१९९९ साली तयार झालेल्या हिंगोली जिल्ह्याची वैशिष्ट्ये तर जाणून घ्या.. काय आहे याची खासियत?
१९९९ साली परभणी जिल्हा विभागला गेला आणि हिंगोली हा नवा जिल्हा अस्तित्वात आला. मराठवाड्याच्या उत्तरेकडे असलेले हिंगोली निर्मितीच्या २३ वर्षांनंतर आज कसे आकाराला आलेले आहे हे आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत.
हिंगोलीचा भाग निजामाच्या राज्यात येत होता. या भागात त्याकाळी दोन मोठी युद्धे झाली. १८०३ साली टिपू सुलतान- मराठा युद्ध आणि दुसरे १८५७ साली नागपूरकर आणि भोसले यांच्या दरम्यान झालेले युद्ध. या भागात निजामाचे लष्करी ठाणे होते. या कारणाने या भागाला त्याकाळी मोठे महत्व होते. तेव्हा काही भागांना तोफखाना, सदरबाजार, पेन्शनपुरा, रिसाला असे नाव पडले. ती नावे आजही प्रचलित आहेत.
निजामापासून स्वतंत्र झाल्यावर १९५६ साली हिंगोली जिल्ह्याचा भाग हा मुंबई राज्यात समाविष्ट झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीवेळी परभणी जिल्ह्यात हिंगोली येत होते. १९९९ साली १ मे ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी परभणी जिल्ह्यातून हिंगोली वेगळा झाला. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी, औंढा नागनाथ, बसमत, सेनगाव, हिंगोली असे ५ तालुके आहेत.
हिंगोली जिल्ह्याचा बराचसा भाग हा गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेला आहे. पैणगंगा, पूर्णा, कयाधू या तीन मोठ्या नद्या जिल्ह्यातून वाहत आहेत. कयाधु ही पैनगंगेची उपनदी आहे. पूर्णा नदीवर हिंगोलीत येलदरी आणि सिद्धेश्वर या ठिकाणी धरणे बांधण्यात आली आहेत. येलदरी हा प्रकल्प मराठवाड्यातील पहिला जलसिंचन आणि जलविद्युत प्रकल्प आहे.
दळणवळण सोयींबाबत बोलायचे झाल्यास अकोला- पूर्णा हा लोहमार्ग हिंगोलीतून जातो. जिंतूर- नांदेड, नांदेड-अकोला, परभणी- यवतमाळ हे महत्वाचे राजमार्ग जिल्ह्यातून गेले आहेत. या राज्यमार्गांच्या माध्यमातून जिल्ह्याचे बरेच दळणवळण होत असते.
हिंगोली जिल्ह्यातील जमीन ही मोठ्या प्रमाणावर डोंगराळ आहे. तर नदीखोऱ्यात येणारी जमीन कसदार आहे. ज्वारी हे हिंगोली जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे. दोन्ही हंगामात हे पीक घेतले जाते. नगदी पिकात कापूस आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे मिरची, लसूण, द्राक्ष अशी पिकेही जिल्ह्यात काही ठिकाणी घेतली जातात. गेल्या काही वर्षांपासून ऊस लागवड वाढत आहे.
सेनगाव तालुका सोडला तर प्रत्येक तालुक्यात एक साखर कारखाना आहे. सूक्ष्म आणि मध्यम उद्योग हा हिंगोली जिल्ह्याचा पाया आहे. कातडीपासून वस्तू तयार करणे, लोकरापासून गोधडी विणणे, सिंचनाचे पाईप तयार करणे, जिनिंग- प्रेसिंग, प्लायवूड तयार करणे असे उद्योग तेथे आहेत.
भारतभर असलेले १२ ज्योतिर्लिंग हे लोकांसाठी मोठी श्रद्धास्थळे आहेत. यांपैकी औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यात येते. या ठिकाणी हेमाडपंथी मंदिर आहे. एका आख्यायिकेनुसार हे मंदिर धर्मराजाने बांधल्याचे सांगितले जाते. द्वादशकोणी आणि शिल्पसमृद्ध असल्याने या मंदिराचे विशेष आकर्षण आहे. जिल्ह्यातील शिरड शहापूर येथे असलेले मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर हे ३०० वर्ष जुने असल्याने या मंदिराचे भाविकांसाठी वेगळे महत्व आहे.
हिंगोली जिल्ह्यातील नरसी हे संत नामदेव महाराज यांचे मूळ गाव आहे. संत नामदेव यांनी ज्या विठोबा खेचर यांच्या कडून औंढा नागनाथ येथे उपदेश घेतला ते देखील येथीलच होते. संत परंपरेत महत्वाचा मान असलेले हे दोन मोठे संत हिंगोली जिल्ह्यात होऊन गेले आहेत. नरसी या ठिकाणाला राज्य सरकारने पवित्र स्थान आणि पर्यटन केंद्र म्हणून घोषित केले आहे.
यासोबत इसापूर धरण, तुळजादेवी संस्थान, सिद्धेश्वर बांध हे ठिकाण देखील हिंगोलीच्या वैभवात भर घालत आहेत. शहरात १६० वर्ष जुना दसरा महोत्सव साजरा केला जातो. हा महोत्सव हिंगोलीची ओळख आहे असे म्हणता येईल. लोककला जिवंत ठेवणारा जिल्हा म्हणून हिंगोली ओळखला जायला हवा, अशा पद्धतीने तिथे अनेक लोककला जपल्या जातात.
जगाच्या बदलत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हिंगोली जिल्हा अनेक बदल अनुभवत आहे. या बदलांसोबत महाराष्ट्राच्या विकासाचा भागीदार होण्याची क्षमता या जिल्हा राखून आहे. जुना आणि नव्याचा मेळ घालत नवा प्रवास हिंगोली जिल्हा करू लागला आहे.