पाऊस कसा मोजतात ? पाऊस का मोजतात ? चला जाणून घेऊ !!

अमुक भागात इतका मिलीमीटर पाऊस पडला, तमुक भागात तितका सेंटीमीटर पाऊस पडला! ही नेमकी भानगड काय आहे? पण राव पाऊस किती पडला हे मोजणं शक्य आहे का? शक्य असेल तर कसं मोजतात आणि मुळात पाऊस मोजावा तरी का? पावसाबद्दल असले अनेक प्रश्न आपल्या डोक्यात असतात.. म्हणून चला तर शोधूया या सर्व प्रश्नांची उत्तर.

पावसाची मोजणी होते तरी कशी ?

पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्राचा वापर केला जातो. लिटर प्रति चौरस मीटर ( litres per square meter) किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो. यात मेट्रिक पद्धतीत ‘मिलीमीटर’ तर ब्रिटीश पद्धतीत ‘इंच’ हे देखील एकेक वापरले जाते. पाऊस मोजण्यासाठी लागणारी यंत्र काहीशी वेगवेगळी असू शकतात. पर्जन्यमापक यंत्राचे प्रकार पुढील प्रमाणे :

पर्जन्यमापक यंत्राचे दोन प्रकार असतात

 

स्रोत

१. रेकोर्डिंग पर्जन्यमापक

हे यंत्र स्वयंचलित असून याद्वारे नक्की किती पाऊस पडला याचा विश्वासार्ह अंदाज लावता येतो. पावसाचे पाणी भांड्यात जमा केले जाते आणि पडणाऱ्या पावसाच्या तीव्रतेतून माहिती गोळा केली जाते.


२. नॉन रेकोर्डिंग पर्जन्यमापक

नॉन रेकोर्डिंग पर्जन्यमापक हे अगदी साधे सोप्पे यंत्र असून याद्वारे निश्चित असं प्रमाण सांगता येत नसलं, तरी पाऊस किती पडला असेल याचा एक अंदाज बांधता येतो. ही पद्धती भारतात मोठ्या प्रमाणात वापरता येते. या उपकरणाला ‘सायमन्स रेनगेज’ म्हटलं जातं.

 

सर्वात आधी आपण नॉन रेकॉर्डिंग पर्जन्यमापकं बघुयात :

१. दैनंदिन पर्जन्यमापक

स्रोत

हा पर्जन्यमापक सर्वत्र वापरला जातो. या यंत्राला चित्रात दिसत असल्याप्रमाणे फनेल (नरसाळे) बसवलेले असते; जास्तीच्या पावसात पाणी बाहेर पडू नये म्हणून फनेलचा आतील भाग निमुळता केलेला असतो. फानेलच्या बाहेरील बाजूस प्रमाण मोजण्याच्या खुणा केलेल्या असतात त्यानुसार पाण्याच्या पातळीवरून पाऊस किती पडला हे ठरवलं जातं.

 

२. वजनाद्वारे पर्जन्यमापन करणारे यंत्र

हे यंत्र दैनंदिन यंत्रापेक्षा थोडं वेगळं असतं. यात वजनाद्वारे पाऊस मोजला जातो. पावसाच्या वजनावरून पावसाचं प्रमाण ठरवलं जातं.
 

 

रेकोर्डिंग पर्जन्यमापकं

१. टिपिंग बकेट रेन-गेज

स्रोत

या यंत्राला जोडलेल्या फनेलमधून पाणी एका भांड्यात सोडलं जातं. एका विशिष्ठ प्रमाणावर पाणी जेव्हा भरते तेव्हा या भांड्यातून पाणी अपोआप एका नळीमधून काढून टाकले जातं. हे ठराविक प्रमाण भरत आल्यानंतर एक इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे एक स्वयंचलित पेन कार्यरत होते आणि आलेख कागदावर पावसाचे प्रमाण नोंदवले जाते. या सिस्टममुळे २४ तासात पडलेल्या पावसाचं अचूक प्रमाण मोजता येतं. 
 

२. ध्वनिद्वारे पर्जन्यमापन !

स्रोत

हे यंत्र थेट पावसाचे थेंब मोजण्याचं काम करतं. खास सेन्सरद्वारे परिसरात किती पावसाचे थेंब पडत आहेत हे मोजलं जातं आणि प्रत्येकी थांबाचे मापन करून एकूण किती पाऊस पडला असावा याचा अंदाज लावला जातो.
 

३. ऑप्टीकल रेन गेज !

स्रोत

ऑप्टीकल रेन गेज हे एक अॅडव्हांस यंत्र असून याला लेझर डायोड आणि फोटो ट्रांजिस्टर डिटेक्टर जोडलेले असतात. एका ठराविक पातळीपर्यंत पाणी जमा झाल्यानंतर ते पाणी भांड्यात उलटले जाते. उलटणाऱ्या पाण्यामुळे भांड्यात लावलेली लेझर बीम अॅक्टीवेट होते आणि या लेझर बीम मुळे यंत्रात फोटो डिटेक्टरच्या सहाय्याने पाण्याची नोंद केली जाते. सेन्सर मुळे अचूक नोंद घेण्यात हे यंत्र विश्वासार्ह मानलं जातं.
 

आता शेवटचा प्रश्न : पाऊस का मोजतात ?

Image result for thinking meme faceस्रोत

या प्रश्नाचं उत्तर असं की वर्षभरात किती पाउस पडला यावरून पुढील वर्षी किती पाऊस पडेल आणि यावर्षीच्या मानाने गेल्या वर्षी किती पाऊस पडला होता याचा अभ्यास करण्यासाठी पाऊस मोजला जातो. पावसाचे कमी जास्त होणारे प्रमाण याविषयी यावरून अंदाज लावणे सोप्पे जाते. पावसाच्या प्रमाणामुळे भूगर्भात पाण्याची पातळी किती असेल आणि पुढील पावसाळ्या पर्यंत पाणी पुरेल की नाही याचाही अंदाज लावता येतो.

 

अर्थात या सर्व यंत्राद्वारे एक ठराविक अंदाज येत असला तरी पूर्णपणे अचूक माहिती देणारं यंत्र अजूनही बनलेलं नाही आणि म्हणूनच हवामान खात्याचे अंदाज काहीवेळा चुकतात.

सबस्क्राईब करा

* indicates required