आनंदीबाईंच्या आयुष्यातल्या माहित नसलेल्या चार गोष्टी!! काही चांगल्या, तर काही...
डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी. भारतातली पहिली डॉक्टर स्त्री. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेली आणि डॉक्टर बनण्यासाठी सातासमुद्रापार गेलेली धाडसी आणि हुशार स्त्री. काही लोकांनी श्री. ज. जोशींनी लिहिलेले आनंदी गोपाळ पुस्तक वाचले असेल आणि बऱ्याच जणांनी सिनेमाही पाहिला असेल. त्यांच्या जन्मदिनी आणि स्मृतीदिनी आलेल्या लेखांतून आलेली माहितीही त्यांच्याबद्दल बरंच काही सांगते. म्हणूनच आज आम्ही इतरत्र चर्चेत नसलेल्या काही वेगळ्या बाबी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
१. आनंदीबाईंच्या जीवनावर किमान चार चरित्र पुस्तके लिहिली गेली आहेत.
आनंदीबाई निवर्तल्यानंतरच्या एकाच वर्षात म्हणजे १८८८साली त्यांच्या जीवनावर दोन चरित्रे लिहिली गेली. एक होते काशीबाई कानिटकरांचे आणि दुसरे कॅरोलीन डॉल यांनी लिहिलेले. काशीबाई आनंदीच्या काळातल्या बाई होत्या. त्यांना नवर्याने लिहावाचायला शिकवले होते. "पण लक्षात कोण घेतो"फेम हरिभाऊ आपटे काशीबाईंचे स्नेही होते. त्या आनंदीला कधी भेटल्या नाहीत, मात्र गोपाळरावांना त्या भेटल्या. किंबहुना त्यांना बरीचशी माहिती गोपाळरावांकडूनच मिळाली. जे काही विक्षिप्त गोपाळरावांनी त्यांना सांगितलं, तेच या बाईंनी लिहिलं. त्यात त्यांनी इंग्रजांविरोधातही बरंच लिहिलं. पण मग पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघायच्या वेळेस त्या घाबरल्या आणि मग इंग्रजांविरोधी मजकुराची काटछाट करताना काही महत्वाचे संदर्भही बाईंनी उडवून लावले. श्री. ज. जोशींचं पुस्तक याच पुस्तकावर आधारलेले आहे.
कॅरोलीन ही आनंदीहून बरीच मोठी होती. ती आनंदीला अमेरिकेत भेटली. पहिल्या भेटीत तिला आनंदीमध्ये काही विशेष जाणवले नाही. पण नंतर तिच्या बुद्धीमत्तेची चमक पाहून तीही थक्क झाली होती. आनंदी जात्याच सोशीक होती. त्यातच मुलीच्या जातीने काय काय करू नये याची शिकवण लहानपणापासून असल्याने ती नवरा हा विषय सोडून कॅरोलीनकडे पुष्कळ बोलली होती. त्यामुळे काहीप्रमाणात का होईना, पण आनंदीचे खरे विचार काही प्रमाणात कॅरोलीनपर्यंत पोचले होते. पण हेही आहे की तिला काही गोष्टी गवसल्या नाहीत.
चौथं पुस्तक मात्र आनंदीबाईंच्बद्दल लिहिताना बरंच प्रामाणिक असल्याचं दिसतं. ते आहे अंजली कीर्तनेंनी लिहिलेलं "डॉ. आनंदीबाई जोशी: काळ आणि कर्तव्य". लेखिका अंजली किर्तने यांनी आनंदीवर जवळजवळ सहा –सात वर्षे संशोधन केले. त्यांनी आनंदीबाईंचं कोलकात्यातलं भाषण ते एम. डी.चा प्रोजेक्ट रिपोर्ट इथपर्यंत सगळी माहिती जमवली आणि त्या सगळ्या गोष्टी संदर्भासह त्यांच्या पुस्तकात दिल्या आहेत.
२. आनंदीबाई जोशी या भारतातल्या पहिल्या स्त्री डॉक्टर असल्या तरी भारतातल्या पहिल्या प्रॅक्टिसिंग स्त्री डॉ. रखमाबाई सावे होत्या.
रखमाबाईंचा लेख भारताच्या पहिल्या प्रॅक्टिसिंग स्त्री डॉक्टर म्हणून आला की लगेच काही लोक ही माहिती चुकीची आहे, आणि भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाईच कशा आहेत हे सांगायला अगदी सरसावून येतात. पण अमेरिकेतून परत येतानाच आनंदीबाईंना टीबीची बाधा झाली होती. इथं पुण्यात आल्यावरही त्यांच्यावर उपचार चालू होते. आजारातून बरं झाल्यानंतर त्यांना कोल्हापूर संस्थानात आपल्या पहिल्या नोकरीत रुजू व्हायचं होतं. पण त्यापूर्वीच त्यांचा टीबी बळावल्याने डॉक्टरकीची प्रॅक्टीस करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
३. आनंदीबाईंच्या वर्गमैत्रिणीसुद्धा आनंदीबाईंसारख्या दिव्यातून आल्या होत्या.
काही लोकांना कर्मठपणा फक्त भारतातच असतो असं वाटतं. पण नाही. त्याकाळात परदेशांतही स्त्रियांना मेडिकलचे शिक्षण घेणं इतकं सहजसोपं नव्हतं. पेन्सिल्व्हियामधल्या त्यांच्या वर्गात वेगवेगळ्या देशांतल्या आणि वेगवेगळ्या वयाच्या स्त्रिया तिथल्या लोकांचा विरोध पत्करून डॉक्टर बनण्यासाठी आल्या होत्या.
४. आनंदीबाईंचा प्रबंध कशावर होता आणि त्यात त्यांनी नक्की काय लिहिलं होतं?
आनंदीबाईंच्या मुलाचा योग्य उपचार न मिळाल्याने दहा दिवसांतच मृत्यू झाला होता आणि ही घटना त्यांना मेडिकल शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणारी ठरली. त्यांचा एम. डी.चा प्रबंध त्यांच्या वर्गातल्या इतर प्रबंधांपेक्षा सर्वात मोठा होता, आणि विषय होता: “Obestetrics Among The Aryan Hindoos”. पण इथे थोडा प्रॉब्लेम होता. नांव हिंदूंचे पण त्यांनी फक्त ब्राह्मण कुटुंबातल्या प्रसूतीशास्त्राविषयी लिहिले. स्पृश्य-अस्पृश्यता पाळणाऱ्या त्याकाळच्या समाजात कदाचित आनंदीबाईंचा इतर समाजातल्या लोकांशी संपर्क आलाही नसेल. पण त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये आनंदीबाईंनी स्वत:चे असे काही मत न मांडता संस्कृत ग्रंथांचे भाषांतर, मनुस्मृतीतील वचनेच जास्त लिहिली होती.
एकतर स्वत: डॉक्टर बनावे ही इच्छाच त्यांना मुलाच्या अपमृत्यूमुळे निर्माण झाली होती. असे असताना मेडिकलचे शिक्षण घेतल्यानंतर झालेल्या आनंदीबाईंनी पारंपारिक आर्य वैद्यकशास्त्राकडे कोणत्या दृष्टीने पाहिले, पाश्चात्य ज्ञानशाखेच्या अभ्यासानंतर तिला कोणती वेगळी दृष्टी प्राप्त झाली, हे काही त्या प्रोजेक्टरिपोर्टमधून जाणवत नाही असे दिसते. आनंदीबाईंची कारपेंटर मावशींना लिहिलेली पत्रे चिंतनशील, अत्यंत चिकित्सक, संवेदमाक्षम आणि सखोल आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट परिपूर्ण असा का लिहिला नाही हा प्रश्न पडतो.
असे असले तरी दीडशे वर्षांपूर्वी ओळखदेख नसलेल्या, आपली संस्कृती-वातावरण-हवामान-वेषभूषा आणि इतर बऱ्याच गोष्टींत भिन्न असलेल्या देशात राहून शिक्षण घेणे आणि त्याचसोबत नवऱ्याचा विक्षिप्तपणा सहन करत आपले ध्येय पूर्ण करणे हे काही सोपे काम नव्हते. कोलकात्यातल्या सभेत त्यांनी तिथे उपस्थित जनसमुदायाला दिलेले, “मी माझ्या वेशभूषेत व खाण्यात बदल करणार नाही” हे वचन जीवावर उदार होऊन पाळले. त्यातून त्यांचा निश्चयी स्वभाव दिसून येतो. आपलं दुर्दैव की त्या फक्त भारतातल्या पहिल्या डॉक्टर बनू शकल्या आणि अवघ्या २१ वर्षांच्या वयात त्यांचा मृत्यू झाला. एवढ्याशा आयुष्यात त्यांनी किती लोकांना आणि विशेषत: स्त्रियांना प्रेरणा दिली असेल याला मात्र गणती नाही.
संदर्भ: डॉ. आनंदीबाई जोशी: काळ आणि कर्तृत्व, लेखिका: अंजली कीर्तने