computer

सहज शे-दीडशे वर्षे आणि तेही निरोगी आयुष्य जगणारी हुंजा जमात! जाणून घ्या त्यांच्या या वैशिष्ट्यामागचं रहस्य काय आहे!!

एखाद्या व्यक्तीचे सरासरी वय किती असते? खरे तर गेले दोन वर्ष आपण असे जगलो आहोत की कोणाच्याही आयुष्याची हमी देता येणार नाही. पण तरीही लोकांचे सरासरी वय ६०-७० वर्षे मानले जाते. कोणी तुम्हाला म्हणले की जगाच्या एका ठिकाणी असे लोक राहतात जे आजच्या युगातही शे-दीडशे वर्षे सहज जगतात. तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल हो ना? होय! आम्ही हुंझा समाजातल्या लोकांविषयी बोलत आहोत, ज्यांचे आयुष्य दीर्घ तर आहेच आणि कोणत्याही आजाराला ते बळी पडत नाहीत. इथल्या लोकांना तुम्ही पाहिलेत तर त्यांचे वय तुमच्या अंदाजापेक्षा किमान २० वर्ष कमी असेल.

हुंझा जमात पाकिस्तानातील हुंझा, चित्राल नगर आणि गिलगिट-बाल्टिस्तानच्या खोऱ्यांमध्ये राहाते. पण त्यांचे मूळ भारतात आहे असे मानले जाते. ३५० पेक्षा जास्त बुरुशो लोकांचा एक छोटा समूह जम्मू आणि काश्मीरमध्ये राहतो. पाकिस्तानात स्थायिक झालेल्या या समाजाचे लोक मुस्लिम धर्माचे पालन करतात. त्यांच्या समुदायाला बुरुशो म्हणतात आणि ते बुरुशास्की भाषा बोलतात. या लोकांची जीवनशैली पाहण्यासाठी अनेक पर्यटक हुंजा खोऱ्यात येतात. हुंझा समाजातील स्त्रिया अतिशय सुंदर आणि सुशिक्षित आहेत. त्यांचे सौंदर्य कमी न होण्याचे कारण म्हणजे ते हिमालयातील हिमनद्यांचे वितळलेले पाणी पितात आणि त्यात स्नान करतात. या पाण्यात भरपूर खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. तिथे नैसर्गिक पाण्याचे स्वच्छ स्त्रोत असल्याने त्याचा उपयोग इथल्या लोकांना आरोग्यदायी जीवनशैली ठेवण्यास होतो.

हुंझा जमातीवर अनेक लेखकांनी पुस्तके लिहिली आहेत. काहीजण हुंझांची जीवनशैली जाणण्यासाठी तिथे राहिलेही होते. १९५५ मध्ये JI रॉडल यांनी त्यांच्यावर 'The Healthy Hunjaz' नावाचे पुस्तक लिहिले. १९८४ मध्ये हाँगकाँगमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानंतर जगाला या अद्भुत लोकांची ओळख झाली. काहीजण असेही म्हणतात की हा समुदाय चौथ्या शतकात येथे आलेल्या अलेक्झांडर द ग्रेटच्या सैन्याचे वंशज आहेत. हुंजा खोऱ्यातील लोकसंख्या सुमारे ८७ हजार आहे. पाकिस्तानातील इतर समुदायांच्या तुलनेत या समुदायाचे लोक जास्त शिक्षित आहेत.

हुंझा लोक १००-१२० वर्षे सहज जगतात. वयाच्या ७० वर्षांपर्यंत तरुण दिसतात. बऱ्याच जणांनी १५० वर्षे ही पूर्ण केली आहेत. हा एक चमत्कार वाटेल, पण खरेतर त्यांच्या खाण्याच्या सवयी आणि राहणीमान हे देखील याला कारणीभूत आहे. हे लोक कच्चे अन्न आणि आहारात फक्त पौष्टिक अन्नाचा समावेश करतात. संशोधकांनी एका अहवालात म्हटले आहे की हुंजा लोक त्यांच्या जेवणात उन्हात सुकवलेले अक्रोड आणि जर्दाळू अधिकाधिक वापरतात. जर्दाळूमध्ये एक कर्करोग रोखणारा घटक आहे, त्यामुळे तिथे कोणाला कर्करोग होत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय हे लोक कच्च्या भाज्या, फळे, धान्य, दूध, अंडी आणि चीज यांचाही रोजच्या आहारात समावेश करतात. तसेच तिथे उपवास करणेही महत्वाचे असते.हुं जा लोक वर्षातील २ महिने नेहमीचा आहार घेत नाहीत. त्या काळात ते फक्त ताजा रस घेतात. तसेच तिथे लोकांचे चालणेही खूप होते. शारीरिक कष्ट घेताना तर थकत नाहीत.

१९८४ साली अब्दुल मोबाट नावाचा माणूस लंडनच्या हिथ्रो विमानतळावर आला. तेथे नेहमीप्रमाणे तपासणी चालू होती. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी पाहिले की अब्दुलच्या पासपोर्टवर त्याच्या जन्मवर्षाच्या जागी १८३२ लिहिलेले आहे. तेव्हा त्यांना वाटले की ही काही चूक असावी. कारण जन्मवर्षाप्रमाणे त्यामुळे अब्दुलचे वय १५२ होते आणि १५२ वयाची व्यक्ती पूर्णपणे तंदुरूस्त आपल्या समोर उभी आहे, यावर कोणाचाही विश्वास बसला नाही. पण शेवटी कळले की हे खरे होते. अब्दुल हा १५२ वर्षांचा माणूस 'हुंजा' समाजातील होता.

खरतर ही निसर्गाची कमाल आहे असे वाटते. प्रगतीच्या नावाखाली माणूस आळशी झाला. आज हातात पैसे असले, सुखसोयी असल्या तरी निरोगी आणि मोठे आयुष्य कुठून आणणार?

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required