computer

अमेरिकेतले भटके मजूर आणि त्यांची सांकेतिक चित्ररुप भाषा, का आणि कशी तयार झाली ?

प्राचीन काळापासून माणसं एकत्र आली, गावं वसली, एकत्र राहण्याच्या पध्दती तयार झाल्या ,एकमेकांशी बोलायच्या भाषा तयार झाल्या आणि या सगळ्याच्या गोळाबेरजेला आपण संस्कृती म्हणायला सुरुवात केली. याच सोबत काही जीवनशैलींना कधीच संस्कृती म्हणून मान्यता मिळाली नाही. साहजिकच त्यांच्या भाषेची पुस्तकात- ग्रंथात नोंद घेतली गेली नाही. पण अशा भाषा अस्तित्वात होत्या आणि आजही आहेत. आज आम्ही अशाच एका भटक्या, घर नसलेल्या 'होबो' लोकांच्या सांकेतिक भाषेची ओळख करून देणार आहोत.

अमेरिकेतल्या 'होबो' म्हणजे घर नसलेली भटक्या प्रवासी मजूरांची जीवनशैली त्यापैकीच एक! हे लोक उनाड नाहीत, आळशीही नाहीत. प्रवास करत करत मिळ्रेल तेथे काम करणारी माणसं म्हणजे होबो! प्रत्येक गाव अनोळखी, गावातली लोकही नवीन, कायद्याचं अज्ञान यातून निर्माण होणार्‍या समस्यातून होबोंची चित्ररुप भाषा तयार झाली. गावातल्या भिंतीवर खडूने - कोळशाने या प्रतिमा होबो चितारून ठेवल्या जात. आपल्या पाठोपाठ येणार्‍या इतर होबोंच्या सोयीसाठी हा सगळा खटाटोप असायचा!

फक्त अमेरिकेतच नाही, तर युरोपातल्या अनेक देशात 'होबो' असतात. पण त्यांना देशाप्रमाणे संबोधने वेगळी असतात. भाषा मात्र सांकेतिक चित्रांचीच!

अमेरिकेत जेव्हा रेल्वे मार्ग सुरु झाले तेव्हा ही होबो मंडळी काम करत करत फिरायला लागली. होबो कधीच पॅसेंजर प्रवास करायचे नाहीत. मालगाडीवर सवार होऊन ते प्रवास करायचे. त्यांना भिती फक्त यार्डमधल्या रेल्वे ऑफीसरची असायची. त्यांना ते 'बुल' म्हणायचे. १९३० च्या महामंदीनंतर होबोंची संख्या वाढतच गेली. अत्यंत गरीब, फाटक्या लोकांच्या या भाषेची चित्रं आता बघूया.

या चित्रांच्या भाषेवतिरिक्त आपसात संभाषणाचे होबोंचे काही खास शब्द आहेत

बुल - रेल्वे अधिकारी

बिग हाऊस - जेल

बॉइल अप - कपडे उ़कळून साफ करणे (उवा मारण्यासाठी)

हनी डिपींग - फावड्याने गटार साफ करणे

निकेल नोट -पाच डॉलरची नोट

एक महत्वाची गोष्ट अशी की होबो चोर्‍या करायचे नाहीत, बायकांसोबत सभ्यतेने वागायाचे, घरातून पळून आलेल्या मुलांना घराकडे वळवायाचे, गावातल्या शिस्तीत रहायचे, बेताल प्यायचे नाहीत.

होबोंना त्यांचे गाव नव्हते. त्यामुळे त्यांना स्थलांतरित मजूरही म्हणता येणार नाही. त्यांनी कधीच हक्कांची मागणी केली नाही किंवा त्यांचे नेतेपण नव्हते. अशी ही एक वेगळीच भटकी संस्कृती होती.

महाराष्ट्रात किंवा भारतातही कदाचित अशा सांकेतिक भाषेद्वारे संभाषण करणारे लोक असतील. वंशावळ घेऊन फिरणारे हेळवी तर यामध्ये एकदम पटाईत असतात. तुम्हांला त्यांच्या किंवा इतर कुणाच्या सांकेतिक भाषेच्या खाणाखुणा आणि अर्थ माहित असतील, तर आम्हाला जरूर सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required