या भारतीय गणितज्ञाने एव्हरेस्टला मिळवून दिला सर्वोच्च शिखराचा बहुमान...

मंडळी तुम्ही जर गुगल केलंत आणि माउंट एव्हरेस्टला 'एव्हरेस्ट' हे नाव का पडलं याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलात,   तर तुम्हाला असं आढळून येईल की हे नांव तत्कालीन भारतीय सर्वेक्षण प्रकल्पाचे प्रमुख 'सर जॉर्ज एव्हरेस्ट' यांच्या नावावरून देण्यात आलंय.  पण मंडळी, तुम्हाला माहित आहे का या उंच पर्वताचा शोध घेणारा एक भारतीय होता. हा माणूसही साधासुधा नव्हता..   तंत्रज्ञान विकसित न झालेल्या त्या काळात त्यानं  चक्क एव्हरेस्टची उंची मोजून  जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता.

कोण आहे तो भारतीय? चला जाणून घेऊया !! 

"राधानाथ सिकदार" हे एक बंगाली गणितज्ञ होऊन गेले. त्यांचा जन्म इ.स. १८१३ साली कलकत्त्यात झाला होता. ब्रिटिश राजवटीत भारतीय सर्वेक्षण खात्यात त्यांनी नोकरी केली. नोकरी करत असतानाच त्यांनी कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून गणितात पदवी मिळवली होती.

१८०२ साली तेव्हाच्या  'ईस्ट इंडिया कंपनी' सरकारनं हिमालयाच्या शिखरांची उंची मोजण्याचं काम हाती घेतलं होतं. या सर्वेक्षणाचे अध्यक्ष जॉर्ज एव्हरेस्ट होते. पुढे १८३१ साली त्यांना अशा एका व्यक्तीची गरज होती जी 'स्फेरिक ट्रिग्नोमेट्री' (भूमितीची एक शाखा) मध्ये एक्स्पर्ट असेल. प्रेसिडेन्सी कॉलेजचे प्राचार्य 'डॉ. टायटलर ' यांनी आपल्या सर्वात हुशार विद्यार्थ्यांचं नाव या कामासाठी जॉर्ज एव्हरेस्ट यांना सुचावलं आणि अशाप्रकारे राधानाथ यांची निवड 'द ग्रेट ट्रिगनॉमेट्रिक सर्व्हे' या प्रकल्पात करण्यात आली. त्यावेळी त्यांचं वय अवघं १९ होतं. या प्रकल्पात ते एकमेव भारतीय होते. 

राधानाथ यांच्या कामावर खुश होऊन जॉर्ज एव्हरेस्ट यांनी त्यांची बदली देहरादून येथे केली. पुढे जाऊन एव्हरेस्ट यांनी त्यांना सर्वात उंच शिखर शोधण्याची कामगिरी सोपवली. १८४३ साली जॉर्ज एव्हरेस्ट निवृत्त झाले आणि त्यांच्याजागी 'अँड्र्यू वॉ' हे सर्वेयर जनरल  झाले. १८५२ साली राधानाथ हे या निष्कर्षापर्यंत पोहोचले की हिमलायाचं १५ वं शिखर हे जगातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. 

या शोधाबद्दल 'अँड्र्यू वॉ' यांना विश्वास नव्हता. पण अखेर १८५६ साली राधानाथ यांच्या शोधावर शिक्कामोर्तब झालं. आता या शिखराला नाव काय द्यावं म्हणून अनेक विचार झाले. काहींनी सुचवलं कि स्थानिक नावांवरून पर्वताचं नामकरण करण्यात यावं. म्हणजे नेपाळमध्ये याला सगरमाथा म्हणून ओळखतात, तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा म्हणतात.  पण शेवटी अँड्र्यू वॉ यांनी जॉर्ज एव्हरेस्ट यांना श्रद्धांजली म्हणून या शिखराला 'माउंट एव्हरेस्ट' हे नाव दिलं. 

शेवटी इतिहासात काही गोष्टी गडप होतात त्या अशा. एव्हरेस्ट यांचं नाव शिखराला दिल्यामुळे या भारतीय गणितज्ञाला सगळेच विसरले. जगात कानाकोपऱ्यात फक्त एव्हरेस्ट हे नाव पोहोचलं पण त्यापाठी ज्या माणसाची मेहनत होती तो मात्र अंधारात राहिला.  भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या शिखराचे नाव बदलून "माउंट सिकदार" असे ठेवावे असा निर्णय घेतला होता. पण पुढे हा प्रस्ताव बारगळला. नंतरच्या सरकारांनीही पाठपुरावा न केल्याने सिकदार हे नाव अनेकांना अज्ञात राहिले.

मंडळी या भारतीय गणितज्ञाला मनाचा मुजरा !!

सबस्क्राईब करा

* indicates required