computer

फोटो स्टोरी : इजिप्शियन राजाच्या थडग्यावरच्या ३०००वर्षं जुन्या दोरखंडामागे आहे एवढा मोठा इतिहास!!

तुम्ही एका प्राचीन इजिप्शियन राजाच्या थडग्याच्या दारात उभे आहात. दार दोरखंडाने बंद केलेलं आहे आणि त्यावर इजिप्शियन मृत्युदेवता कोरलेली आहे. हे दार गेल्या ३,२४५ वर्षात उघडलं गेलेलं नाही. थडग्यात प्रवेश करणारी तुम्ही इतिहासातील ती पहिली व्यक्ती असणार आहात. तुम्हाला काय वाटेल?

हा प्रसंग इतिहासात खरोखर घडला होता. वर्ष होतं १९२३ आणि ती व्यक्ती होती इजिप्शोलॉजिस्ट हॉवर्ड कार्टर.

फोटोत काय दिसत आहे?

हा फोटो १९२३ साली हॅरी बर्टनने घेतला होता. फोटोत दोरखंडाने बांधलेलं दार दिसत आहे. दारावर उजव्या बाजूला एक शिक्का (सील) दिसतोय. या शिक्क्यावर गुढगे टेकलेले गुलाम आहेत आणि त्यांच्यावर इजिप्शियन मृत्यूदेवता अन्नाबुस आहे.

या थडग्याचा इतिहास काय आहे ?

(राजांचे खोरे)

हे थडगं इजिप्शियन राजा तुतनखामेन याचं आहे. काहीजण याला तुतनखामेनही म्हणतात. इजिप्तमध्ये नाईल नदीच्या पश्चिमेला इजिप्शियन राजांची थडगी आढळतात. याला व्हॅली ऑफ किंग्स म्हणजे ‘राजांचे खोरे’ म्हटलं जातं. याच भागात तुतनखामेनचं थडगं आहे. या थडग्यात एकूण ४ खोल्या आहेत. प्राचीन काळात बाहेरील बाजूस असलेल्या खोल्या लुटारूंनी फोडल्याची नोंद आढळते. आतली खोली म्हणजे जिथे तुतनखामेनचं थडगं आढळलं तिला मात्र कोणीही हात लावलेला नव्हता. कदाचित या शिक्क्यावर असलेल्या मृत्यूदेवतेच्या भीतीने कोणी हिम्मत केली नसावी.

अखेर १९२३ साली इजिप्शोलॉजिस्ट हॉवर्ड कार्टर यांनी हे दार उघडलं. या थडग्यात अनेक वस्तू होत्या. सर्व गोष्टींची नोंद ठेऊन त्या इजिप्तच्या संग्रहालयात हलवण्यात २ वर्षांचा कालावधी लागला.

तुतनखामेन कोण होता?

तुतनखामेन हा इसविसनपूर्व १३४२ ते १३२५ सालात होऊन गेला.  त्याचं खरं नाव तुतनखातेन होतं. ज्याचा अर्थ होतो 'अखेनचा पुत्र'. हे नाव बदलून त्याने तुतनखामेन नाव घेतलं. या नावाचा अर्थ देव आमेन/अमुनचा पुत्र.

तुतनखामेनने केवळ १० वर्ष इजिप्तवर राज्य केलं. वडिलांच्या मृत्युनंतर अवघ्या ९ वर्षांच्या वयातच त्याला राजा व्हावं लागलं. दरबारातील कुशल सल्लागारांच्या मदतीने त्याने राज्यकारभार सांभाळला.

त्याचे वडील अखेनातेन हे प्राचीन इजिप्तच्या इतिहासातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होते. त्यांनी पहिल्यांदाच एकेश्वरवादाची सुरुवात केली. सूर्य हा एकमेव देव मानून त्यांनी जुन्या देवांना बाद ठरवलं. या गोष्टीवरून जनतेत प्रचंड राग उसळला. तुतनखामेन याने राज्याची धुरा हातात घेतल्यानंतर जुन्या देवांची स्थापना केली. मंदिरे उभारली. वडिलांनी घेतलेल्या निर्णयात सुधारणा केल्या. तुतनखामेनचा  मृत्यू कसा झाला याचं कारण आजही शोधलं जात आहे. त्याच्या मृत्यूमागे अनुवांशिक आजार असावा अशी एक समजूत आहे. ईजिप्शियन ममी म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर जो इजिप्शियन राजाचा मुखवटा येतो तो तुतनखामेनच्या थडग्यात आढळून आला होता.

दोरखंडाचं रहस्य

आश्चर्य याचं आहे की ३००० पेक्षा जास्त वर्षं हा दोरखंड शाबूत कसा राहिला ?

माणसाने ज्या महत्त्वाच्या गोष्टींचा शोध लावला त्यात दोरखंडाचाही समावेश होतो. पुरातत्त्वशास्त्रज्ञांना अगदी २८,००० वर्षे जुना दोरखंड आढळला आहे. आपण ज्या तुतनखामेनच्या थडग्याबद्दल बोलत आहोत त्याच्या दारावर असलेला दोरखंड शाबूत राहण्यामागे इजिप्तचं हवामान कारणीभूत आहे.

इजिप्तच्या हवामानातील कोरडेपणामुळे हा दोरखंड ३००० पेक्षाही जास्त काळ शाबूत राहिला असावा. याखेरीज ऑक्सिजनची कमतरता हेही एक कारण म्हणता येईल. ही थडगी बाहेरून बंद केलेली असल्यामुळे आतील खोल्यांमध्ये पुरेसा प्राणवायू पोहोचू शकला नाही. त्यामुळे दोरखंडाला कुजविणारे जीवाणू तग धरू शकले नाहीत. जर समजा अशीच थडगी जगात इतर कोणत्याही भागात असती तर त्याचं काही वर्षांतच विघटन झालं असतं. याच कारणाने अमेरिकेतील माया संस्कृती इजिप्शियन संस्कृतीनंतर उदयास येउनही त्यां संस्कृतीशी निगडीत वस्तू आज अस्तित्वात नाहीत.

 

फोटो स्टोरी लेखमालिकेत आम्ही अशाच वेगवेगळ्या कथा घेऊन येणार आहोत. ही कथा कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि पोस्ट शेअर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required