डिझाईन केलेल्या या स्मायलीच्या १९७१ पर्यंत  पाच करोडहून अधिक पिन्स विकल्या गेल्या होत्या.

गंमत म्हणजे हार्वी बॉलने किंवा या स्टेट म्युच्यअल लाईफ इन्शुरन्स कंपनीनं.. दोघांनीही या स्मायलीचा कॉपीराईट म्हणजे स्वामित्वहक्क घेतले नाहीत. या कामाचे हार्वीला फक्त ४५ डॉलर्स मिळाले तितकेच.

पण आजच्या घडीला त्याला पैशांहूनही अधिक काहीतरी मिळालंय. त्याच्या स्मायलीज जगभर नुसत्या प्रसिद्ध नाहीत, तर इतरांनी त्यात आज भरही घातलीय. आजच्या काळात स्मायली म्हणजेच इमोटिकॉन्सशिवाय चॅटिंग.. छे:, कल्पनाच करवत नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required