computer

माऊंट एव्हरेस्टची उंची कशी वाढली? ही घ्या कारणं !!

जगातल्या सर्वोच्च शिखराची म्हणजे माऊंट एव्हरेस्टची उंची अजून वाढली! हे वाचून धक्का बसला ना?  नुकतच एका नवीन सर्वेक्षणातून आकडेवारी समोर आली आहे. माऊंट एव्हरेस्टची उंची ८,८४८.८६ मीटर्स असल्याचं नेपाळ आणि चीनने एकत्रितपणे जाहीर केलंय.

एव्हरेस्टची समुद्रसपाटीपासूनची सध्याची उंची ८,८४८.८६ मीटर असल्याची दोन्ही देशांनी मंगळवारी (८ डिसेंबर, २०२०) रोजी जाहीर केले आहे. "सर्व्हे ऑफ इंडिया" ने १९५४ साली केलेल्या मोजणीनुसार ही उंची ८,८४८ मीटर होती. या उंचीमध्ये शिखरावरचं बर्फाच्छादित टोकही (Snow Cap) मोजण्यात आलंय.

१३ एप्रिल २०१९ रोजी नेपाळ आणि चीन यांच्यात एव्हरेस्ट शिखराच्या उंचीबाबत करार झाला. नेपाळ व चीन या दोन्ही देशांच्या सीमा या शिखरावरून जातात. नेपाळने गेल्या वर्षी, तर चीनने २०२० मध्ये एव्हरेस्टची उंची मोजण्यासाठी सर्वेक्षकांची विशेष मोहिम आखली होती. नेपाळने बंगालच्या उपसागरापासून तर चीनने कोरिया नजीकच्या यलो सी पासून एव्हरेस्टची उंची मोजली आहे. भारताने १९५४ साली उंची मोजली होती. सर्व्हे ऑफ इंडियाने ठरवलेली एव्हरेस्टची उंची ही जगभर प्रमाण म्हणून स्वीकारली जात होती.

हिमालयावर संशोधन करणाऱ्या संस्था आणि सगळ्या शास्त्रज्ञांनी एव्हरेस्टची उंची वाढत असल्याचा वेळोवेळी दावा केला होता. त्यांचा दावा अखेर खरा ठरलाय.

माऊंट एव्हरेस्टला नेपाळमध्ये सागरमाथा तर तिबेटमध्ये चोमोलुंग्मा म्हटलं जातं. जगातला हा सर्वोच्च पर्वत नेपाळ आणि चीन या दोन देशांमध्ये पसरला असला तरी त्याचं शिखर हे नेपाळच्या हद्दीत येतं आणि हे शिखर सर करण्यासाठी दोन्ही देशांच्या बाजूंनी चढाई करता येते.

नेपाळमध्ये २०१५ मध्ये आलेल्या ७.८ स्केलच्या भूकंपामुळे आणि अन्य भौगोलिक बदलामुळे काठमांडूजवळील काही पर्वतांची उंची कमी झाल्याचे समोर आले होते. एव्हरेस्टच्या उंचीवरही त्या भूकंपाचा परिणाम झाला असावा अशी शक्यता भूगर्भशास्त्रज्ञ वर्तवत होते. नेपाळनंतर चीननेही एव्हरेस्टची उंची मोजण्याचं काम सुरू केलं आणि २०१९मध्ये नेपाळच्या राष्ट्रपती बिद्यादेवी भंडारी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी एका संयुक्त निवेदनावर सह्या केल्या. सर्वेक्षणातून मिळणारी आकडेवारी आणि महत्त्वाची निरीक्षणं एकमेकांना सांगण्याचं यानुसार ठरवण्यात आलं.

हे सर्वात उंच असलेलं शिखर हिमालयाच्या कुशीत वसलं आहे. हिमालय पर्वताचा इतिहास पाहूयात का? 

हिमालय पर्वत हा मुख्यत्वे गाळाने बनलेला पर्वत आहे व हा जगातला सर्वांत तरुण पर्वत असल्याचे मानण्यात येते. याची उत्पत्ती साधारणपणे इसवी सनापूर्वी १ कोटी ते ७० लाख या वर्षांदरम्यान झाली. ट्रान्स हिमालय किंवा टेथिस हिमालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या पॅरा हिमालय ही हिमालयातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे.

भारतीय द्वीपकल्प हा मूळतः गोंडवन या महाखंडाचा भाग होता. हा महाखंड साधारणपणे आजच्या दक्षिण अफ्रिकेच्या जवळ होता. भारतीय द्वीपकल्पाने व ऑस्ट्रेलियाच्या प्रस्तराने (प्लेट) उत्तरेकडे वेगाने वाटचाल केली. ही हालचाल एका वर्षात १५ सें.मी. या दराने होत होती. भूवैज्ञानिकदृष्ट्या हा वेग खूप प्रचंड आहे. द्वीपकल्प व युरेशिया प्रस्तरामध्ये त्यावेळेस टेथिस नावाचा समुद्र अस्तित्वात होता. 

साधारणपणे १ कोटी वर्षांपूर्वी मुख्य आशिया खंडाची धडक झाली व टेथिस समुद्राचे अस्तित्व नष्ट झाले. परंतु यामुळे त्यामधील समुद्राने तयार झालेला गाळाचा भाग हलका असल्याने दबण्याऐवजी उंचावला गेला, जसजसे भारतीय उपखंड अजून आत येत गेले तसतसे हा भाग अजून उंचावला व हिमालयाची निर्मिती झाली. अजूनही भारतीय द्वीपकल्पीय प्रस्तराची वाटचाल तिबेटच्या खालील भागातून उत्तरेकडे होत आहे, त्यामुळे हिमालय अजूनही उंचावत आहे. या भौगोलिक घटनेमुळे म्यानमार म्हणजे आपल्या ओळखीच्या ब्रम्हदेशातील पर्वतरांगा तसेच अंदमान निकोबार हे द्वीपसमूह तयार झाले आहेत.

हा झाला हिमालयाचा इतिहास, पण हिमालय हेच जगातील सर्वात उंच शिखर आहे याचा शोध कोणी लावला माहित आहे का? पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा ही लेख नक्की वाचा.

या भारतीय गणितज्ञाने एव्हरेस्टला मिळवून दिला सर्वोच्च शिखराचा बहुमान...


ही माहिती कशी वाटली? कमेंटमधून कळवायला विसरू नका.

 

लेखिका: शीतल अजय दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required