अपघातानेच 'एक्स रे'चा शोध कसा लागला? जगातील पहिला एक्स रे कोणाचा होता ?
एक्स रे किरणांचे आजच्या मेडिकल सायन्समधील महत्व कुणीही नाकारू शकणार नाही. एक्स रेचा उपयोग शरीराच्या आतल्या भागातील बिघाड शोधण्यासाठी केला जातो हे तर सर्वांना माहीत आहे. पण एक्स रेचा उपयोग कॅन्सरसारख्या आजार शोधण्यासाठी देखील केला जातो. तसे एक्स रेचे अनेक उपयोग आहेत. पण आज आम्ही तुम्हाला एक्स रेचे फायदे नाही, तर या एक्स रेच्या शोधामागील गोष्ट सांगणार आहोत.
एक्स रेचा शोध हा विल्यम रोन्टजेन यांनी सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी १८९५ साली लावला होता. एक्स रेचा अर्थ होतो अज्ञात किरणे. या किरणांना रोन्टजेन किरणे पण म्हटले जाते. याच शोधासाठी रोन्टजेन यांना १९०१ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देखील दिला गेला होता.
या एक्स रेच्या शोधामागची गोष्टदेखील भन्नाट आहे. रोन्टजेन आपल्या लॅबमध्ये कॅथोड रे ट्यूबमध्ये काहीतरी परीक्षण करत होते. त्यांनी पडदे टाकून लॅबमध्ये अंधार केला होता आणि ट्युब काळ्या रंगाच्या डब्ब्याने झाकून ठेवली होती. रोन्टजेन यांना त्यावेळी दिसले की ट्युबजवळ ठेवलेल्या काही बेरीयम प्लॅटिनो सायनाईडच्या तुकडयांमधून एक प्रकारचा प्रकाश झगमगत होता.
रोन्टजेन यांनी आजूबाजूला बघितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या टेबलपासून काही फूट दूर एक पडदाही चमकत आहे. रोन्टजेन यांना आता हे सगळे बघून प्रचंड आश्चर्य वाटत होते. कारण ट्यूब तर काळ्या डब्ब्याने झाकली होती आणि कॅथोड किरणे बाहेर निघण्याचा कुठलाही मार्ग नव्हता. हे बघून त्यांना कळून चुकले की ट्यूबमधून काही अज्ञात किरणे निघत आहेत आणि ही किरणे जाड कागदामधून देखील परावर्तीत होऊ शकत आहेत.
त्याकाळी या किरणांचे विशेष ज्ञान नसल्याने त्यांना रोन्टजेन यांनी एक्स किरणे म्हटले. आता त्यांनी या किरणांवर प्रयोग करायला सुरुवात केली. त्यांना समजले की ही किरणे कागद, रबर त्याचप्रमाणे धातूंच्याही आरपार जातात. आता रोन्टजेन यांना एक वेगळी गोष्ट सुचली. त्यांनी विचार केला की, जसे साधारण फोटो मधून फिल्म प्रभावित होते, तसेच या किरणांचा प्रभाव फोटो फिल्मवर देखील पडू शकण्याची शक्यता आहे. त्यांनी फक्त या कल्पनेत न रमता तसा प्रयोगही लवकरच अंमलात आणला.
रोन्टजेन यांनी एक फोटो फिल्म डेव्हलप केली. त्यांना आता दिसून आले की, प्लेटवर हाताचे हाड स्पष्टपणे दिसत आहे. तसेच त्यांच्या चारी बाजूला अंधारल्यासारखे त्यांना दिसले. त्यांनी पुन्हा त्यांच्या पत्नीवरही हा प्रयोग करून बघितला. एखाद्या जिवंत व्यक्तीचा हा पहिलाच एक्स रे होता. या एक्स रेत त्यांच्या पत्नीची बोटे तसेच हातातली अंगठी देखील त्यांना स्पष्टपणे दिसली.
बऱ्याच शोधांमध्ये त्या शोधाचे साईड इफेक्ट्स सुरवातीच्या काळात लक्षात येत नाहीत. इथेही असेच झाले. याच एक्स रे किरणांच्या अतिवापरामुळे रोन्टजेन यांना जीव गमवावा लागला आणि ही किरणे किंवा किरणशलाका मानवी शरीरासाठी अपायकारक आहेत हे सिद्ध झाले.
तर, अशी होती एक्सरेच्या जन्माची कथा. अपघाताने लागलेला शोध ते शोधकर्त्याचाच जीव घेण्यापर्यंत हा प्रवास आहे. या संशोधनाने वैद्यकशास्त्राला नवीन दिशा दिली हे मात्र नक्की.